बालमैफल:थाळीचित्र

मित्रांनो, या मे महिन्यात आपण विविध कॉम्बिनेशनचं गोल पुस्तक बनवलं, पदार्थाचे फोटो काढून त्यावर डिजिटली काम केलं, वर्तमानपत्र वापरून चिकन आणि वडापाव बनवला.

श्रीनिवास बाळकृष्ण
मित्रांनो, या मे महिन्यात आपण विविध कॉम्बिनेशनचं गोल पुस्तक बनवलं, पदार्थाचे फोटो काढून त्यावर डिजिटली काम केलं, वर्तमानपत्र वापरून चिकन आणि वडापाव बनवला. आता आपल्याला अन्नपदार्थासंबंधित आणखी एक मजेदार कृती करायची आहे. करायला एकदमच सोपं असं फूड आर्ट आहे हे! सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी मला हे सुचलं. झालं काय, मी एका फूड कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. दोनएक तास खूप कष्ट घेऊनही माझ्याकडून शहामृगाच्या अंडय़ाचे हाफफ्राय काही बनेना. ते जाम करपलं. पण त्यातून मला एक कल्पना सुचली. त्या करपलेल्या काळय़ा अंडय़ाला कापून मी डोंगराचा आकार दिला. त्यात कोंबडीचे छोटे पिवळे बलक सूर्य म्हणून ठेवले.
पदार्थ खराब झाला असला तरी दिसायला सुंदर म्हणून मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. अगदी हेच आपल्याला आज करायचं आहे. मित्रांनो, रंगाच्या पॅलेटमध्ये जितके रंग असतात त्याहून जास्त किचनमधल्या अन्नपदार्थाचे रंग असतात. ते बघायला शिकलात की फूड आर्ट करणं सोपं आहे. कारण रंग आणि काही आकार तर रेडिमेड मिळणार आहेत. रंगीत फळं, फळभाज्या, कडधान्य, पाव, चपाती, भात फळं यांना थाळीवर मांडून सोपे आकार बनवायचे आहेत.
ही थाळी पांढरीशुभ्र स्वच्छ असेल तर फारच उत्तम. नसेल तर एकाच रंगाची घ्या. आपल्याकडल्या असलेल्या वस्तूंपासून काय बनवता येऊ शकेल हे आधी ठरवा. समजा, तो पदार्थ त्या आकारात नसेल तर चाकूने (मोठय़ांच्या मदतीने) हव्या त्या आकारात नीट कापून घ्या. अनेक तुकडय़ांचा मिळून एक आकार होऊ शकतोच.
असे मस्त आकार तुम्ही लग्नाच्या फूड स्टॉलवर सजावटीसाठी केलेले पाहिले असतील. पण ते खूपच प्रो आहेत ब्रो! मला तरी इतकं भारी जमणार नाही. एक आकार बनवताना दहा ठिकाणी कापून घेईन मी!
म्हणून आपल्याला साधेच आकार बनवायचे आहेत आणि थाळीवर आडवे मांडायचे आहेत.
हे करण्यातून दोन फायदे होणारेत. एक, तुम्ही खाण्याच्या रंगांकडे नीट पाहायला शिकाल. कच्च्या-पक्क्या एकाच फळांचे रंग वेगवेगळे होतात. ताज्या आणि शिळय़ा भाज्या वेगळय़ा रंगात बदलतात. अंडी, पाव, भात यातही रंगबदल असतो. असो. तुम्हाला रंगांच्या शेड्सची समज असेल तर दोन जवळजवळच्या रंगांना बाजूबाजूला ठेवून अधिक मस्त रंगवता येईल.
दुसरा फायदा म्हणजे, पदार्थ वाईट्ट बनला असेल तरी असा सजवून पाहुण्यांकडे खपवू शकण्याची युक्ती तुम्ही आई-बाबाला देऊ शकाल. पाहुणेही आवडीने खातील, कारण पदार्थ तोंडासोबत डोळय़ांनीही खाल्ला जातो.
एक मात्र करा, हे आकार बनवत असताना यात कुठलाही असा पदार्थ आणू नका, जो खाताच येणार नाही. नाहीतर प्लेटमधलं सर्व अन्न फुकट जाईल. माझ्यासारखंच तुम्हालाही ते अजिबात आवडणार नाही, होय ना!
shriba29@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल ( Balmaifalya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Plate round book of combinations food competition amy

Next Story
कोकबनची सहल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी