कोल्हापूर जिल्ह्य़ातल्या आजरा तालुक्यात असणाऱ्या उत्तुर या दहा हजार लोकवस्तीच्या खेडय़ातील कनिष्ठ महाविद्यालयातून निवृत्त झालो. हे सेवानिवृत्तीचे वर्ष जवळ आले आणि माझ्या लक्षात आले की, खूप काही करायचे राहून गेले आहे. आज निवृत्त होऊन १५ वर्षे झाली. लहानपणापासूनच राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारात वाढल्यामुळे कामाचा कंटाळा कधी आला नाही किंवा अमुक काम करताना कधी लाज वाटली नाही.

साधारण १८ वर्षांपूर्वी माझ्या काही सरकारी मित्रांना घेऊन ‘त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा संस्था’ स्थापन करून उत्तुर या ठिकाणी ‘संत ज्ञानेश्वरी लोकशिक्षण व्याख्यानमाला’ सुरू केली होतीच. महाराष्ट्रातून आजपर्यंत १०० हून अधिक नामवंत वक्ते, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते येऊन गेले. सामाजिक प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम म्हणून ही व्याख्यानमाला ओळखली जाते. या संस्थेचे दुसरे काम म्हणजे शिक्षण क्षेत्रातील ध्येयवादी, उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना समाजासमोर आणून ‘पद्मभूषण, डॉ. जे. पी. नाईक आणि शिक्षणतज्ज्ञ दादा नाईक गुणवंत शिक्षक पुरस्कारांनी’ सन्मानित करून प्रोत्साहन देण्याचे काम केलेले आहे.

निवृत्तीनंतरही आपण शिक्षण क्षेत्रात काम करायचे असे ठरवून मोफत ‘हस्ताक्षर सुधारवर्ग’ संस्कार वर्ग घेत असतो. शिक्षकांकरिता विविध विषयांच्या कार्यशाळा घेतल्या जातात. मी स्वत: उद्बोधन वर्गात मार्गदर्शक म्हणून वर्षभर अनेक शाळांत जातो, मार्गदर्शन करतो, तेही विनामूल्य. सामाजिक कामाची आवड असल्यामुळे ज्येष्ठांच्या, आनंदवन, हेमलकसा, गडचिरोली येथे सहली आयोजित केल्या. या परिवाराशी नाते जोडून गेली १७ वर्षे कपडेदान, औषधे, रोख स्वरूपात मदत यासाठी लोकसंपर्क करण्यात एक वेगळाच आनंद मिळत गेला आहे. वेळ अपुरा पडतो. वयाचे भानही राहत नाही. आमच्या भागात डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाताई आमटे, बैरागडचे डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांना आवर्जून निमंत्रित करून त्यांचे विचार, कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. यामुळे अनेकांना ही ठिकाणे बघण्याची प्रेरणा मिळाली.

‘वाचन चळवळ’ ही माझ्या आवडीची गोष्ट आहे. दरमहा एक पुस्तक खरेदी, ही माझी गेल्या ४० वर्षांपासूनची परंपरा आहे. माझे स्वत:चे समृद्ध ग्रंथालय आहे. हे जसे वैयक्तिक तसेच इतरांनाही प्रोत्साहन देऊन ग्रंथ खरेदी करण्यास प्रोत्साहन देतो. कोल्हापूरचे प्रकाशक त्रिभुवन जोशी यांच्या सहकार्याने अवघ्या १२ रुपयांत ‘श्यामची आई’ पुस्तक उपलब्ध करून घेतले आणि त्यांच्या एक लाख पस्तीस हजार प्रती शाळाशाळांतून, घरोघरी वितरित केल्या. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

दिवाळीच्या सुटीत शाळाशाळांमध्ये सहकारी शिक्षकांना घेऊन मुलांना आकाशकंदील तयार करणे, ग्रीटिंग्ज तयार करणे यांसारख्या कार्यशाळा घेत असतो. माझे ग्रंथप्रेम पाहून माझ्या आजूबाजूच्या अनेक गावांतील माझ्या विद्यार्थ्यांनीही ग्रंथालये सुरू केली. ही सुरू करण्यासाठी पहिली मदत माझी. अशी आत्तापर्यंत जवळजवळ २५ ग्रंथालये उभी राहिली. अशी माझी वाचन चळवळ बहरत असलेली पाहिली की समाधान वाटते.

