News Flash

क्षितिज

हे क्षितिज काय आहे? कसे आहे? कोठे आहे? केव्हापासून आहे? त्याच्या पलीकडे काय आहे?

‘‘काढ सखे गळय़ांतील तुझे चांदण्याचे हात। क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत’’ हे लोकप्रिय भावगीत ऐकतांना क्षितिज हा शब्द सहज मनांत रेंगाळला. हे क्षितिज काय आहे? कसे आहे? कोठे आहे? केव्हापासून आहे? त्याच्या पलीकडे काय आहे? इ.इ. प्रश्न सहज मनात तरळले आणि त्या विचारमंथनातून हा लेख तयार झाला. त्या सर्व विचारांचे हे क्षितिज चित्र म्हणा. तसे पाहिले तर क्षितिज म्हणजे कधीच जवळ न येणारी पण सतत दिसणारी भूमी व आकाश यांच्या मीलनाची सीमारेषा. ती दिसते पण जवळ जावे तसतशी दूर जाते. ही काल्पनिक, म्हणूनच कधी हाती न येणारी. हेच ते क्षितिज काय? आकाश पृथ्वीला टेकलेले वाटते तो भाग म्हणजे क्षितिज. अर्थात हा भास आहे, वास्तव नव्हे, हे जरी खरे असले तरी हा भासच जीवनात स्थिर झालाय. पूर्व क्षितिज व पश्चिम क्षितिज ही दोन क्षितिजे आपणास फार जवळची वाटतात, कारण आपला दिवस म्हणजे सूर्याचा, या दोन क्षितिजांमधील प्रवास, तसाच चंद्राचाही – ज्या भ्रमणाचे नांव रात्र. उत्तर व दक्षिण क्षितिजे त्या मानाने गौण. अर्थात क्षितिज सर्व पृथ्वीगोलालाच अखंड आहे पण दिशानुरूप ऊध्र्व अध दिशा सोडून बाकी अष्टदिशांप्रमाणे हे क्षितिज संबोधले जाते. उध्र्व आणि अध दिशांना क्षितिजच नाही.

क्षितिज हा शब्द जीवन व्यापून राहिला आहे. उगवतीचे रंग व मावळतीचे रंग कोणास मोह पाडत नाहीत? सूर्योदय व सूर्यास्त, चंद्रोदय व चंद्रास्त, पूर्व व पश्चिम दिशांनी होतात, म्हणूनच ही दोन्ही क्षितिजेच केवळ या रंगछटांनी नटतात. सूर्योदयास पूर्व क्षितिजाकडे जाणारे पक्षिगण व सूर्यास्तास परतणारे पक्षिगण मनास आनंद देतात. पूर्व क्षितिजाचे रंग सौंदर्य उष:काल तर पश्चिमेचे रंग सौंदर्य संध्याकाल ही दोन्ही रंगसौंदर्ये मनास भुरळ पाडतात. पूर्व क्षितिजाला चढणारी लाली आणि पश्चिम क्षितिजालाही, सर्वाना माहीत आहेच. सागराच्या रम्य किनारी ही क्षितिज शोभा अप्रतिम दिसते हे अनुभवल्याशिवाय कळणार नाहीच. एका गोलार्धात उगवतीचे क्षितिज हे दुसऱ्या गोलार्धातील मावळतीचे क्षितिज असते हेही आपण सहज समजू शकतो. हे सर्व वैज्ञानिकदृष्टय़ा झाले, पण जीवनात ही क्षितिजे किती तरी प्रकारचे असतात आणि त्यामुळेच तर ती गंमतजंमत आणतात. या लेखांत याचा संक्षिप्त मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मानवी जीवन व्यवहारात ही क्षितिजे मानसिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक इ. इ. अनेकविध स्वरूपांची असतात. प्रत्येक क्षितिजावर उदयास्त होत असतातच. प्रत्येकाचे क्षितिज वेगवेगळे असते/ असतात. प्रत्येकाची क्षितिजे कशी ठरतात हे त्याचे त्यालाही कळत नाही. क्षितिजे म्हणजे दोन महाभूतांच्या काल्पनिक संगमाची रेषा हे जसे प्राकृतिक संदर्भात/ भौगोलिक संदर्भात तसेच ते इतर बाबतीतही मानावं लागेल. क्षितिजावर उगवलेली शुक्राची चांदणी पहाटे वा सायंकाळी विलोभनीय दिसते हे आपण अनुभवतोच आणि म्हणूनच साहित्य क्षेत्रांत व इतर क्षेत्रांत देदीप्यमान ठसठशीत कर्तृत्वाने एखादी व्यक्ती गाजू लागली की त्याला क्षितिजावर उगवलेला तारा असे संबोधले जाते. क्षितिज जेव्हा निसर्ग / प्रकृतीशिवाय इतर क्षेत्रासंबंधीचे असते तेव्हा त्या क्षितिजाचे विस्तारण/ प्रसारण होऊ शकते, कल्पनेप्रमाणे बदलती क्षितिजे ही संज्ञासुद्धा पुष्कळदा वापरली जाते, ती मानवी मनोव्यापारचे गतिमान/ चंचल वृत्तीप्रमाणे.

पूर्व व पश्चिम क्षितिजे सूर्याच्या उदयास्तानुसार रंगछटांची विविधता/ उधळण दाखवितातच, पण पावसाळय़ात ऊनप्रकाशाच्या खेळात इंद्रधनुष्याचे मनोहारी रूपदर्शन घडवितात.

