अंजली मदन यावलकर सहावी ‘अ’च्या वर्गात टकले बाई इतिहासाचा तास घेत होत्या. संगीता, मेधा, विनय सगळे मन लावून धडा वाचत होते आणि अचानक प्रज्ञाच्या पायाला काहीतरी मऊ मऊ लागलं. ती जाम घाबरली. खाली वाकून पाहते तर एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू वर्गात आलेलं. प्रज्ञा आणि मनीषा जाम घाबरल्या, त्यांनी एकच गलका केला. अपर्णा तर घाबरून बेंचवर उभी राहिली. सगळे बेंचखाली वाकून बघू लागले. एक छोटंसं विटकरी रंगाचं गुबगुबीत कुत्र्याचं पिल्लू खेळता खेळता चुकून मैदानातून वर्गात आलं होतं. टकले बाईंच्याही लक्षात आलं की वर्गात काही तरी गोंधळ झाला आहे. ते पिल्लू आधी बेंचच्या पायांमध्ये अडखळत होतं आणि वर मुलींचा गलका ऐकून ते बावचळलं. त्याला कळेना कुठून बाहेर पडायचं. ऊर्मिला त्याला उचलायला गेली तर ते आणखीन दूर पळू लागलं. ऊर्मिलाला तर कळेचना की, एवढंस पिल्लू वर्गात आलं तर एवढा गोंधळ कशाला करायचा. तिनं ते पिल्लू दोन्ही हातांनी अलगद उचललं आणि मैदानात सोडून दिलं. आता टकले बाईंनी मुलांचा मूड बघून त्यांना प्राणी प्रेम शिकवायचं ठरवलं. त्यांनी विचारलं, ‘‘अपर्णा, प्रज्ञा, एवढं घाबरण्यासारखं काही झालं होतं का? अपर्णा, तू घरी एक पिंटू मांजर पाळलं आहेस ना? झोपताना तू त्याला जवळ घेऊन झोपतेस ना? घरात अभ्यास करताना ते तुझ्या टेबलावर असतं ना?’’ ‘‘पण बाई, माझा पिंटू खूप गोड आहे. मी घरी गेले की धावत येतो आणि माझ्या पायांमध्ये.’ अपर्णा अगदी आनंदानं बाईंना सांगत होती. बाई म्हणाल्या, ‘‘तुझ्या घरी पाळलंय ते मांजर पाळीव आहे. त्याला तुझी, तुझ्या ताईची सवय आहे. हे पिल्लू बाहेरून आलंय, त्याला तुमची ओळख व्हायला वेळ लागेल. हे बघा, ते पिल्लू चुकून बागडत बागडत वर्गात आलं. तो आपला आजचा पाहुणा आहे, आपण घरच्या पाळीव प्राण्यांना प्रेम देतो, त्यांचे लाड करतो तसंच याचेही करायचे, असं आरडाओरडा करून त्याला घाबरवायचं नाही.’’ ‘‘बाई, ही अपर्णा नेहमी वर्गात ती ‘मेरी हॅड ए लिटल लॅम्ब’ कविता मोठय़ानं म्हणत असते. मग खरंखुरं पिल्लू आलं तर कशाला ओरडायचं?’’ इति आनंद ‘‘अरे, ते कवितेत असतं, खरंखुरं पिल्लू असं कधी वर्गात येतं का?’’ अभयनं आपली लगेच टिप्पणी जोडली. ‘‘आता पिल्लू आलं की आपण त्याला बिस्किट देवू या का? म्हणजे ते आपल्यात रुळेल.’’ अंजू म्हणाली. अंजूचं गणित कच्चं आहे हे माहीत असल्यामुळे, विनोद लगेच म्हणाला, ‘‘तो काही तुझं गणित सोडवायला मदत करणार नाही.’’ यावर मुलांमध्ये खसखस पिकली. ‘‘आमच्या घरचा मुकू पेपर आला की पळत जाऊन आजोबांना पेपर नेऊन देतो. पण त्याला सगळं शिकवावं लागतं. त्याला शिकवायला बाबांनी एक डॉग ट्रेनर ठेवलाय. लहान पिल्लाला एक गोष्ट शिकवायला ट्रेनरला १५ दिवस लागतात.’’ विनयनं माहिती पुरवली. त्यावर राजश्री म्हणाली, ‘‘बाई आमचा रॉबीन आहे ना तो माझी छोटी बहीण चिनूला ताप आला की दोन दिवस काहीच खात नाही. चिनूच्या पाळण्याशी बसून असतो. मला नेहमी आश्चर्य वाटतं की, रॉबीनला बोलता येत नाही, तरीही त्याला कसं कळतं चिनू आजारी आहे?’’ ‘‘मुक्या प्राण्यांचीही भाषा असते, त्यांना वासानं माणसं ओळखता येतात. ते पोलिसांना चोर शोधायला मदत करतात.’’ संगीता म्हणाली. नितीननं एक माहिती जोडली, ‘‘आपलं लहान मुलांचं पाळणा घर असतं तसं कुत्र्यांचंही पाळणाघर असतं, आम्ही गावाला गेलो की आई आमच्या चार्लीला तिथेच ठेवते.’’ बाईंनी मुलांचा मूड बघून गाणं सुरू केलं आणि मग बाईंबरोबर सगळे म्हणायला लागले. ‘‘यू यू पपी पपी आपण खेळू लपाछपी लपेन मी सांधीत असा हुडकून तू मज काढ कसा!!’’ गाणं सुरू असतानाच ते पिल्लू दुडुदुडु धावत पुन्हा वर्गात आलं. आता अंजू पहिल्या बेंचवर असल्यामुळे ते तिच्याच पायाखाली गेलं. पण आता अंजू ओरडायच्या आधीच गौरीनं तिच्या तोंडावर हात ठेवला. मग गौरी म्हणाली, ‘‘ऊर्मिला, आता तू नाही तर अंजूनं ते पिल्लू बाहेर सोडून यायचं. अंजूनं त्याला प्रेमानं उचललं त्या दोघी त्याला मैदानाच्या पलीकडे पिल्लाची आई होती तिथे सोडून आल्या. mryawalkar@gmail.com