समाजभान निर्माण करणे हे आणखी एक काम हाती घेतले. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याची सवय लावणे, मोठय़ांसाठीही दररोज घेणाऱ्या चहापैकी एक कप चहा वाचवून मदत करण्याचा उपक्रम, दरमहा १०० रुपयांत समाजसेवा उपक्रमांतर्गत गरजू, निराधारांना कपडे, जेवणाचे डबे आदी मार्गाने मदतीची कल्पना देऊन ही चळवळ सुरू ठेवली आहे. नव्याने लेखन करणाऱ्या लेखक-लेखिकांना प्रोत्साहन देऊन लेखन करून घेतो आणि त्यांना प्रकाशक मिळवून देऊन त्यांची पुस्तकेही प्रकाशित करीत असतो. असे नवे ३०-३५ लेखक आज लिहीत आहेत.

यातूनच यंदा पहिले त्रिवेणी ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरवले. नामवंत साहित्यिकांना बोलावले, नवोदितांना संधी दिली. या संमेलनात नवीन १० लेखकांची पुस्तके प्रकाशित केली.

संगीत हा माझा खास जिव्हाळ्याचा भाग. ‘रसिका तुझ्याचसाठी’ या आमच्या मंडळामार्फत तीन महिन्यांतून एकदा संगीत मैफलींचे आयोजनही करतो. संकेश्वरला आमच्या घरी गेली ४५ वर्षे श्री टेंब्ये स्वामी संगीत महोत्सव भरवत असतो.

अशा अनेक उपक्रमांमधून जगण्यातला आनंद भरभरून मी तर घेतोच, पण इतरांनाही त्यात सामील करून घेतो. हे सर्व करताना वय विसरूनच जातो. आज वयाच्या ७२ व्या वर्षीही त्याच उत्साहाने काम करतो आहे. भरभरून जगतो आहे. आचार्य अत्रे म्हणतात, ‘आयुष्यात कंटाळा येण्यासारखे काहीच नाही. आयुष्य नित्यनवे भासते. त्याचा आनंद भरभरून घ्यावा.’

प्रा. श्रीकांत नाईक, कोल्हापूर

 

या नभाने या भुईला दान द्यावे

मी एक स्त्रीरोगतज्ज्ञ- प्रसूतिशास्त्रज्ञ, गेली ३७ वर्षे स्वतंत्र व्यवसाय करीत आहे. माझं वय ६४ वर्षे. पूर्वी इंटर्नशिप करताना लीला मुळगांवकर यांना मी सामाजिक कार्य करताना पाहिले ते खेरवाडीच्या अंगणवाडीत आणि त्यानंतर समाजाकडे, अवतीभवती पाहाताना माझी दृष्टीच बदलली. डॉक्टरांना निवृत्ती नसते. म्हणूनच २०१० पासूनच सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्यांतून पार पडल्यानंतर मला माझ्या आतल्या आवाजाची जाणीव होऊ लागली. मग आठवडय़ातील काही दिवस संध्याकाळी मी सतत समाजकार्यास वाहून घेतले. त्यात भारतीय स्त्री संघटना, हुंडाविरोधी चळवळ, अस्मिसाठी लिखाण, वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन, दूरदर्शन-आकाशवाणीवर स्त्री आरोग्यासंबंधित अनेक कार्यक्रम, सूर-संजीवनसाठी स्त्री जीवनाचा वैज्ञानिक आढावा व अनेक कर्करोगचिकित्सा व कार्यशाळा यांचे आयोजन व सहभाग करत असतानाच मी ‘अंकुरला वृक्ष’ हे मराठीत स्त्री आरोग्यविषयक पुस्तक डॉ. राणी बंग यांच्या हस्ते, तर हिंदी भाषांतरित पुस्तक श्रीमती निर्मलाताई आपटे यांच्या हस्ते प्रकाशित झाले.

