18 November 2017

News Flash

दि. ३० जून ते ६ जुलै २०१७

शक्ती आणि युक्तीने या आठवडय़ात तुम्ही अवघड कामे मार्गी लावू शकाल.

विजय केळकर | Updated: June 30, 2017 1:01 AM

राशिचक्र

01vijay1मेष शक्ती आणि युक्तीने या आठवडय़ात तुम्ही अवघड कामे मार्गी लावू शकाल. व्यापार-उद्योगात एखादी नावीन्यपूर्ण कल्पनेवर कृती करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये तुमचा कामाचा वेग उत्तम राहील. तुम्ही सुचविलेली एखादी कल्पना वरिष्ठांना किंवा तुमच्या संस्थेला उपयोगी पडेल. पण कामाचा बोजा मात्र वाढणार आहे. घरामध्ये तुमच्या सल्ल्याला इतरांनी मान दिल्याने तुम्ही फुगून जाल.

वृषभ स्वप्न आणि सत्य याची सहसा सरमिसळ होऊ शकत नाही, पण या आठवडय़ात तुम्ही दोन्हींचा उत्तम प्रकारे समन्वय साधण्याचा प्रयत्न कराल. व्यापार-उद्योगात सर्व काही चांगले असेल. पण पशाच्या व्यवहारात कोणी मागेपुढे केले तर तुम्हाला ते सहन होणार नाही. अशा वेळी गिऱ्हाईक तुटणार नाही याची दक्षता घ्या. नोकरीमध्ये शब्द हे शस्त्र आहे हे विसरू नका. सहकारी आणि वरिष्ठ यांना घाईने आश्वासन देऊ नका. सांसरिक जीवन म्हटले की भांडय़ाला भांडे लागतेच. त्याचा विचार न करता समजुतीचे धोरण ठेवा.

मिथुन उत्तम बुद्धिमत्ता हे तुमच्या राशीला लाभलेले वरदान आहे. त्याला या आठवडय़ामध्ये कृतीची जोड दिलीत तर तुमचा बराच फायदा होईल. व्यवसाय-उद्योगात आíथक बाजू सुधारल्यामुळे तुमचा कामाचा हुरूप वाढेल. नवीन कार्यपद्धतीचे  आकर्षण वाटेल. नोकरदार व्यक्तींना वेगवेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल. त्याचा सुरुवातीला त्रास होईल, पण नंतर त्यातूनच फायदा होईल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींकरिता काहीही करण्याची तुमची तयारी असेल.

कर्क सतत कामामध्ये राहणारी तुमची रास आहे. कल्पकता आणि कृतिशीलता याचा समन्वय तुम्हाला यश मिळवून देईल. व्यापार-उद्योगात नवीन काम मिळण्याकरिता छोटा प्रवास घडण्याची शक्यता आहे. लांबलेल्या एखाद्या जुन्या कामाला चांगली गती द्याल. पशाची बाजू सुधारेल. नोकरदार व्यक्तींना सहकाऱ्याचे एखादे काम करावे लागेल. सांसरिक जीवनामध्ये इतर वेळेला शांतपणे विचार करणारे तुम्ही एखाद्या मुद्दय़ावर पटकन चिडून जाल.

सिंह आपलीच माणसे कधी कधी अशी का वागतात याचे आपल्याला कोडे पडते. त्याला काहीच उत्तर मिळत नाही. व्यापार-उद्योगात तुम्ही दूरदृष्टी ठेवून एखादे काम केले असेल तर त्याचा चांगला उपयोग होईल. नवीन प्रोजेक्टमध्ये अतिउत्साह आवरा. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा वेग आणि कार्यक्षमता वाखाणण्याजोगी असेल. घरामध्ये एखाद्या मोठय़ा व्यक्तींच्या सल्ल्यामुळे अवघड प्रश्न हलका होईल.

कन्या काही अचाट-अफाट कल्पना तुमच्या मनामध्ये घोळत राहतील. त्याचा पाठपुरावा करण्याकरिता तुम्ही सिद्ध व्हाल. व्यापार-उद्योगात जे काम तुम्ही पूर्वी केलेले होते त्यातून प्राप्ती होण्याची शक्यता आहे. एखादी नवीन कल्पना साकार करण्यात तुम्ही तुमची शक्ती खर्च कराल. नोकरीमध्ये तुम्ही मनाशी केलेले अंदाज आडाखे बरोबर ठरतील. त्याचा तुम्हाला कामामध्ये उपयोग होईल. वरिष्ठांना खूश करून एखादी सवलत मिळवाल. घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींनी दिलेला सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल.

