‘व्यास क्रिएशन’तर्फे स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रकाशित केलेला दीडशे पुस्तकांचा संच मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी तसेच शाळा व पालकांनाही खूपच उपयुक्त आहे. दीडशे या भारदस्त संख्येबरोबरच विषयांतही वैविध्य असलेली ही पुस्तके १०० लेखकांनी लिहिली आहेत, हे या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्टय़. लहान मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याचा हा सामूहिक प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. पुस्तकांच्या विषयात खूपच वैविध्य आहे. मुलांना ज्या रहस्यकथा, लोककथा, परीकथा, भूतकथा, कार्टून यांचे आकर्षण असते ती पुस्तके तर आहेतच; परंतु माहितीपर अनेक विषयांवरची रंजक पुस्तकेही आहेत. त्यात पर्यावरण, विज्ञान, संगीत, चित्रकला, शिल्पकला, नाटय़, हस्ताक्षर, भाषा, व्यंगचित्र, गणित, निसर्ग, अवकाश असे विषय आहेत. दैनंदिन शाळेत उपयुक्त असणारे सामान्यज्ञान, संगणक, सायबरविश्व, उपयुक्त वेबसाइटस्, छंद, आरोग्य असेही विषय आहेत. विद्यार्थ्यांना विविध शालेय प्रकल्पांसाठी ही पुस्तके उपयोगी ठरतील.
विजया राजाध्यक्षांचे वसंत ऋतू किंवा ‘फेरफटका फुलासंगे, किल्ले, प्रवासवर्णन अशी पुस्तके  मुलांमध्ये निसर्गप्रेम विकसित करतील. या संचात एक चरित्रमालिकाही आहे. त्यात भगतसिंग, रामकृष्ण परमहंस, विनोबा यांचा समावेश आहे.
 लेखकांमध्ये प्रामुख्याने शकुंतला फडणीस,
रा. ग. जाधव, यु. म. पठाण, द. भि. कुलकर्णी, भारत सासणे, विजया राजाध्यक्ष, शंकर सारडा यांसह अनेक लेखक आहेत. या सर्व लेखकांनी मुलांसाठी आनंदाने लिहिले आहे. ही सर्व पुस्तके अगदीच छोटी म्हणजे १६ ते २४ पानांची आहेत. पुस्तकांची किंमत प्रत्येकी २० रुपये इतकी आहे. त्यात छान चित्रे आहेत. बहुतेक पुस्तकांच्या मलपृष्ठावर एक चांगली मराठी कविता उद्धृत केली आहे. तर काही पुस्तकांच्या मागे मराठी साहित्यिकांचा परिचय आहे.
हेमा लेले यांची ‘अरे संस्कार संस्कार’ ही १५ पुस्तकांची मराठी व इंग्रजीतील मालिका ही स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली आहे. आकाराने छोटी, किमतीने कमी व विषयांत वैविध्य असा प्रयोग मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजवायला महत्त्वाचा आहे. मुलांना खाऊच्या पशात पुस्तक घेता आले पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून जास्तीत जास्त पुस्तके  बाजारात यायला हवीत.                                                       
खजिना १५० पुस्तकांचा, व्यास क्रिएशन्स, संपूर्ण संच किंमत- ३००० रुपये, सवलतीत २५००.                

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिंदूजोडा व चित्ररंगवा

More Stories onवाचनReading
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Treasury of 150 books
First published on: 10-08-2014 at 01:01 IST