स्वाती राजे यांची रस्ता, प्रवास आणि पाऊस ही तीन पुस्तकं म्हणजे हळूवार गोष्टींचा अनोखा नजराणा. माणसांमधील अनेक गुणांचा, दुर्गणांचा, इच्छाशक्तीचा आणि सामाजिक परिस्थिचा अचूक वेध घेत ओघवत्या शैलीत छोटय़ा गोष्टींची मांडणी लेखिकेने केली आहे. गोष्टींच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत वाचकाला एका अनोख्या वाचनानंदात रममाण करण्याची कला लेखिकेने साधली आहे.
‘रस्ता’ ही गवत चरायला आपल्या कळपाबरोबर जायला आवडणाऱ्या कोकराची गोष्ट! हिरव्यागार गवतावर लोळून लाल मातीच्या मळलेल्या वाटेनं घरी परत यायचं.. असं छान आयुष्य जगणाऱ्या कोकराला गवताच्या कुरणापलीकडे गर्द झाडीत काय असेल याचं कुतूहल वाटायचं. कळपातील गुरांना त्याबद्दल ते विचारतं, पण त्यांना त्याचा प्रश्न वेडगळ वाटतो. पण अस्वस्थ कोकराला त्या पलीकडच्या झाडीचीच आस लागलेली असते. एक दिवस नेहमीच्या वाटेनं घरी न परतता ते त्या गर्द झाडीत शिरतं आणि त्याच्यासाठीच नव्हे, तर त्याच्या मालकासाठी आणि गावकऱ्यांसाठी विकासाची वाट शोधून काढतं. कोकराचं रूपक वापरून लेखिकेने मनातलं कुतूहल जागरूक ठेवून त्या दिशेने पावलं टाकणाऱ्या प्रत्येक माणसातील हट्टी कोकराची गोष्ट उत्तमपणे मांडली आहे.
जात-धर्मापलीकडेही माणसाचं जगणं महत्त्वाचं आहे, हे सत्य ‘पाऊस’ या गोष्टीत लेखिका मांडते.  जात-धर्म विसरून एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या गावात अचानक  एक पाहुणा धर्मावरून तेढ निर्माण करतो आणि गावाचं गावपण, माणसांमधली माणुसकी यांना तडा जातो आणि तेढ निर्माण होतं. एकमेकांमध्ये धर्मश्रेष्ठाची चढाई सुरू होते. या सर्वाची झळ लहानग्यांनाही पोहोचते, पण ती बिचारी ज्येष्ठांच्या शब्दाबाहेर जात नाहीत. अशातच गावात दुष्काळ पडतो. प्रत्येक जण पावसासाठी आपापल्या देवांना साकडं घालतो. पण पाऊस पडण्याची काही चिन्हंच दिसत नाहीत. हा सारा खेळ ती निरागस मुलं पाहात असतात. मग एकदा तीच पावसासाठी एकत्रितपणे आपापल्या देवाकडे प्रार्थना करतात. आणि पाऊसही त्या चिमुकल्यांच्या प्रार्थनेला मान देऊन बरसतो. सर्वधर्मसमभाव आणि सलोखा यांची रुजवण करणारी ही कथा आजच्या परिस्थितीतही मोलाची ठरते.
लोंब्यांमधल्या दाण्याचा प्रवास म्हणजे मातीपासून पुन्हा मातीपर्यंतचा.. रुजून मातीतून उगवण्याचा आणि रुजण्यासाठी पुन्हा मातीत जाण्याचा मनोहारी प्रवास म्हणजे ‘प्रवास’ ही गोष्ट. आनंद, भय अशा विविध भावनांनी भारलेला दाण्याचा हा प्रवास माणसाच्या रोजच्या जीवनातील जाणिवांशी नकळतपणे जोडला जातो. या तीनही पुस्तकांमधून लेखिकेची सहज-सुंदर लालित्यपूर्ण भाषाशैली वेगळा वाचनानंद देते. पानापानांमधील चंद्रमोहन कुलकर्णी यांची सुंदर चित्रे मनाला मोहवून टाकतात. शब्द आणि चित्र यांचा सुरेल मेळ या पुस्तकांमधून दिसून येतो.  भाषा फाउंडेशनने ज्योत्स्ना प्रकाशनाच्या सहकार्याने ही पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.
‘रस्ता’, ‘प्रवास’, ‘पाऊस’- स्वाती राजे,
ज्योत्स्ना प्रकाशन, मूल्य- ६० रुपये (प्रत्येकी)