‘‘… आणि हा आपला पहिला गणपती.’’ ब्लॅक-अँड-व्हाइट फोटोंचा अल्बम बघता बघता आजोबा त्यांच्या नातीला- अनूला सांगत होते, ‘‘१९४५ साली माझा जन्म झाला तेव्हा माझ्या काकाने तो सुरू केला, दहा दिवसांसाठी! हा फोटो त्याच्या एका फोटोग्राफर मित्राने काढला होता! दुसरं महायुद्ध तेव्हा संपत आलं होतं.’’

चाळीतल्या घरी अनू तब्बल पाच वर्षांनी आली होती. इतके दिवस बंद असलेलं घर आजी-आजोबांनी नुकतंच साफ करून घेतलं होतं. दोन-तीन दिवसांतच येणाऱ्या गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी घरी सुरू होती. अनूच्या शाळेला आज सुट्टी होती म्हणून ती हट्टाने आजी-आजोबांच्या मदतीला सकाळपासूनच आली होती. संध्याकाळपर्यंत शाळा- कॉलेज- ऑफिस आटपून इतर मंडळी जमणार होती.

‘‘गणपती आणि माझं वय सारखंच, त्यामुळे यंदा त्याचाही ‘सहस्राचंद्र’दर्शन सोहळा!’’ आजोबा म्हणाले.

‘‘गणपती आणि चांदोबाचं खरं तर भांडण!’’ अनू म्हणाली.

‘‘अरे हो! गणपतीचं वाहन उंदीरमामा. त्यावरून एकदा ते पडले आणि चांदोमामा हसले. म्हणून त्यांची कट्टी झाली, पण आपल्या गणपतीचा योग आलाच १००० पौर्णिमा म्हणजे ‘सहस्राचंद्र’ पाहण्याचा! आहे की नाही गंमत?’’

‘‘आजोबा, आता आपली चाळही पडणार, महिन्याभरातच ‘री-डेव्हलपमेंट’ला जाणार!’’

‘‘म्हणून सगळ्यांच्या आग्रहाखातर गणपतीला यंदा इथं आणण्याचा घाट! या दोन खोल्यांमध्ये तुझी आई, मावशी, मामा, आजी, मी, माझे काका, पणजी-आजी, पणजोबा असे एकूण आठ जण राहत होतो. खूप आठवणी आहेत इथल्या!’’

‘‘हे कोणेत?’’ पुढच्या एका फोटोमध्ये आजोबांच्या शेजारी उभ्या असलेल्या इसमाकडे बोट दाखवत अनूने विचारलं.

‘‘हा, आमचा रशीदभाई. चाळीतल्या सगळ्या घरांच्या गणपतींचं तो गिरगाव चौपाटीला विसर्जन करायचा. एकदम पट्टीचा पोहणारा! डोक्यावर पाट धरून, लाटांना अंगावर घेत प्रत्येक घरच्या गणपतीचं विसर्जन करताना ‘गणपती बाप्पा मोरया’ची आरोळी देत, गणेशाची मूर्ती समुद्राला अर्पण करायचा. बाहेर यायचा तेव्हा डोळे पाणावलेले असायचे त्याचे! चाळीतलं एकमेव मुस्लीम बिऱ्हाड. गणपतीच्या दहा दिवसांत नॉन-व्हेज खायचे नाहीत. गणपतीची भारी आवड त्याला! विसर्जन झाल्यानंतर समुद्रामध्ये मूर्तींचा खच साफ करायला हा सर्वांत पुढे असायचा. पर्यावरणाबाबतीत तो तेव्हापासूनच जागरूक होता! परवाच भेटला तेव्हा म्हणाला, यंदाच्या विसर्जनाचा मान त्याचाच!’’

‘‘डिट्टो जनोबा रेग्यांचे काका!’’ अनू म्हणाली.

‘‘बटाट्याची चाळ झालेली दिसतेय वाचून… तुझ्यासारखी सातवीतली चिमुरडी ही पुस्तकं वाचतेय, याचंच खरं तर आश्चर्य!’’

‘‘काय सॉल्लिड लिहिलंय! थोडे संदर्भ नाही लागले, पण वाचून पोटच भरलं एकदम. यावरून सुचलं, आपली पोटभरे चाळ, पुलंची बटाट्याची चाळ! म्हणजे दोन्ही नावांचा संबंध खाण्याशी!’’

‘‘म्हणूनच आपल्या चाळीचा ‘खवय्या गणपती’! पाच मजल्यांची आपली चौकोनी चाळ, एका फ्लोअरवर बारा घरं, मध्यभागी चौक- जिथं हा ‘खवय्या गणपती’ सात दिवसांसाठी विराजमान असतो. तिथंच चाळीतल्या हौशी आणि सुगरण स्त्रिया गणेशोत्सवाच्या दरम्यान खाण्याचे विविध स्टॉल्स लावतात अजूनही.’’