‘जीवनज्योत’ या दिवाळी अंकाच्या संपादनाचे काम आले आणि मी स्वत: पूर्णपणे त्यात उतरले. आपल्यासाठी आपण आतापर्यंत जबाबदाऱ्या निभावत जगलो, पण आता मात्र गेली ६-७ वर्षे किंबहुना त्याआधीपासूनच ठरवले की, आता इतरांसाठी मला जगता आलं पाहिजे. इच्छा हा मानवी प्रगतीचा महत्त्वपूर्ण प्रेरणास्रोत. या इच्छेमुळेच एक संधी चालून आली. लोकमान्य सेवा संघ, पारले या सामाजिक संस्था- सी. म. जोशी दिलासा केंद्र हे बावीस शाखांतील एक आणि या केंद्राचा उजवा हात म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली हेल्पलाइन. १६ जानेवारी २०१० रोजी प्रथितयश मनोवैज्ञानिक प्रतिमा हवालदार यांच्या हस्ते ‘दिलासा’ उपक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर अनेक कार्यशाळा झाल्या, ज्येष्ठ नागरिकांची प्रथम उपस्थिती होती. यात नेत्रदान, अस्थिघनता चाचणी, असावं जगणं आपुलं छान, सुजोक पद्धती अशा नानाविध आरोग्यातील समस्या तसेच आध्यात्मिक, साहित्यिक चर्चा होऊ लागल्या. आता सभासद संख्या २३१ आहे.

आज सात वर्षांच्या या उपक्रमात साहित्य, काव्य, अध्यात्म, मनोरंजन, मेंदूसाठी कार्यशाळा, पाककला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नववर्षांचे स्वागत, प्रवासवर्णनांचे दृक् -श्राव्य कार्यक्रम, कथाकथन, वाचक आपल्या भेटीस, आपल्याच समूहातील आपल्या शेजाऱ्याची त्याच्या गुण-अवगुणासह ओळख, काही वेळेस वृद्धाश्रम एक संकल्पना, कुटुंब न्यायालयातील काही केसेसचे विवेचन अशा चर्चा होतात. दिलासा केंद्राच्या अध्यक्ष बागेश्री परीख या स्वत: कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश आहेत. या हेल्पलाइनच्या समन्वयक आहेत. आम्ही सर्व बावीस जण स्वयंसेवी कार्यकर्ते सोमवार ते शनिवार लोकमान्य सेवा संघ, पार्ले येथील हेल्पलाइनची धुरा सांभाळतो. यात अनेक वेळा आम्ही मुंबई व मुंबईबाहेरील वृद्धाश्रमांना भेटी दिल्या. आम्ही सर्वाना ज्ञात होण्यास ‘वृद्धाश्रम पुस्तिका’ ही प्रकाशित केली आहे. देहदान, नेत्रदान, अवयवदान याबाबत जागरूकता व देहदान-त्वचादान-नेत्रदान यासाठी नोंदणीही करण्याची हेल्पलाइनद्वारे व्यवस्था आहे.

ज्येष्ठ नागरिक जेव्हा वृद्धाश्रमांना भेटी देऊन तेथील निवासींशी संवाद साधतात तेव्हा कवी ना. धों. महानोर यांच्या या ओळी आठवतात  –

या नभाने या भुईला दान द्यावे

आणि या मातीतून चैतन्य यावे

कोणती स्वप्ने अशी येती फळाला?

जोंधळ्याला चांदणे लगडून जावे!

– डॉ. रश्मी फडणवीस, विलेपार्ले (पूर्व)

 

एल.एल.एम. अ‍ॅट सिक्स्टी

मला पहिल्यापासूनच शिक्षणाची खूप आवड आहे. तसा मी मूळचा नाशिकचा. रसायनशास्त्र विषय घेऊन एम.एस्सी. केल्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. महाराष्ट्र शासन वन विभाग आणि विक्रीकर विभाग या दोन्हीसाठी परीक्षा दिल्या. त्याचप्रमाणे सीमाशुल्क विभागासाठीही परीक्षा दिली. सगळय़ाच परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. ‘कस्टम प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर’ म्हणून निवडही झाली; पण सेवेत रुजू होण्याआधीच आणीबाणी घोषित झाली आणि नियुक्ती रद्द झाली. याच दरम्यान वन विभागातून निवड झाली आणि तिथे रुजू झालो. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्हे नागपूर, गोंदिया, भंडारा, ठाणे, डहाणू, यावल वन विभाग, अगदी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातही नेमणूक झाली. शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. मग नोकरी करता करताच एल.एल.बी. करायचे ठरवले आणि मग राज्यातील विविध जंगले पार करता करता, तेथील अडचणी सोडवता सोडवता पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या नाशिकमधील एनबीटी विधि महाविद्यालयातून एल.एल.बी. पूर्ण केले. संसार, नोकरी, शिक्षण हे सगळं करत करत सेवानिवृत्तीची वेळ कधी आली हे समजलंच नाही. विभागीय वनाधिकारी म्हणून समाधानाने सेवानिवृत्त झालो.

