मेघना जोशी joshimeghana.23@gmail.com

अथर्वची परीक्षा नुकतीच संपली होती. त्यातच आज कोकणातून त्याची आजी, आजोबा आणि आत्या येणार होते. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. तो आता त्यांच्यासोबत खूप धमाल करणार होता. खूप काही ठरवलं होतं त्याने. त्याचाच विचार करत असताना दरवाजाची बेल वाजली. बाबा आजी-आजोबांना स्टेशनवरून घेऊन आले होते. ते घरात येऊन सोफ्यावर बसले. बाबा आणि आत्याने सगळं सामान आत आणून ठेवलं. त्यात एक आंब्याची पेटी लक्ष वेधून घेत होतीच अथर्वचं. त्याने आजीला ‘ही कधी उघडायची?’ असं खुणेनंच विचारलं. आजीने खुणेनंच ‘थोडय़ा वेळाने..’ असं उत्तर दिलं. अथर्व आणि राधा त्या उत्तराने खूश होत एकमेकांकडे पाहून हसले.

इतक्यात अथर्वचं लक्ष आजीच्या जवळ ठेवलेल्या दुसऱ्या पेटीकडे गेलं. ती तर आंब्याची पेटी दिसत नव्हती. तो आजीच्या जवळ सरकला. त्याने हळू आवाजात आजीला विचारलं, ‘‘ही कसली पेटी आहे? काय आहे यात? काजू?’’ आजी म्हणाली, ‘‘काजू नाहीएत रे बाबा. ही जादूची पेटी आहे. सावकाशीने उघडू.’’ या उत्तराने अथर्वचं समाधान झालं नाही म्हणून त्याने आजोबा आणि आत्या यांच्याकडून काही माहिती मिळते का ते पाहिलं, पण त्यांनीही काही दाद लागू दिली नाही. म्हणून त्याने पेटी वाजवून, तिचा वास घेऊन वगैरे पाहिलं, पण काही अंदाज येईना. त्याची ती उत्सुकता पाहून आई म्हणाली, ‘‘अथर्व, ही पेटी तू तुझ्या बेडजवळ ठेव बरं!’’

अथर्वने आईने सांगितल्याप्रमाणे ती पेटी आपल्या बेडजवळ ठेवली आणि ‘ती उघडू नकोस’असं राधाला दहादा बजावलं. रात्री झोपताना त्या पेटीबद्दल विचार करतच तो झोपला. रात्री अर्ध्या झोपेत त्याला कोणीतरी बोलल्याचा भास झाला. कोणीतरी एकमेकांना बाजूला सरकून जागा देण्याबाबत सांगत होतं. अथर्वने झोपेतच कानोसा घेतला तर कोणी म्हणत होतं, ‘‘ए गोल गोल लोकरीच्या गुंडय़ानो, किती जागा खाल्लीयत तुम्ही. मला तर जागाच उरली नाहीए.’’

 ‘‘हं.. आम्ही जागा खाल्लीय. पण तुझे ते हात टोचतायत बरं आम्हाला साच्या.’’

‘‘हात टोचत असतील रे.. पण मला वापरल्याशिवाय तो अथर्व लोकरीची- म्हणजे तुमची फुलं कशी तयार करील सांग बरं!’’ आपलं नाव ऐकून अथर्वने कान टवकारले. म्हणजे या पेटीत लोकरीचे गुंडे आणि त्याची फुलं करायचे साचे आहेत तर!

‘‘फक्त फुलंच नाही काही, आमच्या गाठी घालून कीचेन्सही तयार करता येतात आजीला. तेही करून घेणारेय ती अथर्व व राधाकडून!’’ लोकरीचा दुसरा गुंडा म्हणाला. आता मात्र अथर्वची झोप एकदम उडाली. तो कान देऊन ऐकू लागला. खोक्यात कोणीतरी डुगडुगत म्हणत होतं,

‘‘माझ्यावरही रंग, सुतळ आणि लोकर चिकटवणार आहेत ते.. आणि सुंदर फुलदाणी होणार माझी.’’ काय असेल हे? असा विचार अथर्वला पडेपर्यंत आतून आवाज आला, ‘‘अरे बुडकुल्यांनो, सुतळीपासून पायपुसणी आणि शोभेच्या वस्तूही तयार करते बरं का आजी. आणि रंग काही फक्त तुम्हालाच लागणार नाहीयेत. आम्हालाही लागणार आहेत बरं! आजी पाण्यावर रंग टाकून त्यात आम्हाला बुडवते आणि भेटवस्तूंना गुंडाळण्यासाठी मस्त मार्बल पेपर तयार करते.’’ या बोलण्यावरून अथर्वने ताडलं की या बॉक्समध्ये मातीची छोटी छोटी बुडकुली, कागद, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत. त्यावर दुसरा कागद म्हणाला, ‘‘आत्या कॅलिग्राफी शिकलीय. ती करणारेय माझ्यावर- म्हणून वेगवेगळ्या प्रकारची पेन्सही घेऊन आलीय ती. आजोबा तर ओरिगामीही सुंदर करतात ना!’’

‘‘हो रे.. पण या पेन्सिल्स कशाला आमच्याबरोबर?’’ एक पेन किरकिरलं.

‘‘कशाला काय, चित्र काढायला आणि ती रंगवायला.’’ पेन्सिलने हसत हसत उत्तर दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘बाजूच्या पिशवीत खडे, मणी आहेत, ते कशाला, विचारशील आता..’’ पेन्सिल हसत हसत म्हणाली. हे सगळं ऐकल्यावर अथर्वला त्या पेटीमध्ये काय आहे याचा एकंदर अंदाज आला होता. तो तसाच उठून आजीकडे गेला आणि आजीला जोरजोराने हलवत म्हणाला, ‘‘आजी.. आजी, त्या पेटीत काय आहे ते समजलंय मला. त्या पेटीत आमच्या मेंदूचं टॉनिक आहे आणि मी आता काय करू, याचं औषध.’’ आणि परत येऊन तो आपल्या जागेवर झोपलाही. आजीने उठून घडय़ाळात पाहिलं तर पहाटेचे चार वाजले होते.