पुष्कळदा या क्षितिजांवर ढग जमतात आणि मग क्षितिज मोठय़ा संख्येने प्रचंड आकाराचे ढग आल्यास झाकोळले जाते व विरळ मेघसमूह असल्यास उदय वा अस्त होणारे तेजोनिधीचे ते लोहगोल रूप त्यातून निघणाऱ्या प्रकाशकिरणांनी अद्भुत रंगकिमया दाखवते.

मानवी विचारांची क्षितिजे विस्तारतात, बदलतात, आकुंचन पावतात ती विचारप्रगल्भतेने त्याच्या अस्थिरतेने वा संकोचनाने. षड््रिपूंच्या प्रभावाप्रमाणे त्या क्षितिजांचे रंग बदलतात. स्थिरमती योगी पुरुषांची विचारक्षितिजे अक्षय्य असतात व कायम मांगल्याच्या प्रकाशाने ती उजळलेली असतात. संत पुरुषांची क्षितिजे ताप न देणाऱ्या सूर्यप्रकाशाने तेजोयमान होतात व त्यावर उगवणारे चंद्रबिंबही निष्कलंक असते, कारण  हे महात्मेच असतात ‘तापहीन मरतड वा अलांच्छित चंद्रमे’.

दूर क्षितिजावरून हळूहळू दृग्गोचर होत जाणारे जहाज वा नौका पाहिल्यावर एक आनंद होतो ते पाहताना, तसंच दूर दूर जात असलेलं व शेवटी ठिपक्यागत होऊन दृष्टिपल्याड जाणारं जहाज एक वेगळी अनुभूती देतं. नियतीच्या क्षितिजात अशा अनेक जीवन नौका येताना वा जाताना वा विलोप पावताना दिसतात. आपली ही जीवननौका अशीच अस्तंगत / विलीन होणारी असते, हे आपण जरी जाणतो तरी कधी, कोठे, व कशी हे कळत नाही.

राजकीय पक्षांचे उदयास्त हे देशाच्या क्षितिजावरचे दृश्य. देशाची क्षितिजे त्यामुळे कधी कधी अंधारली वा उजळली जातात. तसं पाहिलं तर क्षितिज ही निदरेष असतात, कारण त्यांचे अस्तित्व काल्पनिक असते व आपलीच ती संकल्पना असते. त्यावर आपलेच विचारभानू षड्रिपूग्रस्त असलेले उदयास्त होत असतात. क्षितिज म्हणजे या त्या दृष्टीने एक प्रकारच्या संदर्भरेषाच असतात. आपली क्षितिजं आपणच निरभ्र मोकळी ठेवू शकतो, तशीच ती काळवंडून टाकू शकतो. स्वपराक्रमावर त्यांची व्याप्ती वाढवू शकतो. शुभ्र तेजस्वी सायंताऱ्याचा उदय करून ती सोज्वळ प्रकाशित करू शकतो तर पूर्वायुष्यात केलेल्या/ तरुणपणी केलेल्या कर्तृत्वाचे रंग मावळतीच्या क्षितिजावर बघू शकतो.

‘जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते’ या भावगीतात प्रेयसी ज्या सीमारेषेवरती उभी राहणार ती वास्तव आहे. पण जिथे आभाळा धरणी मिळते असे तिथे लिहा आणि बघा तिला. ती जागा कधी सापडेल का? कधीच नाही, कारण ते काल्पनिक क्षितिज आहे. कविकल्पनेत अशा क्षितिजावर प्रतीक्षा करण्यात उभ्या असलेल्या यौवना बसत नाहीत, असं वाटत. दुर्बिणीतून क्षितिज जवळ बघण्याचं भाग्य लाभेलही पण क्षितिज हाती कधीच येणार नाही.

भौगोलिक क्षितिजांची रूपे त्या त्या स्थानांप्रमाणे वेगवेगळी रंगरूपे दाखवितात. उत्तर-दक्षिण ध्रुवांवरची क्षितिजशोभा, हिमालयातील क्षितिजशोभा, थंड हवेच्या ठिकाणांच्या पॉइंट्सवरून दिसणारी क्षितिजशोभा, सागरी प्रदेशातील व अन्यत्रची क्षितिजशोभा सगळय़ा अगदी आगळय़ावेगळय़ा असतात. आर्थिक क्षितिजे जेवढी विस्तृत तितका हा आनंद घेणे परवडते, नाही तर स्थानिक क्षितिजशोभा बघूनच समाधान मानावे लागते हेही खरे.

एकंदरीत क्षितिज ही संकल्पनाच मनाला भावणारी आहे, सर्वजनव्यापी आहे, भुरळ पाडणारी आहे. ज्याला क्षितिज नाही ते जीवनच नाही. कधीच हाती न येणारे, जेवढे जवळ जावे तेवढे दूर जाणारे हे क्षितिज या क्षितिजापलीकडे काय? इ. इ. प्रश्न विज्ञानावर सोडावे व शांत समुद्रकिनारी उगवती, मावळतीच्या क्षितिजशोभा पाहात राहावे व मनाच्या आकांक्षाआभाळाचे आपल्या वकुबाच्या / कुवतीच्या वास्तवाशी एक वास्तवक्षितिज निर्माण करावे व त्या सुखांत हरवून जावे असे वाटते. ही या लेखाची माझ्या बौद्धिक कुवतीची क्षितिजसीमा.
आचार्य वसंत गोडबोले – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:09 am

Web Title: horizon
टॅग : Blogger Katta
Next Stories
1 काळ आला होता, पण..!
2 मामा आणि त्याचं गाव
3 चातकाचा चुलतभाऊ
Just Now!
X