आता पत्नी आणि मुलांबरोबर आनंदात राहू असं वाटत असतानाच अचानक एक व्याधी उद्भवली आणि त्याची शस्त्रक्रियाही करावी लागली. काही महिने असेच आरामात गेले; पण माझ्यातला विद्यार्थी मला शांत बसू देईना. (माझी पत्नी चेष्टेने मला ‘स्टुडंट’च म्हणते) आणि मग बऱ्याच वर्षांपासून मनात असलेल्या इच्छेने पुन्हा जोर धरला आणि मी एल.एल.एम. करायचे ठरवले. तोपर्यंत आम्ही पुण्यामध्ये स्थायिक झालो होतो. मग पुणे विद्यापीठांतर्गत शाहू कॉलेज परिसरातील यशवंतराव चव्हाण विधि महाविद्यालयात प्रवेश घेतला. वयाच्या साठीला मी पुन्हा एकदा विद्यार्थिदशेत आलो. महाविद्यालयातला पहिला दिवस तर गमतीचाच झाला. वर्गात प्रवेश करताच सर्व तरुण, मित्र-मत्रिणी प्राध्यापक आले असे समजून उभेच राहिले. नव्या उत्साहाने मी आता पुन्हा अभ्यासाला लागलो आहे. कधी गरज पडल्यास माझ्या तरुण मित्र-मत्रिणींना मी मार्गदर्शनही करतो. माझ्या सर्व असाइनमेंट पूर्ण करायला, संगणकावरील काम तातडीने पूर्ण करून द्यायला मला माझी दोन्ही मुलं मदत करू लागली. निवृत्त झाल्यावरही पत्नीला वेळ न देता पुन्हा कॉलेज-अभ्यास हे सुरू केलं आणि तिनेही हे सहज मान्य केलं. ही तिची मदतच आहे. प्रथम वर्ष चालू असतानाच माझ्या मोठय़ा मुलाचं लग्न ठरलं. आता मुलांबरोबरच सूनही असाइनमेंट पूर्ण करण्यास मदत करते. या नवीन शैक्षणिक प्रवासात यशवंतराव चव्हाण विधि महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक या सर्वाचेच मला अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. मुलांचा अभ्यास घ्यायला मी कधीच फारसा वेळ देऊ शकलो नाही, पण आता फार गंमत वाटते. जेव्हा मुलं परीक्षेच्या वेळी काळजीपूर्वक विचारपूस करतात की, ‘पपा, अभ्यास नीट झाला का? टेन्शन घेऊ नका.’ माझी पत्नी ही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करते. त्यामुळे आता मुलं कामावर आणि त्यांचे आई-वडील अभ्यास करीत आहेत, असे आमच्या घराचे चित्र आहे.

आमच्या वन विभागातील सर्व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे दरवर्षी स्नेहसंमेलन (सहकुटुंब) असते. दरवर्षी वेगवेगळय़ा राज्यांमध्ये ते आयोजित केले जाते. त्यानिमित्ताने दरवर्षी राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशी वेगवेगळी राज्ये फिरून होतात. अशा दहा-बारा दिवसांच्या स्नेहमेळाव्याने वर्षभराची ऊर्जा मिळते. वेगवेगळय़ा विभागांमध्ये काय काय चालू आहे याचीसुद्धा इत्थंभूत माहिती मिळते.

आंतरराष्ट्रीय कायदा हा विशेष विषय घेऊन एल.एल.एम. केल्यावर याच विषयावर पीएच.डी. करण्याचा माझा मानस आहे. कोणत्याही गोष्टीची फार चिंता न करता येईल तो दिवस जास्तीत जास्त हास्यविनोदात घालवतो.

प्रकाश बाबूराव संधान