आयुष्यात स्वस्थ बसणं कधी जमलंच नाही. नोकरी केली नाही तरी सतत काही ना काही उद्योग चालूच असायचे माझे. मुलांना शिकवता शिकवता त्यांच्या मित्र-मैत्रिणींनाही दुपारच्या वेळेत शिकवू लागले आणि घरात शिकवणीचे वर्गच भरायला लागले. पतीराज परदेशी असल्यामुळे घरात मुलांचा आणि त्याच्या मित्रमंडळींचा धुमाकूळ चालत असे. पुढे मुलगा इंजिनीअरिंगला असताना त्यांच्या सबमिशनच्या वेळी दिवस-रात्र अड्डा असे आमच्या घरी. मग त्या मुलांची खाण्यापिण्याची काळजी वाहण्याचे कामही केले. खूप काही करण्याची ऊर्मी होती; पण पती परदेशी असल्यामुळे एकचाकी गाडी चालवायची होती. मुलांना सोडून बाहेर जाऊ  शकत नव्हते; परंतु घरातच राहून जे करता येईल ते करत होते. घरातच दोन तासांसाठी नर्सरीही चालवली.

मुलीचं लग्न झालं आणि रिकामपण जाणवू लागलं. पुढे काय? माझी विहीण कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल असल्यामुळे तिने माझी समाजकार्याची असलेली आवड जाणून एका एनजीओमध्ये बेकरी इन्स्ट्रक्टर म्हणून काम कराल का, असं विचारताच चक्क होकार दिला. त्या वेळी वय वर्ष ५८ आणि आतापर्यंत बाहेरच्या जगात वावरण्याचा अनुभवही नाही; पण आत्मविश्वास होता. घेतली उडी आणि सांगायचं म्हणजे त्या एनजीओमध्ये अपंग मुलांना चॉकलेट्स, केक, कुकीज, मफिन्स शिकवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करण्याचे काम सलग चार वर्षे केले आणि समाजाचे काही देणे देण्याचा प्रयत्न केला. अपंग मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच विसरू शकत नाही. सध्या मी श्रीमती मनीबेन एम.पी. शाह, एस.एन.डी.टी. माटुंगा कॉलेजमध्ये ‘कौशल्य सेतू अभियान’ या पंतप्रधानांच्या प्रकल्पांतर्गत १० वी नापास झालेल्या मुलींना क्राफ्ट बेकरी कोर्स शिकवत आहे. हा कोर्स ६ महिन्यांचा आहे. तळागाळातल्या गरीब मुलांना शिकवण्याचा आनंद घेत आहे. येथे मुलींना व्यवसायाभिमुख बेकर्सचे शिक्षण दिले जाते. या मुलींना केक, कुकीज, मफिन्स, ब्रेड्स, पिझ्झा बनवायला शिकवते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सुधारण्याचे शिक्षण देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा छोटासा प्रयत्न मी करीत आहे. त्यामुळे मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न मी करीत आहे. मुले जवळ नसण्याचे दु:ख उराशी न बाळगता समाजातील गरीब अपंग मुलांना आपल्या जवळचे ज्ञान देऊन सुरू केलेला यज्ञ आज वयाच्या ६५ व्या वर्षीही सुरू आहे.

आयुष्य भरभरून जगता यावं यासाठी हा प्रपंच. हे सारं करताना अपंग, मतिमंद मुलांच्या घरच्या समस्या पाहून माझे मन हेलावून तर गेलेच, पण मुलगी आहे म्हणून तिला शिक्षण कशाला? ही धारणा असलेल्या समाजाच्या एका वर्गाची कीवही कराविशी वाटते.        – अलका वैद्य

 

दुनिया में कितना गम है..

