बाबांची बदली झाली आणि प्रेरकला नव्या गावात यावे लागले. जुन्या शाळेच्या आठवणी, मित्र, शिक्षक या सर्वाना सोडून मोठय़ा कष्टाने तो इकडे आला. निघताना त्याचे डोळे पाणावले होते, पण काय करणार? नव्या शहरात आल्यावर जवळच्याच शाळेत प्रेरकला प्रवेश मिळाला. प्रेरकला मित्रमत्रिणी मिळाव्यात म्हणून आईने त्यांच्या इमारतीत चौकशी केली. तिला एक शोध लागला, की स्पृहा नावाची एक मुलगी सातवीत असून ती प्रेरकच्याच शाळेत आहे. मग शेजारच्याच सोसायटीत राहणाऱ्या स्पृहाला आईने घरी बोलावले आणि प्रेरकला पहिल्या दिवशी शाळेत सोबत नेण्याविषयी सुचवले. ती आनंदाने तयार झाली.
स्पृहा आणि प्रेरक चालतच शाळेत निघाले. तशी जवळच होती शाळा. प्रेरकला नव्या शाळेविषयी उत्सुकताही होती आणि भीतीही! स्पृहा अधूनमधून काही बोलत होती. प्रेरक फक्त ‘हो’ला ‘हो’ करत होता. वाटेत पाऊस मस्त भुरभुरून गेला. ‘‘चौकातून पुढे गेल्यावर शंकराच्या मंदिरापासून छान उतार आहे,’’ स्पृहा सांगत होती. तेवढय़ात मागून एक सायकलवरून वयस्कर माणूस आला आणि धडपडून रस्त्याच्या कडेला सायकलसकट पडला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला छान आळे करून लावलेल्या िपपळाच्या छोटुकल्या रोपाने मानच टाकली. तो अपघात पाहून दोघेही प्रथम बावरले. स्पृहा म्हणाली, ‘‘आता काय करायचं?’’ पण दुसऱ्या क्षणी प्रेरकने त्या माणसाला हात देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. तो माणूस अंधारी येऊन पुन्हा खाली पडला. तेव्हा प्रेरकने आपल्या डब्यातील तूपसाखर बळेच त्याच्या तोंडात कोंबली. काही क्षणातच त्या माणसाला हुशारी आली आणि तो उठून बसला. ‘‘नीट घरी जाल ना?’’ प्रेरकने विचारल्यावर त्या माणसाने होकारार्थ मान डोलावली. प्रेरकने स्पृहाकडे पाहिले आणि म्हणाला, ‘‘चलो.’’ ते दोघेही चालू लागले. तेव्हढय़ात प्रेरक गर्रकन मागे वळला आणि त्या मान टाकलेल्या िपपळाच्या रोपाजवळ पोचला. त्याच्या खोडाजवळची माती मोकळी करून त्याने त्या झाडाला एका काटकीचा आधार दिला. त्याच्या बाटलीतले थोडे पाणी झाडाला घातले. स्पृहा हे सारे कौतुकाने बघत होती, पण तिचे घडय़ाळाकडेही लक्ष होते. ती म्हणाली, ‘‘प्रेरक, आता मात्र पाठीला पाय लावून पळायला हवं. उशीर झाला तर पहिल्याच दिवशी तुला मागच्या बाकावर उभं राहावं लागेल.’’ दोघेही जीव खाऊन पळत सुटले आणि एकदाचे शाळेत पोहोचले.
शाळेत पहिल्या तासालाच वर्गशिक्षिका िशदेबाई प्रेरकसह वर्गात आल्या आणि म्हणाल्या, ‘‘आपल्या वर्गात हा एक नवीन मुलगा आला आहे- प्रेरक. सप्टेंबर महिना चालू आहे. अभ्यासक्रम बराच शिकवून झालाय. तर प्रेरकला सगळ्यांनी मदत करा. मधल्या सुट्टीत त्याला संपूर्ण शाळा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण असं सगळं दाखवा. काय?’’
सगळा वर्ग कोरसमध्ये ‘‘हो’’ म्हणाला.
शाळेत नवीन आलेल्या प्रेरकला वर्गातील मुले भंडावून सोडू लागली. त्याला त्रास देत होती. आपल्या शर्टवर मागून कोणीतरी शाई िशपडलीय, याची त्याला जाणीव झाली तेव्हा तो खूपच बावरला. मुलेमुली त्याला इतके प्रश्न विचारत होती की, कुणाला कोणते उत्तर द्यावे हेच त्याला कळत नव्हते. काही वात्रट मुले मुद्दामच विचित्र प्रश्न विचारत होती. दक्षने त्याला जोरात चिमटा काढत विचारले, ‘‘तू नापास झाला होतास का?’’ त्याने फक्त नकारार्थी मान डोलावली. मग क्षिप्राने कुचकटपणे विचारले, ‘‘तुला त्या शाळेने हाकलून दिले होते का?’’ या प्रश्नाने प्रेरकच्या कपाळावर आठय़ा पडल्या. तरी त्याने शांतपणे उत्तर दिले, ‘‘नाही. तसे काहीही नाही. माझ्या बाबांची बदली झाली म्हणून आम्ही सगळेच इथे राहायला आलो.’’ तरी समीधा नाक फेंदारून म्हणाली, ‘‘आमची शाळा हुशार मुलांची आहे. बघ बाबा, तुला झेपतंय का ते!’’ त्यावर प्रेरक कसनुसं हसला. प्रेरकच्या शेजारच्याच बाकावर बसलेल्या स्पृहाला वाईट वाटलं. नवीन आलेल्या मुलाला असे हैराण करणे योग्य नाही, असं तिला वाटलं. ती म्हणाली, ‘‘काय रे, मदत करायची सोडून त्रास काय देताय त्याला? सांगू का िशदेबाईंना?’’ मग मुलांनी गोंधळ घालून वर्ग डोक्यावर घेतला.
