|| मेघना जोशी

‘त्यात काय झालं?’ हे आई-बाबा किंवा शिक्षकांना अनेक मुलांकडून अनेकदा ऐकावं लागणारं वाक्य. पहिल्या पहिल्यांदा अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये असं म्हटलं जातं आणि मग सरावाने ती सवयच होते. रोजचा गृहपाठ रोज नाही केला तर.. ‘त्यात काय झालं?’ असं म्हणता म्हणता पदवीचा अभ्यास करण्यासाठी रात्र रात्र जागावं लागतं. टॉवेलची घडी वेळच्या वेळी करून नाही ठेवली तर.. ‘त्यात काय झालं?’ असं म्हणताना ‘तुमची खोली म्हणजे नुसता पसारा,’असं म्हणून कपाळावर हात मारायची पाळी येते.

‘त्यात काय झालं?’ असं म्हणताना खूपच तात्कालिक विचार केला जातो. अनेकदा अनेक गोष्टी योग्य रीतीने करण्यामागे खूप दूरवरचे विचार किंवा कारणं असतात. अगदी बघा नं, हात स्वच्छ धुवावेत ही किती साधी गोष्ट आहे की नाही? पण ‘त्यात काय झालं?’ असं म्हणत आपण आपलेच हात फक्त धुतल्यासारखे करतो किंवा धूतच नाही. बरं, याचा लगेचच काही परिणाम दिसतो का? नक्कीच नाही. पण जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा त्याचं मूळ कारण या हात स्वच्छ न धुण्यात असतं. हे असं अनेक गोष्टींबाबत सांगता येईल. राष्ट्रगीतासाठी काही सेकंद उभं राहणं, कोणतेही शिस्तीचे नियम पाळणं, बोलताना योग्य व अचूक शब्दांचा आणि भाषेचा वापर करणं, मोठय़ांचा आदर करणं, वाहतुकीचे नियम पाळणं आणि पाण्याचा नळ आवश्यक नसेल तर बंद करणं.. आणि बरंच काही, ज्यामध्ये अनेक लहानथोर हा प्रश्न विचारतात. आता यापुढे असं करून पाहा बरं- जेव्हा असा प्रश्न पडेल तेव्हा त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी थोडासा पुढचा- म्हणजे पुढच्या काही दिवसांचा, महिन्यांचा अगर वर्षांचा विचार करायचा; आणि जेव्हा काही अयोग्य होणारच नाही अशी खात्री होईल तेव्हाच ताठय़ात विचारायचं, ‘त्यात काय झालं?’ नाहीतर आपलं गप्प बसावं आणि ठरलेलं आहे ते करावं, हे बरं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

joshimeghana231@yahoo.in