सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-हर्षलचा लाभ योग आपल्यातील नव्या चेतनेला, उत्साहाला जोड देईल. अधिकारी पदावरून अनेक कार्याना गतिमान कराल. रेंगाळलेली सरकारी कामे पुढे सरकतील. चौकस बुद्धिमत्तेमुळे पुढे होणारे नुकसान टाळाल. जोडीदारासह लहान-मोठय़ा प्रवासाचा आनंद मिळेल. मतभेद सध्या तरी बाजूला ठेवावे. नोकरी-व्यवसायात मानसन्मान मिळेल. सहकारी वर्गाची योग्य वेळी मदत मिळेल.

वृषभ दशमातील बुध-नेपच्यून युतीमुळे कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. प्रेझेंटेशन, लेखन, अभिनय इत्यादी कार्यक्षेत्रात उत्तम प्रभाव पडेल. दुसऱ्याच्या मनाचा, भावनिकतेचा अंदाज घेऊन योग्य शब्दांत मांडलेली मते सर्वमान्य होतील. भावनांना व्यावहारिकतेची साथ लाभेल. जोडीदाराच्या कलाने घ्यावे लागेल. वेळप्रसंगी मनधरणी करावी लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कौटुंबिक कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडाल. त्यातून मानसिक समाधानही मिळेल.

मिथुन सप्तमातील शुक्र-शनी युतीमुळे व्यावहारिक बैठक अधिक भक्कम होईल. अनेक अडचणींनी गांगरून न जाता त्यावर मात करून आगेकूच कराल. स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या मेहनतीने पूर्ण कराल. सहवासातून जोडीदाराचे प्रेम प्राप्त कराल. त्याचे मन जिंकाल. कौटुंबिक समस्यांवर सामोपचाराने उपाय योजाल. अनावश्यक खर्च टाळाल. काटकसरीने वागा. नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आर्थिक लाभ होतील. आरोग्य चांगले राहील.

कर्क पंचमातील गुरूचे भ्रमण अनेक अडचणींशी सामना करण्याचे धारिष्ट देईल. पेचप्रसंगातून सही सलामत बाहेर पडाल. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ याचा अनेक वेळा अनुभव येईल. वरिष्ठांकडून उलट सुलट प्रश्नांचा भाडिमार होईल. पण न डगमगता सत्याची कास धरून वागावे. घरचे वातावरणही गोंधळात टाकणारे असेल. भावनिक पातळीवरून या प्रश्नांची उकल सापडेल. जोडीदाराच्या बऱ्याच प्रश्नांची साधी सोपी उत्तरे आपल्याकडून त्याला मिळतील.

सिंह आपल्या स्वभाव विशेषाला रवी-हर्षलच्या लाभ योगाची योग्य साथ मिळेल. आपला करारी बाणा विशेष चमकेल. मानाचे स्थान भूषवाल. आपल्या शिस्तीच्या कार्यपद्धतीचा इतरांवर प्रभाव पडेल. प्रयत्न यशस्वी होतील. आत्मविश्वास वाढेल. प्रगतिपथावर आगेकूच कराल. कुटुंबातील सदस्यांना आपले म्हणणे मान्य करावे लागेल. ते त्यांच्याही फायद्याचेच ठरेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.

कन्या बुध-शनीच्या लाभ योगामुळे बुद्धी आणि कष्टाची सुयोग्य सांगड घातली जाईल. हाती घेतलेले काम चिकाटीने पूर्ण कराल. वेळेचे सुनियोजन खूपच उपयोगी पडेल. नव्या युक्त्या कामी येतील. कामानिमित्त प्रवास कराल. नोकरी-व्यवसायात आर्थिक लाभ चांगले होतील. पूर्वी केलेल्या मदतीची परतफेड होईल. जोडीदार सुखी, आनंदी असल्याने सहजीवनाचे समाधान मिळेल.

तूळ शुक्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे आपल्या कल्पनाशक्तीला योग्य वाव मिळेल. आपला कलात्मक दृष्टिकोन अनेक ठिकाणी उपयोगी पडेल. गायन, वादन, चित्रकला यांचा मनापासून आस्वाद घेता येईल. आध्यात्मिक क्षेत्रातही मन रमेल. धार्मिक स्थळांना भेट द्याल. कुटुंबातील इतर सदस्यांचेही प्रवासाचे योग्य संभवतात. जोडीदाराचे मन सांभाळावे लागेल. त्याच्याच मनाप्रमाणे वागणे इष्ट राहील.

वृश्चिक द्वितीयातील शुक्र-शनी युतीमुळे अनावश्यक खर्च टाळाल. आपले मत परखड शब्दांत मांडण्यापूर्वी पुनर्विचार करा. शब्द जपून वापरा. कौटुंबिक समस्यांवर योग्य उपाय सापडला नाही तरी या समस्या चिघळू देऊ नका. नोकरी-व्यवसायात ओळखीच्या व्यक्ती अथवा मित्र मंडळींकडून चांगले साहाय्य मिळेल. जोडीदाराचा व्यावहारिक दृष्टिकोन उपयोगी पडेल. ज्वर, डोकेदुखी, पित्त या आजारांवर वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल. दुखणे अंगावर काढू नका.

धनू बुध-शनीच्या लाभ योगामुळे व्यवहारी धोरण ठेवाल. उदार आणि दिलदार मनाला आवर घालाल. बुधाच्या बुद्धीला शनीच्या शिस्तीची आणि सातत्याची जोड मिळेल. स्वतंत्र विचारांना चौकटीत बांधावे लागेल. वेळेचे सुनियोजन कराल. धार्मिक सहलीत सहभागी व्हाल. मानसिक समाधान मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मन जिंकाल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित कामे वेळेत करून मिळतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

मकर आपला राशी स्वामी शनी याचा शुक्राशी होणारा लाभ योग आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. केलेल्या कष्टाचे चांगले फळ मिळेल. काटकसर, घेतलेली मेहनत आणि सातत्य यामुळे आता सुख उपभोगता येईल. आर्थिक स्थिती उंचावेल. मित्र परिवारात रममाण व्हाल. आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात कामाच्या क्षेत्राच्या कक्षा रुंदावतील. कौटुंबिक वातावरण हळुवारपणे हाताळावे लागेल. जोडीदाराची साथ अत्यंत आवश्यक ठरेल.

कुंभ आपल्या बुद्धीवादी राशीत बुद्धीचा कारक बुध आणि स्फूर्तीचा कारक नेपच्यून यांची युती योग झाला आहे. नव्या कल्पना सुचतील. नव्या प्रेरणेने नव्या प्रकल्पांना चालना मिळेल. रखडलेली कामे गतिमान होतील. वरिष्ठांना आपले म्हणणे समजावून द्याल. सहकारी मदतीचा हात देईल. सामाजिक क्षेत्रात नसते धाडस नकोच. भावंडांचे म्हणणे शांतपणे ऐकून, समजून घ्यावे लागेल. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतील.

मीन दशमातील शुक्र-शनी युतीमुळे समोर येणाऱ्या अडचणींवर समर्थपणे मात कराल. आपल्या साध्याभोळ्या स्वभावाला व्यावहारिकतेची जोड मिळेल. कष्टाचे फळ मिळेल. कौटुंबिक सुखातील अडीअडचणी ज्येष्ठांच्या किंवा मित्र मंडळींच्या सल्ल्याने दूर कराल. जोडीदारासोबतचे गैरसमज योग्य वेळी योग्य पद्धतीने दूर कराल. प्रेमाचे दोन शब्दच उपयोगी पडतील. भावना व्यक्त करणे महत्त्वाचे ठरेल!