परिस्थिती माणसाला जगवते, घडवते, बिघडवते. ‘गरज ही शोधांची जननी आहे’ असे म्हणतात ते खोटे नाही. याचा अनुभव मला माझ्या जीवनात आला; अनेकदा आला, पुन:पुन्हा आला. २०१४ हे वर्ष माझ्या आयुष्यातील खडतर वर्ष. याच वर्षांत माझ्या मायेची माणसं मावशी, मामी, मामा मला मायेपासून वंचित करून गेले. तेव्हा माझे ७२ वे वर्ष चालू होते. २००९ मध्ये वार्धक्याने वयाच्या ९५ व्या वर्षी वडील वारले. तो धक्का जाणवला नाही, कारण मनाची तयारी झाली होती; पण मावशी, मामी, मामा मात्र अकस्मात गेले. ध्यानीमनी नसताना गेले. संकटे कधीच एकटी येत नाहीत; जोडीने येतात, कधी झुंडीने येतात. २०१४ च्या आरंभी मावशी, मामा, मामी यांच्या मृत्यूचा आघात पचवतच होतो तोच फेब्रुवारीमध्ये अचानक माझे पोट भयानक दुखू लागले अन् मग चालू झाल्या तपासण्या, सोनोग्राफी, अ‍ॅण्डोस्कोपी, स्कॅन झाले अन् पित्ताशयाला इजा झाल्याचे आणि इलाज न झाला तर ‘कर्करोगा’ची शक्यता. तातडीने शस्त्रक्रिया करूनच पार पाडावी लागली. माझ्या नित्य व्यायामामुळे मी त्यातून बाहेर पडलो. लोक हातापायाने अपंग होतात, मी पोटाने अपंग झालो. मला ५४ वर्षे साथ देणारी माझी पत्नी हवालदिल झाली. तिला घशाच्या कर्करोगाने घेरले आणि माझ्या शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या महिन्यात एप्रिलला तिची शस्त्रक्रिया झाली, त्यातून ती सावरू शकली नाही. माझ्या आजारपणाच्या काळात मार्चमध्ये पुतण्या कर्करोगाने गेला. एप्रिलच्या प्रारंभी लहान भाऊ ब्रेन टय़ुमरने वारला आणि मेच्या प्रांरभी पत्नीने जगाचा निरोप घेतला.

मृत्यूचे हे तांडव माझ्या तिन्ही मुलांना, सुनांना आणि उर्वरित तीन भावांच्या परिवाराला हादरा देऊन गेले. सारे सुन्न झाले, एक प्रकारची बधिरता आली. त्यातून सावरतच होतो की, फेब्रुवारी २०१५ ला माझ्या एकुलत्या एक मुलीचे पती, माझे जावई वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी अकस्मात मरण पावले. मला या सर्वाना सावरणे भाग होते, उमेद देणे भाग होते. चेहऱ्यावर अंतर्मनातील आगडोंब येऊ न देता मला हे अग्निदिव्य पार पाडावे लागले. अर्धागिनी गेल्यामुळे माझा संसार संपला होता. सर्व परिस्थितीला झुंजताना एकटेपणा खायला उठायचा. मुलांचे संसार फुलाफळाला आले होते. स्वतंत्रपणे तिघेही तीन ठिकाणी स्थिरस्थावर होते. त्यांना माझी गरज जाणवणार नव्हती. मुलीचा उघडा संसार- दोन मुले, एक मुलगी यांना मायेची पाखर हवी होती. मी मुलीकडे राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणावा तेवढा सोपा नव्हता. मी महाराष्ट्रातील, माझी भाषा – मराठी. मुलगी बिदर कर्नाटकमध्ये राहणारी, भाषा ‘कानडी’. घरातच फक्त ‘मराठी’ बोलली जायची. माझा कोंडमारा झाला आणि दुनिया में कितने गम है, तेरा गम कितना कम है, दुनिया का गम देख लिया तो मेरा गम मै भूल गया – या हिन्दी गाण्याने जीवनाची दिशाच बदलून गेली.

मी माझ्या जीवनाचा आलेख लिहायला घेतला आणि ‘रणांगण’ या पुस्तकाची निर्मिती झाली. काही कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. माझ्या हिन्दी कवितेला २०१६ ला युद्धवीर फाऊंडेशन हैदराबादचा पुरस्कार मिळाला. आज १०० हिन्दी, २०० मराठी कविता तयार आहेत. अजून ती प्रक्रिया अविरत चालू आहे. आता माझा वेळ कसा जातो तेच कळत नाही. ग्रंथ प्रकाशनानंतर त्याचे होणारे कौतुक मासिकांतून, वृत्तपत्रांतून येणाऱ्या कविता माझ्या जीवनाचे ‘जीवनसत्त्व’ ठरून उभारी देत आहेत. चालता-बोलता, फिरता, बसता, उठता बस्स. ‘शब्दची माझे धन, शब्दची माझी शक्ती’, जी अपरंपार आहे. माझ्या आयुष्याला पुरून उरणारी आहे. भरभरून जगण्याची उमेद देणारी ठरली आहे.   – अरविंद फुलारी, लातूर

 

बँकिंग सर्वासाठी मीसूर्यकांत गन्द्रे, वय वर्षे ७८, बदलापूरचा रहिवासी. वयाच्या १८ व्या वर्षी पंजाब नॅशनल बँक, मुंबई येथे लिपिक म्हणून नोकरीस लागलो आणि एकंदर ४२ वर्षे बँकेच्या विविध पदांवर भारतभर नोकरी केली. ऑक्टोबर २०१७ मध्ये मला निवृत्त होऊन १८ वर्षे पूर्ण झाली आहेत.