‘‘पुन्हा बटाट्याच्या चाळीसारखंच. तिथंही साठ घरं आणि चौकात बसणारा गणपती!’’

‘‘दरवर्षी एवढे खाण्याचे वास घेऊन-घेऊनच आपल्या चाळीचा गणपती ‘लंबोदर’ झाला आणि नाव पडलं ‘खवय्या गणपती’. माझ्या लहानपणीच्या आठवणीतली गणेशाची मूर्ती बऱ्यापैकी लहान होती. मोठी होत-होत आता तीन फुटांपर्यंत झालीये. या वर्षी तर डबल वर्गणी काढलीये, मूर्ती अजून मोठी आणणार आहे म्हणे! चाळीचा शेवटचा गणेशोत्सव म्हणून!’’

‘‘हे मात्र बटाट्याच्या चाळीच्या अगदी उलट! तिथली गणपतीची मूर्ती कधी बदललीच नाही. इतकं, की तो रंग उडाल्यामुळे ‘एनेमिक’ दिसायला लागला. त्यात एकदा मूर्तीचा दात तुटल्यावर त्या जागी खडू बसवला गेला. नशीब, कुणी त्याचं नामकरण ‘कवळी गणपती’ म्हणून नाही केलं! आजोबा, पहिल्या महायुद्धात बटाट्याच्या चाळीत गणपती आले, आपल्या घरी दुसरं महायुद्ध संपता-संपता. पोटभरे चाळीचा गणपती कधी आला मग?’’

‘‘१९४७ साली. स्वातंत्र्यानंतर!’’

‘‘कमाल आहे! म्हणजे आपला घरचा गणपती चाळीतल्या गणपतीपेक्षा दोन वर्षांनी सीनियर आहे तर!’’

‘‘आपल्या घरच्या गणपतीची चंगळ असायची दहा दिवस. पहिल्या मजल्यावर राहणारे गातअण्णा त्या वेळी रेडियोवर गात. त्यांचं आडनावच मुळी ‘गात’… त्यांच्या घरच्या गणपतीचं साग्रसंगीत आटोपल्यावर ते आळीपाळीने इतरांच्या गणपतीसमोर गात. मग आपला घरगडी हऱ्या, हरी चाळकर, पायात चाळ बांधून, त्याच्या मित्रांबरोबर गणपतीपुढे कोकणातलं ‘बाल्या-डान्स’ सादर करत… विद्योच्या देवतेची दहा दिवस छान करमणूक करायची एवढीच इच्छा! माझ्या प्रेसमधला एक वर्कर- जगत गोरखा नेपाळी होता… तो यायचा गणपतीसाठी नारळांची माळ, हार-तुरे घेऊन. मनोभावे सगळं वहायचा मूर्तीला! जातपात-देश-धर्म विसरायला लावणारा सगळ्यांचा गणपती!’’

‘‘दोन चाळींमध्ये किती साम्य! एरवी भांड-भांड भांडणारे बटाट्याच्या चाळीतले लोक गणपतीला मात्र सगळे हेवेदावे विसरून एकत्र यायचे!’’

‘‘शेवटी चाळ संस्कृती आहे ही! थोडा फरक सोडला तर सगळ्यांचं राहणीमान सारखंच. सण-समारंभ साजरे करण्याची पद्धतही सारखीच. सर्वसामान्य लोकांसाठी भक्कम आधार होत्या या चाळी! त्यामुळे बटाट्याच्या चाळीशी आमच्यासारखे चाळकरी लगेच समरसून जातात!’’

‘‘आपल्या एरियामधली री-डेव्हलपमेंटला जाणारी पोटभरे चाळ शेवटची! इतके दिवस तग धरून होती, पण आता जमीनदोस्त होणार!’’

‘‘पिल्ल्या, तुटलेल्या दाताला खडू तरी किती वेळा बसवणार? शेवटी ‘एनेमिक’ झालेला गणपतीही कधी तरी बदलावा लागतोच! आता १९४० साली बांधलेली पोटभऱ्यांची चाळही एनेमिक होत चाललीये…’’

‘‘आजोबा, जशी बटाट्याची चाळ वाचकांच्या मनात राहिली तशी पोटभरे चाळही आपल्या मनात राहीलच! तर, एकत्र भेटण्याच्या निमित्ताने गणपतीला आनंदाने घरी आणू, सण मस्त साजरा करू. काही वर्षांनी याच आठवणींना अल्बम रूपात बघायला किती मज्जा येईल!’’

‘‘फक्त तेव्हा, ब्लॅक-अँड-व्हाइट अल्बमऐवजी एआयच्या कुठल्याशा ॲपवरून या बटाट्याच्या, आपल्या घरच्या आणि पोटभरे चाळीच्या गणेशोत्सवाची एकत्रित म्हणजेच ‘मिळून साऱ्यांचा गणपती’ची इमेजही अवतरेल!’’

mokashiprachi@gmail. com