आज काय झालं होतं काय की, सकाळपासून बाबा वैतागलेले होते. आईनं विचारलं तर म्हणाले, ‘‘ह्या मध्यावर विश्वास ठेवला मी, तर ऐन वेळी ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणून मोकळा झाला हा! जबाबदारी घ्यायला नको कसली याला.’’ आता हा मध्या म्हणजे बाबांचा सख्खा मित्र हे माहीत होते, पण हे ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणजे काय केलं असेल मधुकाकाने? याचा विचार करत होते. पण बाबांचा रागरंग बघून विचारलं नाही. मला चैन पडेना, काय केलं असेल काकाने? बाबा एवढे चिडलेत म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर असणार. मग शेवटचा पर्याय, आमची आज्जी! तिलाच विचारलं, ‘‘आजी काय गं ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणजे?’’
आजीने सांगायला सुरुवात केली- महाभारताचा शेवट कौरव-पांडवांच्या युद्धाने झाला. त्या युद्धात सगळे कौरव, त्यांचे गुरू, मित्रवर्य सगळेच सामील होते. द्रोणाचार्य हे कौरव-पांडवांचे गुरू. जेव्हा युद्धात सेनापती भीष्म शरपंजरी पडले तेव्हा गुरू द्रोणाचार्य यांना सेनापती पद देण्यात आले. त्यांनीच कौरव-पांडवांना युद्धकला शिकविली होती. त्यामुळे ते स्वत: त्यात तरबेज होतेच. चक्रव्यूह, शकटव्यूह अशा अनेक सैन्यरचना करून त्यांनी पांडव सैन्याला जेरीस आणले. त्यांचे हे रूप पाहून स्वत: श्रीकृष्णसुद्धा स्तंभित झाले. त्यांनी ओळखले, द्रोणाचार्याचा वध केल्याशिवाय युद्धाचे पारडे पांडवांच्या बाजूस झुकणार नाही. या युद्धात सगळेच युद्धनियम झुगारले गेले होते.
अश्वत्थामा हा  द्रोणाचार्याचा पुत्र. त्याच्यावर त्यांचे अतिशय प्रेम होते. युद्धात प्रत्यक्षात त्या वेळी अवन्तिराजाचा अश्वत्थामा नावाचा हत्ती होता. त्याला भीमाने मारले होते. श्रीकृष्णाने सांगितले की, ‘म्‘द्रोणाचार्याना सांगा, अश्वत्थामा मारला गेला.’’ भीमाने  द्रोणाचार्याना सांगितले, ‘‘अश्वत्थामा मारला गेला.’’
पुत्र निधनाची बातमी ऐकून द्रोणाचार्य दु:खी  झाले. परंतु खात्री करण्यासाठी त्यांनी युधिष्ठिराला विचारले. कारण युधिष्ठिर हा कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलणारा होता. त्याच्यावर द्रोणाचार्याचा विश्वास होता. पण सत्यवचनी युधिष्ठिर या वेळी मात्र असत्य बोलला. द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा नव्हे, तर हत्ती मारला गेला हे न सांगता तो म्हणाला, ‘नरो वा कुंजरो वा’. म्हणजे अश्वत्थामा मेला, पण नर की हत्ती (कुंजर) ते माहीत नाही. पण  त्याचा  पहिला शब्द  कानात पडताच  द्रोणाचार्य अतीव दु:खित होऊन त्यांनी शस्त्रत्याग केला. ही संधी साधून द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न याने द्रोणाचार्याचा वध केला. अशा प्रकारे युद्धाच्या पंधराव्या दिवशी गुरू द्रोणाचार्य धारातीर्थी पडले.
सत्यवचनी युधिष्ठिरसुद्धा ऐन वेळी असत्य बोलला. असे जेव्हा परिणामांची जबाबदारी टाळण्यासाठी किंवा स्वत:च्या स्वार्थासाठी असत्य किंवा अर्धसत्य बोलतात तेव्हा ‘नरो वा कुंजरो वा’ असे म्हणतात.
आता मला नीट कळलं, बाबा मधुकाकावर का चिडले असतील ते!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story for kids
First published on: 02-08-2015 at 01:02 IST