|| रूपाली ठोंबरे

‘‘आई, तू या ओमला सांगून ठेव बरं का! तो सारखा माझी शंखांची रांग विस्कटतो आहे.’’ चौथीला शिकत असलेली समीक्षा तिचे सारे इवले इवलेसे काळपट-धूसर पांढरे शंख पुन्हा रांगांमध्ये रचत आपल्या छोटय़ा भावाची तक्रार करत होती.

‘‘अगं आई, पण मी खरंच काही केलं नाही. ही तेव्हापण अशी उगाचच ओरडली मला.’’

छोटा ओम अगदी काकुळतीला येऊन आपली खरी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता.

‘‘समी, सकाळपासून काय गोंधळ सुरू आहे तुझा? ते शंख ठेव बरं आता. आणि हा डबा जोशीकाकूंकडे देऊन ये. खमंग अनारसे केलेत मी काल. त्यांच्या रोहितला खूप आवडतात. आणि हो, या ओमलापण सोबत घेऊन जा. मग ते दोघं चित्रं काढत बसतील तिथे.’’

आईच्या हातातला स्टीलचा गोल डबा एका हातात आणि दुसऱ्या हाताने ओमचा हात ओढत काहीशा नाराजीनेच समीक्षाने काही तासांपूर्वीच गट्टी जमलेल्या शंखांचा निरोप घेऊन घराबाहेर पाऊल टाकलं.

‘‘आई, काय गं तू? पुन्हा माझी रांग अशी कशी विस्कटली? तू ना, झाडू काढला असशील इथे. काय तू?’’

गेली १५ मिनिटे मिळालेली शांतता. ही अशा प्रकारे एका क्षणात भंग झाली आणि आई आपला कणकेचा हात तसाच घेऊन हॉलमध्ये आली; तेव्हा समीक्षाची शंखांची रांग पुन्हा दोन घरं पुढे आली होती, आणि तीही वेडय़ावाकडय़ा स्थितीत. समीक्षा काहीतरी पुटपुटत पुन्हा ते सर्व शंख शिस्तीत रचण्याचा मनापासून प्रयत्न करत होती.

‘‘हे बघ समी, मी तुम्ही गेल्यापासून स्वयंपाकघरातून बाहेरदेखील आलेले नाही. मला नाही माहीत हे कसे झाले. तू आणि तुझे ते शंख.. कसला उपद्व्याप घेऊन आली आहेस कोण जाणे. तूच पहारा ठेवत बस आता. मला कामं आहेत. बाबा येतील आता थोडय़ाच वेळात.’’

दुपारच्या जेवणाच्या घाईत असलेली वैतागलेली आई तशीच स्वयंपाकघरात निघून गेली. समीक्षा मात्र तिथे समाधी लागल्यासारखी बसून होती. तिच्या शंखांकडे एकटक पाहत. आज पहाटेच तिने दादासोबत खाडीच्या परिसरात जाऊन हे शंख वेचून आणले होते. तिच्या शाळेत कार्यानुभवाच्या तासाला मत्स्यालय बनवण्याचं ठरलं होतं. आणि त्यासाठीच तिचा हा सर्व खटाटोप सुरू होता. तिच्या आईने तिला दुकानातून शुभ्र शिंपले आणून देण्याची कल्पना सुचवली होती. पण समीक्षावर मात्र गेल्या आठवडय़ात खाडीकिनारी पाहिलेल्या नाजूक, सुंदर नक्षीदार शंखांनी भुरळ घातली होती. भरतीसोबत किनाऱ्यावर येऊन वाळूत रुतलेले शंख काळपट असले तरी खूप आकर्षक वाटायचे तिला. आज ते घरी आणल्यापासून तिने २-३ वेळा स्वच्छ पाण्यात धुतले आणि हॉलमध्येच एका रांगेत रचून ठेवले होते. पण सकाळपासून चार वेळा ती रांग या ना त्या कारणांमुळे विस्कटली गेली होती. आणि समीक्षा मात्र प्रत्येक वेळी तितक्याच तल्लीनतेने विस्कटलेले शंख शिस्तीत मांडत होती. शंखांच्या रचनेबाबत तिला फार कुतूहल वाटत होतं.

असा बराच काळ गेला आणि त्यानंतर समीक्षाने जे पाहिलं ते पाहून तिचा श्वासच काही क्षणांसाठी रोखला. तिने रांगेत रचलेल्या शंखांपकी काही शंखांमध्ये तिला काही हालचाल जाणवली.. आपोआपच. ते शंख त्यांच्या वेडय़ावाकडय़ा चालीत वेगवेगळ्या दिशेला अगदी संथपणे सरकत होते. समीक्षाला तर काहीच सुचेना. ती जितकी घाबरली. त्यापेक्षा अधिक चकित झाली होती. एव्हाना तिच्या हाकेमुळे आई पुन्हा धावत आली. समोर घडणारा प्रकार आईसाठीदेखील नवीन आणि न कळणारा होता. इतक्यात तिचे बाबा घरी आले. दोघींनी घडला प्रकार घाईघाईत त्यांना सांगितला. पण बाबांच्या चेहऱ्यावर भीतीच्या जागी स्मित होतं. त्यांनी समीक्षाला जवळ घेऊन त्यातला एक शंख हाती घेतला.

‘‘समीक्षा, अगं, हे एक विशिष्ट शंख असतात, ज्यात काही छोटे समुद्री जीव राहत असतात. तू शंख आणलेस. ते पाण्यातही धुतलेस, त्यामुळे ते अजूनही आत जिवंत आहेत. या शंखांतील तो जिवंत असलेला जीव हेच या जादुई हालचालीचं कारण आहे. निसर्गाने उत्पन्न केलेली ही करामत. आहे ना ही बिनपावलाची जादुई चाल?’’

मुळात जिज्ञासू असलेल्या समीक्षाला ही नवी माहिती फार आवडली. उत्सुकतेने होकार देत बाबांच्या हातातला तो शंख तिने दोन बोटांच्या मधे धरला. ती कितीतरी वेळ त्या चिमुकल्या जिवाला त्याच्या आसऱ्यासकट चौफेर फिरवून त्याचे निरीक्षण करू लागली. आणि तिचे आई-बाबा मोठय़ा कुतूहलाने तिच्याकडे पाहत राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rupali.d21@gmail.com