18 October 2018

News Flash

दि. ८ ते १४ डिसेंबर २०१७

दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळे विचार तुमच्या मनात डोकावत राहतील.

मेष दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळे विचार तुमच्या मनात डोकावत राहतील. त्यातील एखादी स्वप्नमय कल्पना असेल, तर त्यामध्ये तुम्ही रमून जाल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात ‘दुसऱ्यावरी जो विसंबला त्याचा कार्यभाग संपला’ या म्हणीची आठवण ठेवा. नोकरीमध्ये एखादे किचकट काम संपल्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. घरामध्ये इतरांना शिस्तीचे धडे शिकवाल. पण स्वत: मात्र स्वत:च्या मर्जीने वागाल.

वृषभ ग्रहमान संमिश्र आहे. एखादे काम तुम्ही स्वत: पूर्ण करू शकणार नाही. त्याकरता कोणावर तरी अवलंबून राहणे भाग पडेल. व्यवसाय-उद्योगात एखादे अवघड काम मार्गी लावण्याकरता मध्यस्थांचा वापर करण्यापूर्वी त्या व्यक्तीची नीट माहिती मिळवा. नवीन पद्धतीचे काम सुरू करताना जुन्या कामांना  रामराम ठोकू नका. जोडधंदा असणाऱ्यांनी गिऱ्हाइकांना घाईघाईने आश्वासने देऊ नयेत. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ काय सांगतात व काय बोलतात याकडे नीट लक्ष द्या. घरामध्ये जोडीदाराचे मूड सांभाळताना तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागेल.

मिथुन ‘मानलं तर समाधान’ अशी तुमची स्थिती असणार आहे. ज्या कामाविषयी तुमच्या मनात खूप उत्सुकता होती ते काम पुढे ढकलल्यामुळे थोडेसे नाराज व्हाल. व्यापार-उद्योगात कोणत्याही एका व्यक्तीवर किंवा संस्थेवर पूर्णपणे अवलंबून राहू नका. एखादा पर्याय तुमच्या मनामध्ये असेल तर त्याचा उपयोग होईल. नोकरीमध्ये संस्थेच्या आणि वरिष्ठांच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्या. घरामध्ये प्रिय व्यक्तींच्या प्रश्नाला महत्त्व द्यावे लागेल.

कर्क कोणतेही काम करण्याचा कंटाळा येत नाही, पण या आठवडय़ात सगळी कामे एकटय़ाने न करता फक्त महत्त्वाची कामे स्वत: सांभाळा. व्यापार-उद्योगात एखादे न आवडणारे काम तुम्हाला पशाकरिता स्वीकारावे लागेल. जोडधंदा असेल तर त्याचा थोडाफार फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी आठवडय़ाच्या सुरुवातीला सर्व कामांची नीट आखणी करावी. इतर कामे हाताखालच्या व्यक्तींवर विश्वासाने सोपवा. घरामध्ये कोणत्याही वादाच्या विषयावर तटस्थ राहा.

सिंह कधी कधी खरे काय आणि खोटे काय याविषयी मनामध्ये संभ्रम  निर्माण करणारे ग्रहमान आहे. तुमचे हितचिंतक तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. व्यापार-उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्याचा मोह होईल. नोकरीमध्ये सगळी कामे एकटय़ाने न करता हाताखालच्या व्यक्तींना मार्गदर्शन देऊन त्यांच्याकडून काम करून घ्या. बेकार व्यक्तींना छोटे-मोठे काम मिळेल. घरामध्ये प्रिय व्यक्ती आपुलकीने तुम्हाला चांगला सल्ला देतील.

कन्या कळतं पण वळत नाही अशी तुमची परिस्थिती होणार आहे. ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून आहात त्यांची अडचण निघाल्यामुळे तुमची धावपळ होईल. व्यापार-उद्योगात तुम्ही केलेले काही बेत तुम्हाला लांबवावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित माहिती वेळेवर न मिळाल्याने तुमची गरसोय होईल. घाईगडबडीमध्ये काम करताना कुठेतरी चूक होण्याची शक्यता आहे. घरामध्ये पूर्वी ठरविलेले कार्यक्रम काही कारणाने थोडेसे मागे-पुढे होतील. प्रवासाच्या वेळेला आपली चीजवस्तू सांभाळा. नवीन जागेसंबंधी करार करू नका.