तूळ तुमची रास बौद्धिक रास असल्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टींचा खूप विचार करता. या आठवडय़ात विचार आणि कृती यांचा समतोल राखलात तर तुम्ही बरेच काम करू शकाल. व्यापारात सप्ताहाची सुरुवात थोडीशी खर्चीक होईल. महत्त्वाच्या कामाकरिता सप्ताहाच्या मध्यानंतरचा कालावधी चांगला आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांनी तुम्हाला एखाद्या कामामध्ये कमी लेखले असेल तर त्याचा गरसमज तुम्ही दूर कराल.  घरामध्ये तुम्ही माझे तेच खरे असा हटृ धराल.

वृश्चिक प्रत्येक माणसाला असे वाटते की आपण केलेल्या कामाला ताबडतोब चांगले फळ मिळावे तुम्हीही याला अपवाद नाही. व्यापार-उद्योगात पशापेक्षा ओळखींचा तुम्हाला उपयोग होईल. खेळते भांडवल कमी पडल्यामुळे तात्पुरते कर्ज घ्यावे लागेल. नोकरीमध्ये एखादी गोष्ट तुम्हाला माहीत असेल पण वरिष्ठांना ती पटणार नाही, त्याचा तुम्हाला राग येईल. तातडीच्या कामाकरिता नवीन व्यक्तींचा सल्ला तुम्हाला विशेष उपयोगी पडेल. प्रकृतीच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवा.

धनू तुमच्या कल्पकतेला आणि कर्तृत्वाला भरपूर वाव देणारे हे ग्रहमान आहे. आपला शब्द खरा करण्याकरिता तुम्ही थोडेसे धाडस कराल. व्यापार-उद्योगात बरीच वर्षे जे काम तुम्ही करीत आहात ते थांबवून त्याऐवजी दुसरे काम करावेसे वाटेल. व्यापारीवर्गाला त्यांच्या संघटनेमध्ये मान मिळेल. नोकरदार व्यक्तीची वेगळ्या पद्धतीच्या प्रशिक्षणाकरिता निवड होईल. घरामध्ये   सगळ्यांशी खेळीमेळीने तर कधी फटकून वागाल.

मकर कोणाशीही संबंध बिघडावयाला तुम्हाला आवडत नाही. त्यामुळे सभोवतालच्या व्यक्तींच्या कलाने तुम्ही वागता. पण या आठवडय़ामध्ये एखाद्या कारणामुळे तुमचा राग अनावर होईल. व्यापार-उद्योगात बराच काळ मनामध्ये रेंगाळत असलेली एखादी कल्पना तुम्ही अमलात आणाल. तुमचे दूरदर्शी विचार पाहून स्पर्धक बुचकळय़ात पडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या पुढे पुढे करू नका. तुमचे काम वेळेत आणि काटेकोरपणे पाळा. घरामध्ये प्रत्येकाला  चांगला सल्ला द्याल. एखादे जुने घरगुती प्रकरण विनाकारण त्रास देईल.

कुंभ ज्या कामाविषयी तुम्हाला खूप उत्सुकता आहे ते काम थोडेसे लांबल्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल.  व्यापार-उद्योगात तुमची दूरदर्शी वृत्ती तुम्हाला उपयोगी पडेल. प्रतिष्ठित व्यक्ती मदतीचे आश्वासन देतील, पण त्यावर अवलंबून राहू नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश करण्याकरिता खोटे आश्वासन देऊ नका.  घरामध्ये एखाद्या प्रश्नावरती बराच काळ तुम्ही संयम ठेवाल, पण नंतर चिडून जाल. रक्तदाब किंवा हृदयविकार असेल तर योग्य ती खबरदारी घ्या.

मीन प्रत्येक माणसात काही गुण आणि अवगुण असतात. तुमची रास अत्यंत प्रेमळ पण अव्यवहारी स्वभावाची आहे. व्यापार-उद्योगात उत्पन्न वाढविण्याकरिता एखादी नवीन कल्पना तुम्हाला सुचेल. नोकरीच्या ठिकाणी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे लक्षात ठेवलेत तर तुमचेच कष्ट कमी होतील. बदली किंवा नोकरीत बदल हवा असेल तर प्रयत्न करा. घरातील किरकोळ कामात बराच वेळ जाईल. मुलांच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवा. अतिश्रम करू नका.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on June 30, 2017 1:01 am

Web Title: astrology 30th june to 6th july 2017