|| प्राची मोकाशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘बाबा, उशीर झाला?’’ बाबा दुपारी घरी आल्या आल्या इशानने विचारलं. बाबांनी दुरूनच मान हलवली आणि ते थेट अंघोळीला गेले. इशानच्या बाबांचं त्यांच्या राहत्या बिल्डिंगमध्येच जनरल स्टोअर्स असल्यामुळे त्यांचा सतत लोकांशी संपर्क यायचा. गेले वर्षभर हैदोस माजवलेल्या करोना विषाणूमुळे सगळ्यांनाच स्वच्छतेचे ‘प्रोटोकॉल’ पाळावे लागत होते.

‘‘हॅप्पी बर्थडे!’’ अंघोळीहून येताच बाबांनी इशानला ‘विश’ केलं.

‘‘थँक यू! मला पाचव्यांदा ‘विश’ करताय तुम्ही… रात्री बारा वाजल्यापासून.’’

‘‘गंमत थोडीशी! आईचा फोन आला होता. पाचपर्यंत येईल घरी.’’ हे ऐकताच इशानचा चेहरा खुलला.

‘‘आज बऱ्याच मित्रांचे फोन आले! राहुल विचारूनही गेला, की आम्ही सगळे मित्र वाढदिवसाला संध्याकाळी येऊ का म्हणून! पण मी ‘नाही’ म्हणालो.’’

‘‘गुड! सध्या बिल्डिंगमध्ये करोना पेशंट आहेत. त्यामुळे गर्दी नकोच. पण आई आली की झक्कासपैकी सेलिब्रेट करू या तुझा वाढदिवस.’’

‘‘डन-डना-डन…’’ इशान थम्स-अप् करत म्हणाला.

***

‘‘तुमची ड्युटी किती वेळ असते?’’ इंटरव्ह्यू संपल्यावर पत्रकाराने सीनियर नर्सला अनौपचारिकपणे विचारलं. लॉकडाऊनचं एक वर्ष झाल्यानिमित्ताने ‘अवघे धरू सुपंथ’ या स्पेशल एपिसोडमध्ये त्यांचे न्यूज चॅनल काही नर्सेसचे अनुभव ‘कव्हर’ करणार होतं.

‘‘आठ तासांची! दुपारी चारला शिफ्ट संपेल.’’

‘‘घरी कोण कोण असतं?’’

‘‘मुलगा इशान आणि त्याचे बाबा. इशान सहावीत आहे.’’

‘‘बाबा काय करतात?’’

‘‘बिल्डिंगमध्येच आमचं जनरल स्टोअर्स आहे.’’ एवढ्यात नर्सने वाऱ्याने फडफडणाऱ्या भिंतीवरच्या कॅलेंडरकडे पाहिलं.

‘‘तुम्ही अस्वस्थ का झालात?’’

‘‘एक वर्ष कसं गेलं कळलंच नाही! इशानचा आज वाढदिवस! गेल्या वर्षी हॉस्पिटलमध्ये यादरम्यान करोनाच्या इतक्या केसेस आल्या होत्या की मी त्याच्या वाढदिवसाला घरी जाऊच शकले नव्हते!’’

‘‘सुरुवातीला खूप त्रास होता नं?’’

‘‘पर्यायच नव्हता. आजार नवीन. पेशंट जास्ती. डॉक्टर्स-नर्सेसचा तुटवडा. पी. पी. ई. किट्सचं डोनिंग-डोफिंग हा नवीन प्रकार शिकावा लागला… इतरांना शिकवावा लागला. ड्युटी संपली की किट्स बदलल्यावर लगेच स्वच्छ होऊन रूमवर जायचं. जेवण तिथेच मिळायचं. फक्त ड्युटीचा कॉल आला की रूममधून बाहेर पडायचं. पंधरा-पंधरा दिवस घरी गेलो नव्हतो आम्ही. पण गेल्या वर्षीच्या तुलनेने आता आम्ही अधिक सज्ज आहोत. त्यात ‘व्हॅक्सिन’ आल्यामुळे धीर मिळालाय.’’

‘‘इशानच्या वाढदिवसाला काय स्पेशल?’’

‘‘त्याच्या आवडीचा ‘पाईनअ‍ॅपल क्रीम केक’ नेणारेय…’’

एवढ्यात नर्सचा मोबाइल ‘व्हायब्रेट’ झाला. त्यांनी लगेच घेतला. त्यांच्या बोलण्यावरून इमर्जन्सी आल्यासारखं वाटलं.

‘‘काय झालं?’’

‘‘करोनाचे एकाच ठिकाणाहून एकदम नऊ पेशंट्स आलेत…’’

‘‘मग घरी?’’

‘‘आता नाही बहुतेक!’’

‘‘इशान रागावेल?’’

