22 February 2020

News Flash

नातीची आजी!

ती छोटीशी परी! गोड गुलाबी गाल! गोरी कांती! कुरळे केस! आणि तिचे छोटेसे भावविश्व!

ती छोटीशी परी! गोड गुलाबी गाल! गोरी कांती! कुरळे केस! आणि तिचे छोटेसे भावविश्व! त्या विश्वातील महत्त्वाचे सदस्य अर्थातच तिचे आई-बाबा! पण ती अगदी लहान असल्यापासून बाबा आणि आई तिला रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीच मिळायचे इतर दिवशी तिच्या सोबत असायचे तिचे आजी आणि आजोबा. त्यातही तिची आजीवर खूप सय! तिने पहिले डोळे उघडले तेव्हापासून नववारी नेसलेली ही आजी तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलेली. सकाळी आई-बाबा कामावर निघून गेलेले ती अर्धजागल्या डोळ्यांनी बघायची. नंतर आजीचा मुलायम उबदार हातांचा स्पर्श आणि तेवढाच प्रेमळ आवाज तिला उठवायचा.

सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळपर्यंत आजीच्या पदराला धरून चालणे आणि तिला हजारो प्रश्न विचारून भंडावून सोडणे हा तिचा आवडता छंद. आजीही तिच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायची. क्वचित दमही द्यायची. पण तो खोटा खोटा असायचा, कारण दम देतानासुद्धा तिच्या चेहऱ्याच्या कोपऱ्यातून हसू फुटायचे. चाणाक्ष नात हे ओळखून आजीच्या गळ्यात पडायची आणि तिचा मुका घ्यायची. आजीचा राग खतम! असे आजी आणि नातीचे मेतकुट जमलेले होते.

गेले काही दिवस मात्र यात थोडा खंड पडलेला होता. तिची लाडकी आजी डॉक्टर काकाच्या इथे म्हणजे हॉस्पिटलात राहायला गेली होती. बाबा म्हणाला होता की, तू आजीला खूप त्रास देतेस म्हणून ती आजारी पडलीय. तिने बाबाला आणि बाप्पाला प्रॉमिस केले होते की, मी आजीला कधीच त्रास देणार नाही म्हणून! बाबानेही मग हसून सांगितले होते की, आजीला लवकर आणू या. बाबा म्हणाला होता आजी या रविवारी येणार आहे. त्यामुळे स्वारी आज खुशीत होती. घरात खूप माणसे जमलेली होती म्हणून लेकीने बाबाला विचारले, बाबा आपल्याकडे एवढे पाहुणे का आलेयत? बाबा तुटकपणे म्हणाला अगं आज बऱ्याच दिवसांनी आजी घरी येतेय ना म्हणून तिला बघायला तिचे फ्रेंड्स आलेले आहेत. तिला गम्मतच वाटली. आजीचेपण एवढे फ्रेंड्स आहेत तर. पण लबाड आजी कधी बोलली नाही. थांब येऊ दे तिला! मी माझ्या फ्रेंड्सबरोबर गेले कीमला सारखी घरी बोलावते आणि स्वत:चे मात्र एवढे फ्रेंड्स. ती शेजाऱ्यांकडे खेळत होती.

तेवढय़ात तिचा बाबा आला आणि म्हणाला, चल आजी आलीय! ती पटकन धावत आली. पण बघते तर काय आजीला एका पांढऱ्या कपडय़ामध्ये बांधून आणतात ना तसे आणले होते. हॉस्पिटलमध्ये छोटय़ा बांबूंना बांधून ठेवतात तसे! आजीच्या नाकामध्ये कापूस टाकलेला होता आणि डोळे बंद! तिला रडूच यायला लागले! डोळ्यातून आसवांच्या धारागळू लागल्या! ती बाबाला विचारू लागली! बाबा सांग ना आजीला काय झालंय! बाबाच्या चष्म्याच्या खाली डोळे रडतच होते. नात रडवेली झाली. हात-पाय आपटायला लागली. बाबा अरे सांग ना आजीला काय झालंय. बाबा कसा बसा म्हणाला, ‘अगं तुला दाखवण्यासाठी आणलंय, मग परत डॉक्टर काकांकडे नेणार आहे.’ ‘पण मग ती बोलत का नाही?’ बाबा परत गप्प! आता तिने भोंगा पसरला! ‘आजी तू डोळे उघड! मी मस्ती नाही करणार! ए बाप्पा तुला मी मारून टाकीन माझ्या आजीला काही केलों तर.’ तिचा कोवळा आर्त स्वर तिच्या घराच्या िभती ओलांडून पूर्ण बििल्डगबाहेर पसरला. आजीला खाली आणले तिच्या अंगावर फुलांचे हार घातले गेले. नातीचा बांध पुन्हा फुटला. बाबा म्हणाला, ‘चल आजीच्या पाया पडू या.’ नात एव्हाना रडून रडून लाल झाली होती. कशीबशी ती आजीच्या कलेवरापाशी आली आणि धाय मोकलून रडू लागली. जमलेल्या सगळ्या नातेवाईकांच्या डोळ्यांतून एव्हाना गंगा-जमुना वाहू लागल्या होत्या. कोपऱ्यात बसलेल्या आजोबांना ती विनवू लागली, ‘आजोबा, तुम्ही तरी सांगा ना आजीला उठायला !’ आजोबांनी तिला जवळ ओढले. कुशीत घेतले आणि आपल्या अश्रूंना वाट करून दिली. ‘आजी नको ना जाऊ! आजी नको ना जाऊ..’ श्रीराम जयराम जयजय रामचा घोष सुरू झाला आणि त्यात नातीचा आर्त स्वर विरघळून जाऊ लागला.
पद्माकर शिरसाट – response.lokprabha@expressindia.com

First Published on September 23, 2016 1:16 am

Web Title: grandmother
Next Stories
1 डल मुलाची डायरी
2 अ‍ॅण्टीसिपेशन
3 देणाऱ्याचे हात