संपूर्ण शहर अशा तऱ्हेनं खडबडून जागं झालं. आपली नदी, आपल्या आजूबाजूचे प्राणी-पक्षी, वनस्पती यांकडे लोकांचं लक्ष जाऊ लागलं. नदीत कचरा येऊ नये म्हणून काय करता येईल, मुळात कचरा कमीच कसा करता येईल यावर चर्चा होऊ लागली. लोकांनी आपल्या रिकाम्या गच्चीत बाग करायला सुरुवात केली होती. आवारातली वाळलेली पानं त्यात वापरली जाऊ लागली. रोपं निवडताना आवर्जून फुलपाखरांची होस्टप्लांटस् त्यात सामील केली जात होती. वाफे करण्यासाठी बांधकामाच्या उरलेल्या विटा, रस्त्याच्या कामासाठी आणलेलं, पण न वापरलेले जास्तीचे पेव्हरब्लॉक वापरले जाऊ लागले. कोणी जुन्या, टाकून दिलेल्या बाथटबमध्ये झाडे लावली. वाळलेली पानं, बिया, रोपं यांची देवाणघेवाण करणारे गट तयार झाले. त्यात आपल्याकडे असलेल्या वापरण्यायोग्य वस्तूंचीही देवाणघेवाण सुरू झाली. एकूणच सगळे अमलात येत होते.

केवळ एकच महिन्यात शहरात फरक दिसू लागला होता. पण हे असंच सुरू राहील का? तर त्याचं उत्तर ‘हो’ असायला हरकत नाही, कारण हा बदल होत होता तो समजून, उमजून होता. शहरभर विविध शिल्पं, नदीकाठचे फलक यातून लोकांना समस्या आणि त्या समस्यांवर काही उपायही कळले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकत्र येऊन, सगळे मिळून इतर समस्यांवर तोडगा काढू शकतो हा विश्वास मिळाला होता. डोळसपणे आपल्या कृतीकडे बघितल्यावर काय बदल केला पाहिजे हे जाणवत गेलं होतं. त्यांनी तयार केलेल्या जाहीरनाम्यातून हे सिद्ध होत होतं. शिवाय हा बदल त्यांच्यावर कोणी लादलेला नव्हता, त्यांनी आपणहून ठरवून, घडवून आणलेला होता. त्यामुळे हे शहर एक चांगल्या भविष्याकडे वाटचाल करत होतं आणि ती वाटचाल सुरूच राहणार होती असं समजायला हरकत नाही. आपल्या सुज्ञ वाचकांना लक्षात आलंच असेल हे सगळं कोणी घडवून आणलं होतं. शहरातून आपली ही चौकडी आणि गावातून गणेश आणि त्यांची गँग. अगदी बरोब्बर!!!

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

आपल्याला ज्ञान असणं हे महत्त्वाचं आहे. पण तो केवळ एक भाग झाला. आपलं ज्ञान कुठे वापरायचं हे कळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शाळेत शिकवले जाणारे पर्यावरणशास्त्र, इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित हे विषय केवळ पाठ्यपुस्तकात आहेत म्हणून न शिकता या विषयांना स्वत:च्या अनुभूतीची आणि निरीक्षणांची जोड दिल्यावर काय होऊ शकतं हा अनुभव त्यांना आला. विचार केला तर सगळ्या समस्यांवर तोडगा निघू शकतो. मदत उपलब्ध असते. एकत्र येऊन समस्यांवर तोडगा काढता येतो अशा अनेक गोष्टी मुलांना समजल्या. ‘Be the change you want to see in the world’ याप्रमाणे स्वत:पासून सुरुवात करून मुलांनी घरच्या, आजूबाजूच्या लोकांच्यात हे उपाय रुजवले. त्यातून आत्मविश्वास निर्माण झाला आणि मग शहर आणि गावपातळीवरच्या समस्या सोडविण्यास ती तयार झाली. हे आपण सगळेच जण करू शकतो.

‘मुलं त्यांच्या पातळीवर निसर्गासाठी काय करू शकतात’ हा या लेखमालेचा विषय होता. प्रत्येक लेख वेगळा न करता, तो एका गोष्टीत गुंफून, दर लेखात ती गोष्ट पुढे नेली. या गोष्टीची मुख्य पात्रे अर्थातच मुलं होती, काही शहरात राहणारी, काही गावात. दोन्हीकडची परिस्थिती थोडीफार वेगळी, समस्या थोड्याफार वेगळ्या.

मुलांची कल्पनाशक्ती अफाट असते. ‘मोठ्या’ माणसांसारखे काय शक्य आहे आणि काय शक्य नाही याबद्दलच्या त्यांच्या धारणा पक्क्या नसतात. त्यामुळे मुलांना अशक्य असे काहीच वाटत नाही. कितीही मोठे आव्हान त्यामुळे ती खुल्या मनाने पेलू शकतात. गोष्टीतल्या मुलांमार्फत हाच विश्वास बालवाचकांपर्यंत पोहोचवण्याचा या लेखमालेतून प्रयत्न केला. आपल्यासमोर जी समस्या आहे तशी समस्या या आधीसुद्धा नक्की कोणीतरी अनुभवली असणार. त्यावर नक्की कोणीतरी उपाय शोधला असणार किंवा शोधत असणार. भवभूतीने त्याच्या सुभाषितात म्हणलं आहे तसे, ‘कालोह्यंनिर्वधिर्विपुला च पृथ्वी’ – काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे. त्यामुळेच – १. जगात अशक्य असे काहीच नाही. २. आत्ता माहीत नसेल तरी हरकत नाही, कारण शिकता येत नाही असे काहीही नाही. ३. प्रत्येक समस्येवर तोडगा शोधता येतोच.

आपल्या बालवाचकांना ही प्रेरणा लेखमालेतून मिळाली असेल अशी मी आशा करते. सगळे मिळून आपण आपलं गाव, आपलं शहर, आपला देश, आपलं जग आहे त्यापेक्षा सुंदर करू.

समाप्त
aditideodhar2017@gmail.com