‘‘बिल्कुल नाही! त्याच्या आईच्या कामाची त्याला चांगलीच जाणीव आहे. लॉकडाऊनमध्ये दुकानातले मदतनीस गावी गेले तेव्हा बाबाला मदत करायला इशान दररोज दुकानातही आपणहून जायचा…’’

‘‘मॅडम, सलाम आहे तुमच्यासारख्या नर्सेसना… आणि तुमच्या घरच्यांनाही!’’

‘‘तुम्हा पत्रकारांनाही काही कमी प्रेशर असतं का?’’ काही सेकंद चर्चा करून स्मितहास्य करत नर्स तिच्या ड्युटीवर निघून गेली.

***

आईला घरी यायला जमणार नाही हे इशानला एव्हाना समजलं होतं. इतक्यात बाबांच्या फोनवर आईचा ‘व्हॉट्स-अ‍ॅप कॉल’ आला…

‘‘हॅप्पी बर्थडे!’’ इशान स्क्रीनवर दिसताच आईने ‘विश’ केलं.’

‘‘थँक यू. सकाळी ‘विश’ केलं होतंस की!’’

‘‘सॉरी! इमर्जन्सी आली! नाही जमलं निघायला.’’ आईच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

‘‘रडू नकोस! तू घरी आल्यावर आपण वाढदिवस साजरा करू!’’

‘‘बाबा कुठाय?’’

‘‘काळेकाका होम क्वारंटाइन आहेत. बाबा त्यांना लागणारं सामान द्यायला गेलेत.’’

एवढ्यात दारावरची बेल वाजली. इशानने मास्क लावत आतलं दार उघडलं. आईचा फोन सुरूच होता.

‘‘कोण?’’ इशानने विचारलं.

‘‘इशान, केक…’’ बाहेरच्या दाराच्या जाळीपलीकडचा इसम म्हणाला.

‘‘केक? आमचा नाहीये… तुम्ही मला…’’

‘‘कोण आहे बघू…’’ आई फोनवरूनच म्हणाली. इशानने मोबाइलचा स्क्रीन केक आणणाऱ्या इसमाच्या दिशेने वळवला.

‘‘तुम्ही?’’ आईच्या सांगण्यावरून इशानने दार उघडलं. एवढ्यात बाबाही आले.

‘‘आपण आत्ताच काळेकाकांच्या घरापाशी भेटलो…’’ त्या इसमाला पाहून बाबा म्हणाले.

‘‘हे पत्रकार आहेत. यांनीच माझी मुलाखत घेतली आज…’’ आई म्हणाली.

‘‘मॅडमशी बोलताना समजलं की तुम्ही माझ्या काकांच्याच बिल्डिंगमध्ये राहता. मी काकांना कालपासून डबा द्यायला येतोय. आज इशानचा वाढदिवस आहे म्हणून त्याच्यासाठी त्याचा फेव्हरेट ‘पाइनअ‍ॅपल क्रीम केक’ आणला…’’ पत्रकाराने खुलासा केला.

‘‘बाबा आणणारच होते केक…’’

‘‘इशान, गेले वर्षभर मॅडमप्रमाणे अनेक ‘कोविड वॉरियर्स’ आपलं घरदार विसरून करोनाशी लढताहेत. मला करोना झाला तेव्हा आणि पत्रकारिता करतानाही मी त्यांचं काम जवळून पाहिलंय. मॅडम आज घरी येऊ शकणार नव्हत्या… मला वाटलं, मी इतकं करूच शकतो…’’ पत्रकार कृतज्ञतेने म्हणाला.

‘‘काका, तुमचा हा केक ‘स्पेशल’ आहे, कारण यात तुमच्या ‘थँक यू’चा ‘फ्लेवर’ मिसळलाय…’’ इशानने आनंदाने केक स्वीकारला. मग स्वच्छतेचे ‘प्रोटोकॉल’ सांभाळून इशानचा वाढदिवस थोडक्यात साजरा झाला.

एवढ्यात टीव्हीवर आईची मुलाखत दिसू लागली. पाहताना इशानच्या मनात विचार आला-‘रुग्णांची शुश्रूषा करणारे डॉक्टर्स-नर्सेस, धैर्यवान पोलीस, तत्पर दुकानदार असे कित्येक घटक… करोनाच्या निराशाजनक वातावरणात या ‘कोविड वॉरियर्स’च्या सकारात्मकतेची जणू आता एक ‘चेन रिअ‍ॅक्शन’ बनलीये… जिला प्रेरक आहेत पत्रकार काकांसारखी संवेदनशील माणसं… ‘अवघे धरू सुपंथ’ हे वचन सार्थ करणारी!

mokashiprachi@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sympathy general stores in the building itself interview journalist senior nurse akp
First published on: 02-05-2021 at 00:01 IST