मुलांनी कोणती पुस्तके वाचावीत यासाठी या स्तंभात आजपर्यंत आपण खास लहान मुलांसाठी लेखकांनी लिहिलेली पुस्तके असाच परीघ निवडला. किंबहुना आपण विचार तसाच करतो. परंतु ललित साहित्यातील अशी कितीतरी उत्कृष्ट पुस्तके आहेत, त्या पुस्तकांचा परिचय मुलांना व्हायला हवा. तेव्हा मुलांसाठीची पुस्तके या संकल्पनेचा थोडा विस्तार करायला हवा. साधारणत: ६ वी ते १० वीची मुले मराठीतील काही प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचू शकतात असे नक्कीच वाटते. फारतर काही ठिकाणी त्यांना शब्द किंवा संकल्पनांसाठी पालक/ शिक्षकांची मदत लागू शकते. तेव्हा या भागात पुस्तकांऐवजी लेखक सुचवतो.
पु. ल. देशपांडे यांनी रेखाटलेली व्यक्तिचित्रे मुले नक्कीच आवडीने वाचू शकतात. बटाटय़ाची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, पूर्वरंग अशा अनेक पुस्तकांतील निवडक भाग मुले आवडीने वाचतील. यामुळे मुलांची विनोदबुद्धी विकसित होईल. हरितात्या, चितळे मास्टर आदी अनेक व्यक्तिचित्रे मुलांना आवडतात.
दुर्गा भागवत यांना मुलांसाठी आपण विचारात घेत नाही. पण ‘पैस’सारखे पुस्तक पालकांच्या मदतीने वाचले तर संस्कृती, निसर्ग याबरोबर सुंदर मराठी लिहिणे काय असते, याचा नकळत संस्कार मुलांवर होतो. नदीविषयी किती कृतज्ञ व सुंदर लिहिले जाऊ शकते याची जाणीव होते.
प्रकाश नारायण संत या लेखकाच्या प्रेमात एक अख्खी मराठी पिढी पडलेली आहे. या लेखकाने ‘वनवास’ व ‘शारदा संगीत’ या पुस्तकांत विस्तृतपणे लंपन या मुलाचे भावविश्व रेखाटले आहे. हा लंपन अनेक कुटुंबांचा भाग बनला आहे. हा मुलगा जवळचा यासाठी वाटतो, की तो अचाट, अविश्वसनीय काही न करता आपल्या मुलांसारखे जगतो. यात आपल्याला घर, शाळा, सायकल असे आपलेच मध्यमवर्गीय जग दिसत राहते. ही पुस्तके व संतांची अन्य पुस्तकेही मुलांनी वाचायला हवीत.
व्यंकटेश माडगूळकर यांची पुस्तके व व्यक्तिचित्रे मुलांनी वाचावी अशी नक्कीच आहेत. विशेषत: ‘बनगरवाडी’ ही अजरामर कलाकृती तर मुलांना खूप आवडेल. ती शाळा, ते गाव, त्या मेंढय़ा, त्यांचा आवाज, लहान वयाचे गुरुजी, गावकरी, बाजार, दुष्काळ, माणदेशी भाषा हे सारं सारं मनात रुतून राहतं. मुले तर बनगरवाडीच्या प्रेमातच पडतील. बनगरवाडीची शाळा मराठी माणसाच्या भावविश्वाचा भाग आहे. नव्या पिढीच्या मुलांनीही ते वाचायला हवे.
ग्रामीण साहित्यात आनंद यादव यांसारखे लेखक व त्यांचा काही लेखनातील भाग निवडून मुलांना वाचायला लावावा. शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांचे विनोदी लेखन व व्यक्तीचित्रणाचा परिचय  मुलांना नक्की आवडेल. भास्कर चंदनशिव यांची ‘लाल चिखल’ वाचताना डोळ्यांत पाणी आलेली मुले मी बघितलीत. तेव्हा मुलांना हे कळणार नाही असा गैरसमज मोठय़ांनी करू नये. पुन्हा प्रत्येक मुलांचे आकलन व वाचनातून तयार झालेली नजर पुढे जात असते. त्यातून तो अधिक पुढच्या कलाकृतीही वाचू शकतो. तेव्हा शिक्षक-पालकांनी चष्म्याचा डॉक्टर जशी एक-एक काच लावून बघत असतो तसे एक एक पुस्तक देत वाचनाचा नंबर नक्की करावा. तो प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onवाचनReading
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reading list
First published on: 09-11-2014 at 01:37 IST