५ ई ही शाळेत शिकणारी एक हुशार आणि गुणी मुलगी! अभ्यासाबरोबरच खेळ आणि गाण्याचीही तिला आवड. आई आणि आजीबरोबर स्वयंपाकघरात लुडबुड करायची तिला भारी हौस. विविध पदार्थ बनवण्यात ती तरबेज झाली होती. मात्र आई-आजी करतात तशा पापुद्रे सुटलेल्या आणि खमंग भाजलेल्या मऊसूत पोळ्या करणे तिला जमले नव्हते. म्हणून ती स्वत:वरच नाराज होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदा सई शाळेतून घरी आली तेव्हा घरी कोणीच नव्हते. आईने टेबलावर एक चिठ्ठी ठेवलेली होती. त्यात लिहिले होते, ‘महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे. पावभाजीची भाजी करून ठेवली आहे. खालच्या दुकानातून प्लीज ब्रेड घेऊन ये.’

सई आधीच खूप कंटाळलेली होती. शिवाय पोटात कावळेही ओरडत होते. खाली दुकानातून ब्रेड आणणे गरजेचे होते, पण नेमका दुकानातील ब्रेड संपलेला होता. सई तशीच वर आली. तिने स्वत:साठी पोळी बनवून घ्यावी असा विचार केला. तिने छान कणिक तर भिजवली, पण पोळी लाटण्याचे अवघड काम बाकी होते.

तिने कणकेचा एक गोळा घेऊन लाटायला सुरुवात केली. पण ती पोळी गोल काही होईना. विविध देशांचे नकाशे आकार घेऊ लागले. त्यामुळे सईची चिडचिडही सुरू झाली. शिवाय आज समजूत काढायला घरात आई-आजीही नव्हत्या. रागानेच त्या लाटलेल्या पोळीचा पुन्हा गोळा करायला घेणार तेवढय़ात तिच्या कानावर शब्द आले, ‘‘अगं थांब थांब! रागावू नकोस.’’ सई आश्चर्यचकित झाली. पाहते तर काय, ती पोळी चक्क सईशी बोलत होती.

अगं अगं सई

किती तुझी घाई!

थांब जरा तिथे

ऐक काय सांगते

लाट पोळी लाटण्याने

काप तिला ताटलीने

अशी केल्याने युक्ती

 गोल होईल चपाती

सई अवाक् झाली आणि म्हणाली, ‘‘खरंच की किती सोप्पं!  आणखी दोन-तीन पोळ्या करू या.’’

यावर पोळी तिला म्हणाली, ‘‘सई, आईसारख्या छान पोळ्या बनवायच्या असतील तर मात्र तुला लाटायची योग्य पद्धत शिकून घ्यायला हवी हं.’’

सई म्हणाली, ‘‘पण ही पद्धत किती सोपी आहे.’’

तेवढय़ात पोळपाटाने सईला हाक मारली. ‘‘अहो सईबाई, लहानपणी तुम्ही आई-बाबांचे बोट धरून चालायला शिकलात. अजूनही चालताना तुम्ही त्यांचे बोट पकडता का?’’

त्यावर लाटणे पोळपाटाच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाले, ‘‘तू निराश होऊ नयेस म्हणून पोळीने केवळ ही एक युक्ती सांगितली होती, पण ही काही पोळी करण्याची रीत नव्हे.’’

सई थोडी हिरमुसली आणि म्हणाली, ‘‘पण माझ्या पोळ्यांचा आकार बिघडतो ना.’’

तेवढय़ात टेबलावरच्या पावभाजीच्या कढईतून आवाज आला तेव्हा सईने दचकून मागे पाहिले. पावभाजी सईला म्हणाली, ‘‘अगं आईच्या हातून एखाद्या पदार्थात मीठ-तिखट कमी-जास्त झाले तर आई तो पदार्थ तसाच खायला देते का?’’

‘‘आणि हो, तू जेव्हा पहिल्यांदा पदार्थ बनवलास तेव्हा घरात सगळ्यांनी तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. पण तुझ्या पदार्थाला फायनल टच कोणी दिला होता? आईनेच ना? आठवतंय का?’’ पोळपाट म्हणाला.

लाटणे सईचे कौतुक करत म्हणाले, ‘‘सईचे काम व्यवस्थित आणि शिस्तबद्ध असते. त्यामुळे सई पदार्थ छानच करणार याची आईला खात्री असते.’’ सईच्या चेहऱ्यावरचे भाव बघून पोळी तिला म्हणाली, ‘‘हाय सईताई काही कळतंय का?’’

सईने हसून स्वत:ची चूक मान्य केली. ‘‘हो आता चिडचिड करणार नाही. पण सांग ना, ताटलीची मदत न घेता पोळी कशी करायची ते.’’ सई म्हणाली.

‘‘शहाणी माझी बाई ती’’ पोळी म्हणाली.

‘ ‘आता कणकेच्या छोटय़ा गोळ्याला पीठ लावून पोळी लाटायला सुरुवात कर. मधून मधून थोडेसे पीठ लाव. म्हणजे पोळी पोळपाटाला न चिकटता सरकत राहील. पोळी सर्व बाजूंनी एकसारखी पातळ लाटली जाईल असं बघ. कडा जाड राहणार नाहीत याकडेही लक्ष दे. सवयीने तुला चांगलं जमायला लागेल.’’ पोळीने सांगितले.

सईने पोळीच्या सूचनांप्रमाणे उत्साहाने सुरुवात केली. हळूहळू तिच्या प्रयत्नांना यश येऊ लागल्याने तिचा चेहरा प्रसन्न झाला. ते पाहून पोळी म्हणाली, ‘‘बघ, न चिडता प्रयत्न केल्याने कठीण वाटणारी गोष्ट तुला जमायला लागली. असाच सराव करत राहिलीस तर तूही सुंदर पोळ्या करशील.’’

सईने पोळीचे आभार मानले आणि शांत, समाधानी चित्ताने तिने चटकदार पावभाजीचा आस्वाद घेतला. थोडा आराम करून शाळेचा अभ्यासही पूर्ण केला. संध्याकाळी दमून आलेल्या आईला चकित करण्याचे तिने ठरवले आणि ती तयारीला लागली. संध्याकाळच्या जेवणासाठी लागणाऱ्या पोळ्या तिने बनवल्या. आईला तिचे खूप कौतुक वाटले. न राहवून तिने आश्चर्याने सईला विचारले, ‘‘अगं पण तुला हे जमले कसे?’’

त्यावर सई म्हणाली, ‘‘ हे माझे आणि पोळीचे गोड गुपित आहे.’’

 

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story secret of round roti
First published on: 07-04-2013 at 12:08 IST