सुनीता कुलकर्णी

ज्युलिया रॉबर्ट्स जशी एकेकाळी अमेरिका’ज (खरंतर जगाचीच) स्वीट हार्ट होती, तशीच सध्या आलिया भट इंडिया’ज स्वीट हार्ट आहे. अगदी लहान वयात आपल्या कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या आलियाने आपल्या अभिनयाचा सहज ठसा उमटवला आहे. ‘हाय वे’ सिनेमापासून सुरू झालेला तिचा प्रवास वेगवेगळी वळणं घेत तेलुगु चित्रपटसृष्टीच्या दारात जाऊन पोहोचला आहे. होय, आलिया बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांच्या RRR (रौद्रम् रणम् रुधिरम्) या सिनेमात काम करणार आहे अशी ताजी बातमी आहे. ८ जानेवारी २०२१ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

आलिया नुकतीच एस. एस. राजामौलीच्या RRR सिनेमाच्या सेटवर पोहोचली. तिचं स्वागत करताना RRR सिनेमाच्या ट्वीटर हॅण्डलवर म्हटलं आहे की ‘अ व्हेरी वॉर्म वेलकम टू अवर डियरेस्ट सीता, द सुप्रिमली टॅलेंटेड अॅण्ड ब्युटीफूल आलिया भट ऑन द सेट्स ऑफ RRR मूव्ही’… त्यासोबत राजामौली यांच्याबरोबरची आलियाची छायाचित्रंही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आलियासारख्या आघाडीच्या अभिनेत्रीने प्रादेशिक भाषेतील सिनेमात काम करणं कौतुकाचं मानलं जात आहे. याशिवाय तिचा अजय मुकर्जी दिग्दर्शित, धर्मा प्रॉडक्शनचा ‘ब्रम्हास्त्र’, तसंच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ हे बिग बजेट सिनेमे लौकरच प्रदर्शित होणार आहेत.

RRR या सिनेमाच्या माध्यमातून आलिया पहिल्यांदाच तेलुगुच नव्हे तर हिंदीतर भाषक सिनेमात काम करणार आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या अलुरी सीताराम राजू तसंच कुमारम भीम या दोन स्वातंत्र्यसैनिकांची गोष्ट या सिनेमात सांगितली असून त्यामध्ये आलिया सीता ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. एन. टी रामाराव (ज्युनियर) आणि रामचरण हे दोन अभिनेते तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचं चित्रिकरण ऑक्टोबर महिन्यातच सुरू झालं असून या सिनेमात अजय देवगण, श्रिया सरण यांच्याही भूमिका आहेत. हिंदी, कानडी, मल्याळम् तसंच तमीळ भाषेत हा सिनेमा डब केला जाणार असून त्याचं बजेट ३५० ते ४०० कोटी रुपयांचं असल्याचं सांगितलं जात आहे.