‘तुम्ही बुवा कुठूनही पडला तरी मांजरासारखं चार पायांवर अलगद पडता,’ असं आपण सुखी माणसाला गमतीनं म्हणतो. पण मांजराच्या बाबतीत शास्त्रीयदृष्टय़ा विचार केला तर ही अगदी खरी गोष्ट आहे. उंचावरून जमिनीवर पडल्यानंतर कोणतीही इजा न होण्याचे प्रमाण मांजरातच सर्वाधिक असतं. अगदी कुत्र्यालाही ते सहज जमत नाही. याचं कारण म्हणजे मांजराच्या शरीरात असलेलं व्हेस्टिब्युलर तंत्र.  मांजर हवेतल्या हवेत अगदी सुखोई विमानाप्रमाणे कसेही गिरक्या घेऊ शकते. या तंत्रामुळे उंचावरून खाली पडताना मांजराचे चारही पाय आपसूक खालच्या दिशेने होतात आणि ते घिरटय़ा घेण्यास सुरुवात करते. मांजर शंभर फुटांवरून खाली पडले असे गृहीत धरा. पडताक्षणी मांजर आपले चारी पाय छानपकी ताणते आणि संपूर्ण शरीरालाच समान पातळीवर हॉरिझाँटल स्थितीत आणते. पावले खाली पडताच वेग मंदावतो. त्यामुळे चार पाय पसरून मांजर अगदी अलगद जमिनीवर उतरते. पॅराशूटमध्येही लँड होताना हेच तंत्रज्ञान वापरले जाते.
सुखी लोकांचा देश
जगातील सर्वात सुखी लोकांचा देश कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे, डेन्मार्क. संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या पाहणीत ही बाब पुढे आली आहे. जागतिक सुखीपणा अहवाल २०१३ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. डेन्मार्कने या पाहणीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर आफ्रिकेतील टोगो या देशाचा सर्वात शेवटचा क्रमांक लागला आहे. या अहवालासाठी पाहणी करणाऱ्या पथकाने प्रत्येक देशातील सुमारे ३००० लोकांच्या मुलाखती घेऊन त्याआधारे निष्कर्ष काढले आहेत. उत्पन्न, आरोग्य, सामाजिक पाठबळ आणि स्वातंत्र्य या घटकांच्या आधारे सुखाचे मूल्यमापन करण्यात आले. त्यात डेन्मार्कपाठोपाठ नॉर्वे, स्वित्र्झलँड, नेदरलँड्स आणि स्वीडन यांचा क्रमांक लागतो. जगातील महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेचा सुखीपणाच्या बाबतीत १७ वा क्रमांक आहे. गेल्या पाच वर्षांत अमेरिकी नागरिकांच्या सुखीपणामध्ये तीन टक्क्यांनी घट झाल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. तळातील देशांमध्ये मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक आणि बेनिन यांचाही समावेश आहे. आखाती देशांमधील सुखीपणामध्येही घट झाली आहे. या यादीमध्ये भारताचा क्रमांक तब्बल १११ वा आहे. दहशतवादाने ग्रस्त, जेथे सुईदेखील उत्पादित होत नाही असा देश म्हणून आपण पाकिस्तानची हेटाळणी करत असलो तरीही तेथील लोक सुखी आहेत, असे संयुक्त राष्ट्रांचा अहवाल सांगतो. पाकिस्तानचा क्रमांक भारताच्या वरचा म्हणजे ८१ वा आहे.
पाकिस्तानने सुखीपणाबाबत केवळ भारतालाच मागे टाकले आहे असे नाही. आपल्या मित्रदेशाला- चीनलाही पिछाडीवर टाकले आहे. चीनचा क्रमांक ९३ वा आहे. भारताच्या अन्य शेजाऱ्यांची क्रमवारी अनुक्रमे म्यानमार (२१२), नेपाळ (१३५) आणि श्रीलंका (१३७) अशी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information how cat falls on four legs
First published on: 28-09-2014 at 01:01 IST