डॉ. तेजस्विनी कुलकर्णी
dr.tejaswinikulkarni@gmail.com
आज एका वाढदिवसाला जायचं असल्यामुळे केतकीची स्वारी एकदम खुशीत होती. काय करू नि काय नको, असं झालं होतं तिला. सकाळपासूनच ती वेगवेगळे कपडे घालून पाहत होती. केसांची कोणती हेअरस्टाईल करायची याचा अधूनमधून अंदाज घेतला जात होता. ‘‘या कपडय़ावर कोणतं कानातलं घालू गं?’’ असे नाना प्रश्न तिच्या ताईला विचारत होती. एकंदरीत तिला आज झक्कास दिसायचं होतं. तिच्या बेस्ट फ्रेंडचा वाढदिवस होता ना!
‘‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्राची!’’ तिने आल्या आल्या प्राचीला घट्ट मिठी मारली. बालवाडीपासूनच्या मत्रिणी त्या. एकमेकींशिवाय पान हलत नसे त्यांचं! प्राचीच्या घराजवळचे, शाळेतले असे अनेक मित्र-मत्रिणी जमले होते. गप्पा-टप्पा, हसणं खिदळणं, खाणं असं सगळं काही मजेत चालू असताना एकदम प्राचीचं लक्ष केतकीकडे गेलं. तिचा चेहरा एकदम हिरमुसला होता. डोळेदेखील पाणावले होते. ‘आत्ता तर हसत होती ही, लगेच काय झालं असावं हिला?’ प्राची विचारात पडली.
ती हळूच केतकीजवळ आली नि तिला आतल्या खोलीत घेऊन गेली. प्राचीकडे पाहून तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. ‘‘सांगणारेस का राणी आता काय झालं ते?’’ प्राचीने केतकीला विचारलं.
केतकी शरमलेल्या आवाजात म्हणाली, ‘‘मी खूपच विचित्र दिसतेय ना आज, अगदी विदूषकासारखी?’’
‘‘छे! हे कुठून शिरलं तुझ्या डोक्यात?’’
‘‘तुझ्या शाळेतली ती ऋता असं म्हणाली मला. आणि मग सगळे माझ्या एकेका गोष्टीची टर उडवत हसायला लागले.’’ केतकीने वृत्तान्त दिला. ‘‘कोणी म्हणालं माझे केस म्हणजे पक्ष्याचं घरटं आहे, कोणी म्हणत होतं की माझा पोशाख मजेशीर आहे, तर कोणी माझ्या मेकअपची थट्टा..’’
‘‘हं, आलं लक्षात. अगं, त्या गंमत करत असतील. सोडून दे. तू लक्ष नको देऊस.’’ प्राचीने थोडी फुंकर घालायचा प्रयत्न केला.
‘‘असं कसं? मला वाईट का नाही वाटणार मी विदूषकासारखी दिसतेय तर? मला आज खूप छान दिसायचं होतं गं.’’ उदासपणे केतकी म्हणाली.
‘‘वेडीच आहेस तू.’’ प्राची हसत म्हणाली. ‘‘कोणी तुला विदूषक म्हणणं आणि तू खरंच विदूषकासारखी दिसणं यात काही फरक आहे का नाही! अभ्यासात एवढी हुशार नं तू, मग एवढा फरक कसा लक्षात नाही आला तुझ्या?’’
‘‘म्हणजे?’’ केतकी आता पुरतीच गोंधळली.
‘‘अगं वेडाबाई, तू विदूषकासारखी दिसतेस हे ऋताचं ‘मत’ झालं. पण ते ‘सत्य’ आहे का, याचा विचार केलास? ‘सत्य’ आणि ‘मत’ यातला फरक बघ बरं! काय ठोस पुरावा आहे आपल्याकडे, तू विदूषक दिसतेस याचा? मला तर उलट तू आज खूप गोड दिसतेस असं वाटतंय.’’
‘‘अरेच्चा! मी तर कधी हा विचारच नाही केला, की ‘सत्य’ आणि ‘मत’ या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात.’’ केतकीला साक्षात्कारच झाला जणू. ‘‘पण मला एक सांग प्राची, तुझ्या एकटीचं मत हे की, मी छान दिसतेय. पण त्या तर सात-आठ जणी होत्या ज्यांना मी विदूषकासारखी दिसत होते. मग त्यांचंच मत सत्य मानायला पाहिजे ना?’’
‘‘हं. थोडी अजून चालना दे बरं विचारांना.’’ प्राची ने केतकीच्या बुद्धिमान मेंदूला साद घातली. ‘‘एक क्लू देते तुला- ‘गॅलिलिओ’! काही उमगतंय का?’’
प्राचीच्या या क्लूने केतकीला क्षणात काहीतरी आठवलं आणि तिचा चेहरा मस्त खुलला. ‘‘अगं खरंच की! पंधराव्या शतकापर्यंत पृथ्वी सपाट आहे असा समज होता जगाचा. अर्थात, असं त्या काळातल्या जवळजवळ सर्वच शास्त्रज्ञांचं ‘मत’ होतं. बरोबर! एकटा गॅलिलिओ सांगत होता की पृथ्वी गोल आहे. पण बहुतांश लोकांचं फक्त ‘मत’ होतं म्हणून ते सत्य थोडीच होतं? पृथ्वी तर गोलच आहे. गॅलिलिओचं मत सत्य ठरलं.’’
‘‘एकदम बरोबर!’’
‘‘अरे हो! बरोबर बोलतेस तू प्राची. आणि या तर्काप्रमाणे आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला, तर मी कशी दिसते, यात त्यांच्या मताला अवाजवी महत्त्व देण्याची काहीच गरज नाही. ते सत्य असेलच याची शाश्वती नाही.’’
आता कुठे प्राचीला हायसं वाटलं. पुढे तिने केतकीला तिच्या अनुभवातल्या काही गोष्टी सांगायला सुरुवात केली.
‘‘केतकी, आपण छान दिसतो का वाईट, याचा नक्की पुरावा काहीच असू शकत नाही. आपण जितकं स्वत:बद्दलचं आपलं मत चांगलं, सकारात्मक ठेवू तितकं आपल्यासाठी ते सत्य ठरतं. जरी आपल्या एखाद्या गोष्टीला कोणी हिणवलं, चिडवलं, तरी ते त्यांचं ‘मत’ आहे, ‘सत्य’ असेलच असं नाही, असं म्हणून सोडून द्यायचं. हां, एखादी सुधारण्यासारखी गोष्ट असेल आपल्यात, तर ती नक्की सुधारायची. फक्त अनावश्यक वाईट वाटून घ्यायचं नाही. आपण स्वत:चे चांगले-वाईट गुण नक्की ओळखू शकतो. आपल्या चांगल्या गुणांचा आदरसुद्धा करायचा. स्वत:च स्वत:ची पाठ थोपटायची. मला जेव्हा कधी कोणी काही चिडवतं, तेव्हा मी आपली असा विचार करते. बघ तुला हे उपयोगी पडतंय का ते!’’
केतकीला आता आतून एक नवी ऊर्जा मिळाल्यासारखं वाटत होतं. प्रत्येक वेळी जेव्हा असा प्रसंग येईल, तेव्हा कोणाचंही ‘मत’ आणि ‘सत्य’ यातील फरक पडताळून पाहण्याचा तिने आज निश्चय केला.