|| डॉ. नंदा हरम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकमेकांना मदत केली तर दोघांचाही उत्कर्षच होतो. याची अनेक उदाहरण आपल्या आजूबाजूला दिसतात. जीवसृष्टीही याला अपवाद नाही. एक रंजक उदाहरण बघूया. विशिष्ट प्रकारच्या मुंग्या आणि सुरवंट यांच्यातील सहजीवनाचं! कदाचित प्रथमच तुम्ही हे ऐकत असाल.

काही विशिष्ट प्रकारच्या सुरवंटांत (ज्यातून पुढे फुलपाखरू बाहेर पडते) त्यांच्या विशिष्ट अवस्थेतून तीन प्रकारचे अवयव निर्माण होतात, जे खास मुंग्यांकरिता असतात. असं गोंधळून जाऊ नका, सांगते, यातील लक्षणीय अवयव म्हणजे मधुरसाच्या ग्रंथीची जोडी, जी सुरवंटाच्या मागच्या भागातून बाहेर डोकावते. ही रबरी हातमोजाच्या बोटासारखी दिसते. जेव्हा मुंगी आपल्या स्पृशेने सुरवंटाच्या मागच्या बाजूला ढुशी देते, तेव्हा सुरवंटाची ही ग्रंथी बाहेर येते. ग्रंथीच्या टोकातून स्वच्छ रस स्रवतो. मुंगी अगदी उत्सुकतेने त्या रसाचं सेवन करते. सुरवंट ग्रंथी आत ओढून घेतो. मुंग्यांना तो रस इतका आवडतो की त्या ढुश्या देत बसतात, साधारण मिनिटाला एक या प्रमाणे. खरं म्हणजे झाडावरचा पुष्पबाह्य मधुरसही मुंग्या सेवन करू शकतात. पण त्यांना सुरवंटाकडून मिळणारा मधुरसच आवडतो, कारण त्यात जास्त प्रमाणात अमिनो अ‍ॅसिडस् असतात. थोडक्यात-जास्त पौष्टिक! मुंग्यांना अन्न मिळतं, त्या बदल्यात त्या वारुळात न परतता सुरवंटाजवळ आठवडाभर राहतात.

याची मेख आहे सुरवंटाच्या दुसऱ्या अवयवात!  हा अवयव म्हणजे टेन्टॅकलची (वळणारी, सोंडेसारखी) जोडी, जी डोक्याच्या मागच्या भागातून बाहेर पडते. याच्या टोकाला ब्रशप्रमाणे तंतू असतात. या टेन्टॅकल्यांमधून बाहेर पडणाऱ्या रसायनाचा मुंग्यांवर असा परिणाम होतो की त्या आक्रमक होतात आणि शत्रूवर हल्ला करतात. म्हणजेच सुरवंटाचं रक्षण त्या करतात.

तिसरा अवयव म्हणजे डोक्याच्या वरून बाहेर येणाऱ्या छोटय़ा, लवचीक, दांडय़ासारख्या दिसणाऱ्या पिंडीकाची जोडी. जेव्हा सुरवंट डोकं आत-बाहर करतो, तेव्हा या पिंडिकांद्वारे स्पंदनं तयार होतात. हा आवाज मुंग्यांना कळतो. त्यामुळे जास्तीत जास्त मुंग्या सुरवंटाजवळ असतात; त्याचं रक्षण करायला! किती छान आहे ना, एकमेकांच्या मदतीनं फुलणारं हे सहजीवन!

nandaharam2012@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moral story for kids
First published on: 19-05-2019 at 00:03 IST