पुढचा तास भालेकर सरांचा. मूल्यशिक्षणाच्या संदर्भात त्यांनी एक गृहपाठ दिला होता. ज्याने गृहपाठ केलेला नसेल, त्याला मजेदार शिक्षा होणार होती. प्रेरकला ह्याची कल्पना असण्याचे काहीच कारण नव्हते. वर्गात आल्याआल्या भालेकरसरांनी गर्जना केली, ‘‘आज काय करायचेय ते आहे ना लक्षात?’’ वर्गातून फक्त धुसफुस ऐकू आली. त्यांनी सभोवार नजर फिरवली. नवा चेहरा बघून त्यांनी प्रेरकलाच उभे राहण्याची खूण केली. क्षिप्रा फिसकन हसली. दिन्याने तिला खूण करून गप्प बसायला सांगितले. पोरांनीही कुजबुज केली. प्रेरकच्या मागच्या बाकावर बसलेला दक्ष दबक्या आवाजात म्हणाला, ‘‘बोंबला! आता वाट लागणार ह्याची.’’ तर पलीकडला यज्ञ तोंड लपवून हळूच म्हणाला, ‘‘सत्कृत्याची ऐशी की तशी!’’
प्रेरकला काहीच समजेना. भालेकरसरांच्या मिशा पाहून तो खूपच घाबरला. प्रेरकला नाव, गाव इत्यादी जुजबी प्रश्न विचारेपर्यंत स्पृहाने वहीत मोठय़ा अक्षरात लिहिले, सकाळचा सायकलवाल्याचा आणि िपपळाच्या रोपाचा प्रसंग सरांना सांग. आणि वही त्याच्यासमोर धरली. ते वाचल्यावर प्रेरकला धीर आला. सर त्याच्या जवळ आले आणि त्याला म्हणाले, ‘‘प्रेरक, आठवडय़ाभरात तू कोणते चांगले काम केले, ते सांग. हाच गृहपाठ दिला होता मी.’’ मग वर्गाकडे बघत सर म्हणाले, ‘‘नवीन आलेल्या मुलापासूनच सुरुवात करू मूल्यशिक्षणाची!’’दक्ष, यज्ञ यांनी बाकावर हळूच तबला वाजवायला सुरुवात केली. क्षिप्राने हाताचा अंगठा खाली करून प्रेरकला चिडवले. प्रेरकने मात्र न घाबरता सकाळी घडलेला प्रसंग घडाघडा तपशीलवार सांगितला. सगळा वर्ग अवाक् झाला. सरही खूश झाले. त्यांनी प्रेरकला प्रश्न विचारला, ‘‘तू त्या माणसाला तूपसाखर का दिलीस?’’ सगळा वर्ग शांत झाला. प्रेरक म्हणाला, ‘‘माझ्या आजोबांना मधुमेह आहे. त्यांना चक्कर आली की आम्ही त्यांना साखर खायला देतो. मग लगेच त्यांना हुशारी येते. डॉक्टरांनीच तसे करायला सांगितलेय. त्यांची डाऊन झालेली शुगर भरून निघाली की त्यांना बरे वाटते. मला वाटले, त्या माणसालाही तूपसारखेने हुशारी येईल.’’ हे उत्तर ऐकून सरांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. मग सगळा वर्गच टाळ्या वाजवू लागला.
‘‘तू तुझ्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात छान उपयोग केलास,’’ सर म्हणाले.
प्रेरकला आनंद झाला. त्याचा आत्मविश्वास वाढला. मग दुसऱ्या क्षणी तो म्हणाला, ‘‘ह्या सत्कृत्यात स्पृहा माझ्या सोबत होती. तिने मला मदतही केली.’’ स्पृहालाही भरून आले. ती उभे राहून म्हणाली, ‘‘जसा प्रेरकने िपपळाच्या झाडाला काटकीचा आधार दिला, तसा मी त्याला किंचित टेकू दिला इतकेच.’’
‘‘पण हा टेकूसुद्धा फार महत्त्वाचा असतो, नव्या रोपाला नव्या मातीत रुजायला,’’ असे म्हणत सरांनी स्पृहा आणि प्रेरकला आपल्याकडील पेन भेट म्हणून दिले आणि त्यांना शाब्बासकीही दिली. दिन्या, नेत्रा, दक्ष, यज्ञ, नित्या, समिधा, पार्थ इत्यादी टारगट मुले आश्चर्याने त्या दोघांकडे बघू लागले.
आश्लेषा महाजन – ashleshamahajan@rediffmail.com
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2015 रोजी प्रकाशित
टेकू
बाबांची बदली झाली आणि प्रेरकला नव्या गावात यावे लागले. जुन्या शाळेच्या आठवणी, मित्र, शिक्षक या सर्वाना सोडून मोठय़ा कष्टाने तो इकडे आला. निघताना त्याचे डोळे पाणावले होते, पण काय करणार?

First published on: 05-07-2015 at 12:13 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teku