तूळ एखाद्या कामाची तुम्ही पूर्ण तयारी केली असेल, पण आयत्या वेळी त्यामध्ये अडचण आल्यामुळे ते काम लांबवावे लागेल. निराश न होता तुमचे प्रयत्न चालू ठेवा. व्यापार-उद्योगात एखादी व्यक्ती तुम्हाला भूलभुलया निर्माण करण्याची शक्यता आहे. अशा वेळी अनुभवी व्यक्तीचे मत जाणून घेणेच चांगले. पशाचे व्यवहार घाईने करू नका. नोकरीमध्ये शब्द हे शत्रू आहे हे लक्षात ठेवून वरिष्ठांना आश्वासन देण्यापूर्वी विचार करा. घरामध्ये भविष्यातील बेत इतरांपुढे मोकळेपणाने मांडा.

वृश्चिक कळतं पण वळत नाही अशी तुमची स्थिती होणार आहे. ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून होता त्यांच्याकडून काही कारणाने साथ मिळणार नाही. तुम्हाला नाइलाजाने तुमचे काही कार्यक्रम एक-दोन आठवडे लांबवावे लागतील. व्यापार-उद्योगात पशाची आवक चांगली असेल. मात्र अनपेक्षित कारणाकरिता हातातील पसे निसटण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आधी केले मग सांगितले असा पवित्रा ठेवा. नातेवाइकांशी शक्यतो पशाचा व्यवहार करू नका.

धनू जेव्हा सरळ मार्गाने काम होत नाही त्या वेळी तुम्ही वाकडी वाट करायला मागे-पुढे बघत नाही. या आठवडय़ात एखाद्या कामाच्या बाबतीत असे धोरण ठेवणे आवश्यक होईल. व्यापार-उद्योगात काही कामे सरकारी नियम, कोर्टव्यवहार यामुळे अडकून राहिली असतील तर त्याला गती येईल.  वरिष्ठ तुमच्या मनाप्रमाणे काम सांगतील. तुमचा उत्साह द्विगुणित होईल. घरामध्ये सगळ्यांच्या आवडीनुसार एखादा कार्यक्रम ठरवाल.

मकर योग्य व्यक्तींची योग्य कामाकरिता निवड करणे हे या आठवडय़ामध्ये तुमच्या यशाचे गमक असेल. व्यापार-उद्योगात एखादे भुलभुलया करणारे काम तुमच्याकडे येईल. कागदावर आकडेमोड केल्यावर सगळे छान वाटेल, परंतु प्रत्यक्षात तसे नसेल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्याचे रखडलेले काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. त्यामध्ये तुमचा वेळ जाईल. घरामध्ये तुमचा वेळ जाईल. घरामध्ये सर्व जण तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतील. पण तुम्हाला काय पाहिजे आहे हे कोणीच विचारणार नाही.

कुंभ हातातोंडाशी आलेली काही कामे अचानक लांबल्यामुळे तुमची गरसोय होईल. व्यापार-उद्योगात नवीन व्यक्तींशी व्यवहार करताना त्यांची सर्व माहिती काढा. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये एखादा विचित्र अनुभव येईल. त्यांच्यावर जास्त अवलंबून न राहता स्वत:चे काम स्वत: उरका. घरामध्ये माझे तेच खरे असा हट्ट धरू नका. महत्त्वाचे कार्यक्रम ठरवण्यापूर्वी इतरांचा सल्ला घ्या. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चांगला बदल होईल. पण पसे जास्त खर्च होतील.

मीन कळतं पण वळत नाही अशी तुमची स्थिती असेल. तुमच्या मनामध्ये अनेक कल्पना असतील त्या अमलात आणण्यासाठी योग्य व्यक्तींची मिनतवारी करावी लागेल. व्यापार-उद्योगात जुन्या ओळखींचा उपयोग होईल.  नोकरीच्या ठिकाणी एखादी अफवा पसरेल. यावर विश्वास न ठेवता, तुमचे काम तुम्ही करा. घरामध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी जपून बोला. एखादा शुभ समारंभ मागेपुढे होण्याची शक्यता आहे.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 8, 2017 1:01 am

Web Title: astrology 8 to 14 november 2017