१९९९ मध्ये निवृत्त झालो. कामाच्या प्रचंड व्यापामुळे निवृत्तीनंतर पुढील काळात कसे जीवन जगावे याचा प्रश्न मला सतावू लागला. माझी मुले आपल्या जीवनात स्थिरस्थावर झाली असल्याने आपल्या बँकिंगमधील अनुभवाचा सदुपयोग करावयाचा या उद्देशाने पुण्यामधील काही प्रथितयश चार्टर्ड अकाऊंटंटना साहाय्य करण्यासाठी पुढे आलो आणि आज शहरातील सर्व प्रमुख बँका आणि सहकारी बँकांमध्ये माझी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आमच्या बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ‘रिटायरी फोरम’मध्ये भाग घेऊन त्यांना विविध प्रकारे मदत करत आहे. हेल्थ इन्श्युरन्सच्या क्लेम सेटलमेंटसाठी मला मुंबई/पुण्यामधील निवृत्त सहकाऱ्यांकडून सतत विचारणा होते आणि मी त्यांना सतत मार्गदर्शन करीत असतो. आमच्या सोसायटीमध्ये २०० फ्लॅट्स आहेत. सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वानी ‘वेस्ट एण्ड व्हिलेज सीनियर सिटिझन ग्रुप’ पाच वर्षांपूर्वी स्थापन केला असून सर्व प्रकारचे साहाय्य आम्ही एकमेकांना करीत असतो. गेल्या चार वर्षांपासून आमच्या सोसायटीच्या रिक्रीएशन हॉलमध्ये आम्ही कराड अर्बन सहकारी बँकेच्या सहकार्याने नाशिक येथील ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ यांचे मोफत वाचनालय चालवीत आहोत. या वाचनालयात दर तीन महिन्यांनी १०० पुस्तकांची पेटी पाठविली जाते आणि येथील रहिवाशांना वाचनाची गोडी लागावी म्हणून आमचा प्रयत्न असतो. आज आमच्या वाचनालयात विविध विषयांवर १००० पुस्तके असून त्यामध्ये सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी त्यांना स्वत:ला भेट मिळालेली सुमारे १२५ पुस्तके, तसेच निवृत्त ट्रेनिंग मॅनेजर (कॅनरा बँक ट्रेनिंग सेंटर) सरस्वती रामन यांनी आपल्या संग्रहामधील दिलेल्या ४५० पुस्तके यांचा समावेश आहे. या वर्षी आमच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस आम्ही मे २०१७ मध्ये साजरा केला. सदर प्रसंगी मला भेट म्हणून मिळालेली ५० हून अधिक पुस्तके मी वाचनालयास दिली.

समाजातील गरजू, कष्टाळू आणि कमी उत्पन्न गटातील सेल्फ एम्प्लॉइड नागरिकांना स्टेट बँक आणि इतर बँकांमधून गृहकर्ज मिळवून देण्यासाठी मी अथक प्रयत्न करून कर्जे मिळवून दिली. कर्ज मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद पाहून मला खराखुरा आनंद मिळतो. इतकेच नव्हे तर मी पुण्याच्या हिराबाग येथील टाऊन हॉल कमिटी – डेक्कन क्लबचा गेली १८ वर्षे सभासद असून महिन्यातून साधारण १० ते १२ दिवस संध्याकाळी ५ ते ८ हजर असतो आणि क्लबच्या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतो. याशिवाय आमच्या कोथरुड येथील ‘सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचा मी सभासद आहे. आमचा संघ अ‍ॅस्कॉप या ज्येष्ठ नागरिक संघटनेशी संलग्न आहे. अ‍ॅस्कॉपच्या सहकार्याने मी ‘मला भेटलेली लहान, थोर माणसे’ या नावाचा एक तासाचा भाषणाचा कार्यक्रम सुरू केला असून मला पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमासाठी मी कोणतेही मानधन घेत नाही. माझ्या ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींना मिळणारा आनंद मला खूप आनंद आणि ऊर्जा मिळवून देत असतो. निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी काही तरी करत राहावे या विचाराने माझी वाटचाल चालूच आहे.         – सूर्यकांत गन्द्रे, पुणे</strong>