‘‘आजी, आज या वर्षांतला शेवटचा रविवार. पुढच्या रविवारी आपण २०१६ मध्ये असणार.’’ ओंकारला खूप गंमत वाटत होती.
‘‘पंधरा- पंधरा- पंधरा लिहायची इतकी सवय झाली होती, की संपूर्ण वर्षांत तारीख लिहिताना किती वेळा पंधरा साल लिहिलं असेल याची गणतीच नाही. हा पंधरा आकडा खूप ओळखीचा झाला होता. आता पंधरा साल भूतकाळात जमा होणार.’’ गंधारला आलेलं काळाचं भान त्याच्या बोलण्यातून डोकावलं.
‘‘सुरुवातीचे काही दिवस तारीख लिहिताना हमखास चूक होते आणि मग खाडाखोड ठरलेली.’’ रतीने दरवर्षीचा अनुभव सांगितला. खाडाखोड हा शब्द ऐकताच ओंकारने उडी मारत रबराने खोडल्याची ‘अ‍ॅक्शन’ करत, ‘मायमिंग’ असं पुटपुटत खाडाखोड सगळ्यांपर्यंत पोहोचवली. थोडी हास्याची खसखस पिकली.
सगळ्यांना ‘सोळा’ या आकडय़ाचे वेध लागलेले बघताच त्या ‘सोळा’ला घट्ट पकडून ठेवत आजी म्हणाली, ‘‘आता आपली सोळाशी गट्टी होणार. सोळा म्हटलं की आणखी कोणकोणत्या गोष्टी आठवतात, विचार करा बघू?’’
‘‘आम्हाला काहीच आठवत नाही,’’ असे म्हणत ओंकार आणि गंधार नकारार्थी माना हलवत राहिले.
‘‘खूप पूर्वी १६ आणे म्हणजे १ रुपया असे कोष्टक होते. हे मला फक्त वाचून, ऐकून माहिती आहे. बाजारात आणे देऊन काही आणलंय हे मात्र मला आठवत नाही. नाही म्हणायला २५ पैशाला ४ आणे आणि पन्नास पैशाला आठ आणे असे तुझ्यासारखे मोठे लोक नेहमी म्हणताना ऐकलंय.’’ वैभवने विचारपूर्वक सांगितले.
‘‘शेतात उत्तम पीक आलं ना तर सोळा आणे पीक आलंय असं कौतुकानं सागितलं जायचं. यावर्षी अवेळी पावसाने ‘आणे’ कसलं ‘उणे’ पीक आलंय. म्हणून तर महागाई वाढलीय.’’ आजी सोळा आणे खरं बोलली.
‘‘शेजारच्या काकूने सोळा सोमवारचं व्रत केलेलं मला आठवतंय. त्याच्या उद्यापनाला केलेले प्रसादाचे लाडू किती मस्त होते ना!’’ लाडू म्हणजे जीव की प्राण असणाऱ्या मुक्ताला चुरमा लाडूंमुळे सोळा सोमवारचं व्रत लक्षात राहिलं.
‘‘सोळा मात्रांचा त्रिताल मला माहिती आहे गं. नृत्यात आणि गाण्यात याचा खूप वापर केला जातो.’’ रतीने धाधिंधिंधा धाधिंधिंधा करत हातावर ताल पकडला.
‘‘षोडशोपचारी पूजा असं म्हणतात ना आजी, पण ते षोडशोपचार मला माहीत नाहीत. जरा सांगतेस का?’’ वैभवने हळूच कबूल केले.
‘‘रोजची देवांची पूजा पंचोपचारी असते. षोडशोपचारी पूजेत देवांसाठी सोळा उपचार असतात. आसन, पाद्य, अघ्र्य, आचमन, स्नान, वस्त्र, गंध, पत्रपुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, दक्षिणा, प्रदक्षिणा, नमस्कार, प्रार्थना. गणेशचतुर्थीला किंवा मंगळागौरीला षोडशोपचरी पूजेसाठी आपण गुरुजींना बोलावतो.’’
‘‘पूजा झाल्यावर आरती करताना मज्जा येते. मी झांजा वाजवतो आणि मग प्रसादपण मिळतो.’’ गंधारने हातांच्या झांजा वाजवल्या. ओंकारने त्याची री ओढली.
‘‘शिवाय आपल्या जीवनाला शिस्त लावण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत सोळा संस्कार सांगितलेले आहेत. गर्भाधान, पुंसवन, सीमंतोभयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडाकर्म, कर्णवेध, उपवयन, वेदारंभ, समावर्तन, विवाह, वानप्रस्थ, संन्यास, अंत्येष्टी. नावं ऐकून घाबरून जाऊ नका. थोडे मोठे झालात की मग ही माहिती करून घ्यायची.’’-इति आजी.
‘‘सोळावं वरीस धोक्याचं असं गाणंही आहे ना आजी.’’ रतीची टय़ूब योग्य वेळी पेटली.
‘‘होऽ तर! गाण्यातून धोक्याची घंटा वाजवल्यामुळे ती बघ कशी बरोबर लक्षात राहिली. सोळावे वर्ष खूप महत्त्वाचे असते. शाळेतल्या सुरक्षित जगातून तुम्ही कॉलेजमध्ये जाऊ लागता. शाळेत शिक्षक तुमच्याकडून अभ्यास करून घेतात. कॉलेजमध्ये तुम्हाला जबाबदारीने स्वत:चा स्वत: अभ्यास करायचा असतो. तारुण्याच्या उंबरठय़ावर तुम्ही पाऊल टाकत असता. आजूबाजूच्या वास्तवाचं भान ठेवून, कानांनी आणि डोळ्यांनी बघत, सावध राहून जबाबदारीने पुढे जायचं असतं, म्हणून ही घंटा.’’ आजीने शिकवणीचा डोस पाजलाच.
ओंकार व गंधारला फक्त घंटा शब्द कळला. दारावर, टेबलावर आवाज करत दोघांनी विजयी मुद्रेने सगळ्यांकडे पाहिले.
‘‘प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्रम् मित्रवत् आचरेत्, असं सुभाषित आहे. सोळा वर्षे पूर्ण झाल्यावर वडील मुलाशी मित्राप्रमाणे वागतात. अनेक बाबतीत त्याच्याशी चर्चा करतात, त्याचे मत घेतात. कारण मुलगा आता मोठा झाला, विचाराने परिपक्व झाला असं मानलं जातं. बरोबर आहे ना वैभव?’’ -इति आजी.
वैभवने हसून मान डोलवली.
‘‘आजी, मी नवीन कॅलेंडर लावू का गं?’’ गंधारला घाई झाली होती.
‘‘अरे थांब, अजून चार दिवस बाकी आहेत.’’ रतीने त्याला थांबविले.
‘‘तोपर्यंत तुम्हा सर्वाना इंग्रजी नवीन वर्षांच्या शुभेच्छा. खूप अभ्यास करण्याचा संकल्प सोडा, म्हणजे सोळा आणे यश पदरात पडेल. खरं ना!’’
सुचित्रा साठे – lokrang@expressindia.com 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story for kids
First published on: 27-12-2015 at 01:01 IST