कुणाला परीक्षेत चांगले गुण मिळाले, कुणी खेळात प्रावीण्य मिळवलं, कोणी एखाद्या स्पर्धेत झळकला, किंवा कोणाच्याही यशावर वा प्रगतीवर पटकन मारला जाणारा शेरा म्हणजे- ‘तुमचं/ त्यांचं आपलं बरं!’ मित्रमैत्रिणीसमोर अनेकदा स्पष्टपणे हा शेरा मारला जातो; पण इतरांबाबत मनातल्या मनात हा शेरा मारला जातोच. ‘तुमचं किंवा त्यांचं आपलं बरं!’ असं म्हणताना आपण आपलं कसं वाईट आहे याची एक यादीच टाईप करत असतो. तुम्ही/ ते काय हुश्शार, तुम्ही/ ते काय श्रीमंत, शहरात राहणारे तुम्ही/ ते, दिसायला सुंदरच आहात बुवा तुम्ही/ ते.. यांसारख्या अनेक गोष्टींची जंत्री- तुमचं किंवा त्यांचं आपलं बरं- यात येते. आणि सहजगत्या त्यांना मिळालेल्या यशाचं किंवा झालेल्या प्रगतीचं कारण हे ‘तुमचं किंवा त्यांचं बरं’ या एका वाक्यात दिलं जातं. त्याचबरोबरच माझी प्रगती का खुंटली किंवा मला अपयश का आलं, याचं उत्तरही तेच दिलं जातं. यातून पुढे काय घडेल? तर प्रगतीचा किंवा यशाचा मार्ग शोधण्याची इच्छाच खुंटेल आणि इतरांचं बरं शोधता शोधता ‘आपला’ विचारच राहून जाईल. कारणं शोधायची आणि द्यायची वृत्ती बळावेल. आणि ते सोप्पं असल्याने तेच बरं वाटायला लागेल. म्हणूनच हा हितशत्रू जर का तुमच्या मनात मूळ धरत असेल तर त्याला आत्ताच मुळापासून उखडून तर टाकाच; पण त्याचं मूळ कुठे रुजणार नाही याचीही काळजी घ्या. ज्या-ज्या वेळी आपल्या अपयशाचं किंवा अप्रगतीचं असं कारण द्यावंसं वाटेल; तेव्हा तेव्हा आपलं काय काय बरं आहे ते वापरून ‘मी’ यश किंवा प्रगती कोणती आणि कोणत्या टप्प्यापर्यंत साधू शकतो, याचा नक्की विचार करा. आणि अजून एक बरं का! ज्यांचं आपलं बरं असं तुम्ही म्हणताय ना, त्यांच्यासमोर ताडकन् असं विधान करू नका. काही वेळा असं असतं की, त्यांचं आपलं बरं असं वरवर तुम्हाला वाटत असतं, पण काही वेळा ते अशा काही संकटात किंवा दु:खात असतात, की तुमच्या या विधानाने तुम्ही त्यांना खूप मोठ्ठी ठेच पोहोचवत आहात, हे तुमच्या गावीही नसतं. पण अजाणताही असा त्रास देणं वाईटच नाही का?

– मेघना जोशी

joshimeghana231@yahoo.in