सुलभा आरोसकर

रोलीतली संजीवन दीप संमिश्र शाळा ही जरा वेगळीच. वेगळीच म्हणजे आमची शाळा भिन्नमती, कर्णबधिर मुलांची. या वर्षी आम्ही आमच्या शाळेत जरा वेगळ्या पद्धतीनंच होळी साजरी केली. आमच्या विशेष शाळेच्या शैक्षणिक सल्लागार विजयाताई खडकीकर यांच्याशी गप्पा मारायला मुलं गोळा झाली. आमच्या गप्पा म्हणजे खाणाखुणांसहीत संवाद अर्थात भाषेसोबत साईन लॅंग्वेजही. आमच्याकडील भिन्नमती मुलंही संवादात छान तरबेज झालेली…

तर बाईंनी मुलांना सांगितलं, ‘‘मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन त्याची अगदी खरी खरी उत्तर द्यायची हं.’’

मुलांनी ‘हो’ म्हटलं.

‘‘शाळेत उशिरा कोण येतं?’’

तीन-चार मुलांनी हात वर केले.

‘‘यामागचं कारण काय माहितीय का? आळस. शिवाय रात्री आई-बाबांबरोबर टी. व्ही. बघत बसता ना!’’

‘हो’अर्थी मुलांनी माना डोलवल्या.

‘‘या सवयी चांगल्या नाहीत ना.’’

त्यावर मुलं ‘नाही’ असं मान डोलवत म्हणाली.

‘‘सांगा, वर्गात मारामारी, भांडण, एकमेकांवर रागावणं, उगाचंच खोड्या काढणं. कोण कोण करतं? या गोष्टी चांगल्या आहेत की वाईट.’’

यावर सर्व मुलं गप्प झाली. हळूच दोन- तीन मुलं म्हणाली, ‘‘हो आम्ही करतो. त्या गोष्टी वाईट आहेत, पण आम्हाला मजा वाटते.’’

‘‘तुम्हाला मजा वाटते, पण दुसऱ्याला त्याचा त्रास होतो असं तुम्हाला नाही का वाटतं.’’

बाईंच्या या प्रश्नावर सर्वजण पुन्हा शांत झाले. तेवढ्यात मुख्याध्यापिका पायल गंगावणे मॅडम म्हणाल्या, ‘‘असं करूया, ज्यांना लिहिता येतं, त्यांनी वाईट गोष्टी कोणत्या ते एका चिठ्ठीवर लिहा. मात्र एका चिठ्ठीवर एकच वाईट गुण किंवा वाईट सवय लिहायची.’’

मग काय, पायल, नमिता, कल्पना, राखी, भाग्यश्री या शिक्षिका आणि प्रथमेश सर, नितीन सर, वीणा, शमिता, स्वाती मॅडम आणि हो आमच्या हाकेला धावून येणारी मदतनीस दक्षता मावशी या सर्वांच्या सहकार्यानं भरभर कागदावर उतरलं…

कशाचाही आळस करणं…

रात्री उशिरापर्यंत टी. व्ही. बघणं…

मारामारी करणं, खोटं बोलणं…

जेवताना ताटात अन्न वाया घालवणं…

एकमेकांशी भांडत बसणं…

अशा एक ना दोन तर ५०-५५ चिठ्ठ्या हा हा म्हणता तयार झाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मग बाईंनी मुलांना प्रत्येकाला एकेक चिठ्ठी हातात घ्यायला सांगितली आणि होळी पेटवल्यावर प्रत्येकाला एक एक चिठ्ठी त्यात टाकायला सांगितली. म्हणजे वाईट गुणांच्या सर्व चिठ्ठ्या त्या होळीत जळून खाक झाल्या. ‘होळी रे होळी… चिठ्ठ्यांची होळी…’ असं म्हणत मुलांनी आणि शिक्षकांनी पेटत्या होळीत चिठ्ठ्या टाकल्या. आम्ही सगळे होळीभोवती नाचायला लागलो. त्यापाठोपाठ ‘रंगात रंगला श्रीरंग’ असा खेळ सुरू झाला. आमच्या संजीवन दीप शाळेचं पूर्ण मैदान आनंदात न्हाऊन गेलं…