सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष मंगळ-नेपच्युनच्या लाभ योगामुळे बौद्धिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य कराल. मित्र-मैत्रिणीच्या साथीने नवे उपक्रम राबवाल. नोकरी-व्यवसायात धडाडी दाखवाल. कष्टाचे चीज होईल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. एकमेकांच्या मदतीने लहान-मोठय़ा समस्यांवर उपाययोजना कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंबासाठी थोडा वेळ राखून ठेवावा लागेल. शांत डोक्याने निर्णय घ्या.

वृषभ रवी-गुरूच्या केंद्रयोगामुळे चाकोरीबाहेरच्या नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याकडे कल राहील. विचारांना नवी दिशा मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाकडून मनाजोगते साहाय्य मिळेल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतील. डॉक्टरी सल्ला घ्या.

मिथुन रवी-शनीच्या लाभयोगामुळे परिस्थितीशी झगडत पुढे जावे लागेल. वैचारिक शक्ती खर्ची पडेल. कष्ट करण्याची तयारी ठेवलीत तर हाती यश लागेल. जोडीदाराला समजावणे कठीण जाईल. कौटुंबिक वातावरणातील ताणतणाव विवेकबुद्धीने सोडवावे लागतील. सातत्याने पाठपुरावा केला तर नोकरी-व्यवसायात स्थैर्य लाभेल. वरिष्ठांच्या शब्दाचा मान राखा. चांगल्या आरोग्यासाठ नियंत्रित आहार सेवन करा.

कर्क आपल्याला रुचत नसले तरी वरिष्ठांचे म्हणणे मान्य करावे लागेल. सहकारी वर्ग आपल्याला साहाय्य करील. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. आवश्यक असल्यासच प्रवास करा. कामाच्या ताणामुळे आरोग्यावर परिणाम होईल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात काही अडचणी येतील, त्याला योग्य सल्ला द्या. एकमेकांच्या समस्या समजून घ्याल. गरजू होतकरू व्यक्तींना आपल्या ओळखीतून मदतीचा हात द्याल.

सिंह रवी-शनीच्या लाभयोगामुळे अनावश्यक खर्चाला आळा घालाल. हातातील काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्याल. मार्गातील अडथळे हिमतीने दूर कराल. सहकारी वर्गाच्या समस्यांना वरिष्ठांपुढे वाचा फोडाल. नोकरी-व्यवसायात प्रगतीचा आलेख चढता राहील. जोडीदाराच्या भावना समजून घ्याल. आपल्याही भावना योग्य शब्दात मांडण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामाच्या धावपळीत विश्रांतीदेखील महत्त्वाची.

कन्या मंगळ-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे कलेच्या क्षेत्रात साहित्य, वाङ्मय, कल्पनाविस्तार यात प्रगती कराल. नोकरी व्यवसायात प्रकल्पाचे सादरीकरण कल्पकतेने कराल. सहकारी वर्गाची साथ मिळेल. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात व्यस्त असेल, पण दोघे मिळून संसाराची धुरा यशस्वीरीत्या पुढे न्याल. समजूतदारपणा दाखवाल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष नको.

तूळ शनी-मंगळाच्या नवपंचम योगामुळे नोकरी-व्यवसायात कष्टाचे चीज होईल. मंगळाच्या धडाडीला शनीच्या विवेकीवृत्तीची जोड मिळेल. जोडीदारासह झालेल्या वादाचे संवादात रूपांतर कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. नव्या विषयांचे ज्ञान संपादन करण्यास सुरुवात कराल. सहकारी वर्गाला आपले मत पटवून देण्यात बरीच शक्ती खर्च कराल. मित्र परिवार मदतीला धावून येईल. कामानिमित्त प्रवास कराल.

वृश्चिक रवी-प्लुटोच्या लाभयोगामुळे मोठय़ा जमावाचे नेतृत्व कराल. सहकारी वर्गाच्या समस्या वरिष्ठांपुढे योग्य प्रकारे मांडाल. समोरच्याचा मान ठेवून मोजके पण मुद्देसूद बोलाल. आरोग्याची काळजी घ्या. औषधोपचाराबरोबरच आवडत्या छंदात मन रमवून कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न कराल. ‘वाचन-मनन-आचरण’ या त्रयीचा अवलंब केल्याने यशाकडे वाटचाल कराल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

धनू शनी-मंगळ नवपंचम योगामुळे ‘पेराल तसे उगवेल.’ कष्टाचे फळ मिळेल. हाती अधिकार येतील. या अधिकारांचा योग्य वापर कराल. होतकरू तरुणांना मदतीचा हात द्याल. नोकरी-व्यवसायात स्थैर्य लाभेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाला साहाय्य कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराच्या समस्या समजून घ्याव्या लागतील. औषधोपचाराबाबत हलगर्जीपणा नसावा.

मकर ‘सबुरी का फल मीठा होता है।’ या वचनाची प्रचीती येईल. प्रगतिकारक संधी चालून येईल. नोकरी व्यवसायानिमित्त नव्या ओळखी होतील. प्रवासाचा योग संभवतो. सहकारी वर्गासोबत चांगले संबंध राहतील. जोडीदाराबरोबर नजीकच्या भविष्यातील योजना आखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे आणि उत्साहाचे राहील. घरासाठी नवीन खरेदी कराल. स्नायूंच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ रवी-प्लुटोच्या लाभयोगामुळे चारचौघांसमोर जाऊन आपले मत परखडपणे मांडाल. आत्मविश्वास वाढेल. इतरांना साहाय्य कराल. नोकरी-व्यवसायात थांबलेल्या कामांना गती द्याल. सहकारी वर्ग आपले म्हणणे समजून घेईल. जोडीदारासह वैचारिक चर्चा कराल. एकमेकांचे दृष्टिकोन समजून घ्याल. कौटुंबिक समस्या सोडवताना इतरांच्या भावनांचीही कदर कराल. आरोग्य ठीक राहील.

मीन गुरू-रवीच्या केंद्रयोगामुळे निष्काळजीपणाने महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता दिसते. सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील, असा आग्रह न धरणे उत्तम! नोकरी व्यवसायात आपणास मान्य नसले तरी वरिष्ठांचे मत ऐकून घ्यावे लागेल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्नपूर्वक हालचाली कराव्या लागतील. जोडीदाराच्या साथ-सोबतीमुळे मानसिक समाधान मिळेल.