दिलीप ठाकूर

अमिताभ बच्चन ही आजची आपल्या एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीची जगभरातील ओळख आहे आणि अशाच वेळी या महानायकाला आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अशा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने गौरवण्यात आले हे उचित आहे. खूप खूप अभिनंदन आणि कारकिर्दीच्या या टप्प्यावरही अतिशय बिझी आहे म्हणून शुभेच्छाही. के. ए. अब्बास दिग्दर्शित ‘सात हिन्दुस्तानी ‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनास ७ नोव्हेंबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत असतानाच हा गौरव होतोय हे आणखीन एक विशेष.

तशी या वयाच्या पंचाहत्तरीतही वक्तशीर, क्रियाशील, अतिशय निष्ठेने आपली अभिनय बांधिलकी घट्ट असलेल्या ‘नायक ते चरित्रनायक, व्हाया काही नकारात्मक भूमिका असा दीर्घकालीन प्रवास सुरू असलेल्या ‘शहेनशाह ‘बाबत सांगावे तेवढे थोडेच आहे. हा एक मोठा इतिहास आहे. त्यात यशापयशाची कोष्टके, संघर्ष आणि बदलते रंगही आहेत.

अमिताभ बच्चनचा बिग बी होईपर्यंतचा प्रवास म्हणजे एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर ते मल्टीप्लेक्स असा, घरात लॅण्डलाइन फोन असणे ते हातोहाती मोबाईल असा, मुंबई शहरातील मिल ते चकाचक मॉल सामान्य नोकरदार ते कार्पोरेट असा अनेक संदर्भात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, साहित्यिक, प्रसार माध्यमे असा चौफेर बदल अनुभवणारा असा आहे. एका मोठ्या कालखंडाचा हा साथिदार, साक्षीदार, भागिदार आहे.

सत्तरच्या दशकातील महागाई, साठेबाजी, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई अशा गोष्टीनी त्रस्त झालेल्या युवकांना रुपेरी पडद्यावर अमिताभच्या रुपाने अॅन्ग्री यंग मॅन मिळाला आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. खुद्द अमिताभ याचे श्रेय पटकथा व संवाद लेखक सलिम जावेद (त्यांनी लिहिलेला प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ जून १९७३ ला रिलीज झाला आणि पहिल्याच खेळापासून पब्लिकने इन्स्पेक्टर विजयच्या भूमिकेतील अमिताभला पसंती दिली) आणि दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी यांना देतो. (ह्रषिदांचा ‘नमक हराम ‘ नोव्हेंबर ७३ ला पडद्यावर आला आणि पुन्हा अमिताभ खणखणीत अभिनयाचे नाणे ठरले.)

तेव्हापासूनचे असंख्य संदर्भ, गोष्टी, तपशील सांगत या महानायकाचा प्रवास सांगता येईल. पण महत्वाचे आहे ते, हिंदी चित्रपटाच्या बदलत्या ट्रेन्डशी त्याने जुळवून घेतले. त्याने किती चित्रपटात भूमिका साकारल्या, त्यातले किती सुपर हिट, कोणते फ्लॉप्स यावर यशस्वी मात करून तो घडत गेलाय, आकाराला येत गेलाय. तरी रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शक्ती’चा (१९८२) खास उल्लेख हवाच. अभिनयाचे विद्यापीठ म्हणून ओळखला जात असलेल्या दिलीपकुमारसमोर उभे ठाकणे सोपे नव्हते. सलिम जावेदचीच पटकथा होती, पण आव्हान तगडे होते. वांद्रे बॅन्ड स्टॅन्डवर हे पडद्यावरचे पिता आणि पुत्र भेटीचा एक अतिशय नाट्यमय प्रसंग चित्रीत होत असताना सेटवर एक प्रकारचा तणाव असल्याचे तेव्हा खूप गाजले. हा चित्रपट पडद्यावर आल्यावर दिसले की, अमिताभ दिलीपकुमारसमोर जराही कुठे कमी पडला नाही.

अमिताभ बच्चनचा नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाच्या काळात ‘एबी’ झाला आणि या दशकात तोच ‘बिग बी’ नावाने ओळखला जातोय. पूर्वी त्याच्या ‘नास्तिक ‘, ‘दो और दो पाच’, ‘पुकार ‘, ‘महान ‘, ‘द ग्रेट गॅम्बलर’ अशा फ्लॉप झालेले चित्रपटही इतर अनेक नायकांच्या हिट चित्रपटांपेक्षाही जास्त चालले. याचे कारण म्हणजे त्याचा स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग होता वा आहे. तेव्हाच तो प्रत्येक वितरण क्षेत्रात प्रत्येक चित्रपटाचा एक कोटीचा व्यवसाय करणारा अभिनेता म्हणून ओळखला गेला. ‘वन मॅन इंडस्ट्री’ अशीही त्याची इमेज झाली. त्याने १९८४ साली राजकारणात प्रवेश करुन उत्तर प्रदेशातील अलाहाबाद लोकसभा मतदारसंघात जनता पक्षाचे हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव केला आणि खासदार म्हणून यश मिळवले. पण लोकसभा सभागृहात तोंड न उघडल्याने ‘मौनी खासदार’ असा त्याच्यावर शिक्का बसला. आणि मग खासदारकीचा राजीनामा दिला. बिग बीचा हा अतिशय अवघड काळ होता. ‘शहेनशाह ‘च्या रिलीजला काही सामाजिक संस्थांचा तीव्र विरोध असल्याने मराठा मंदिर चित्रपटगृहात हा चित्रपट चक्क पोलीस बंदोबस्तात रिलीज झाला आणि ती वेगळी बातमी ठरली. हुकमी दिग्दर्शक मनमोहन देसाईंचा ‘गंगा जमुना सरस्वती ‘ दणदणीत फ्लॉप झाल्याने बीग बीची व्यावसायिक घसरण सुरु झाली. ‘खुदा गवाह’च्या रिलीजनंतर काही काळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला त्या काळात बीग बीने सर्वप्रथम दाढी वाढवली आणि फिल्मी इव्हेन्ट्स व इतरत्र तशा रुपात तो वावरु लागताच ‘शांतीदूत’ अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली. एकेकाळचा अॅन्ग्री यंग मॅनचे हे वेगळे रुप होते. काही काळाने ऋषी कपूर आणि उर्मिला मातोंडकरची भूमिका असलेल्या ‘श्रीमान आशिक ‘च्या ध्वनिफित प्रकाशन सोहळ्यात दाढी सफाचट करुन आलेला अमिताभ पाहून आम्ही सिनेपत्रकारानी जुहू परिसरातील मिळेल तो पब्लिक फोन गाठून ऑफिसला बातमी दिली तर अनेक फोटोग्राफरनी ऑफिसला धाव घेतली आणि ती पहिल्या पानाची बातमी ठरली.

बीग बीचा पडद्यावरचा/प्रत्यक्षातील/मिडियातील प्रवास अनेक गोष्टी/कथा/आठवणी/किस्से / अगदी दंतकथाही यांनी भरलेला आहे. ऐंशीच्या दशकात बीग बीने मिडियावर बहिष्कार घातला असता आम्हा सिनेपत्रकाराना तेव्हा त्याच्या चित्रपटाच्या मुहूर्ताला त्याचे प्रत्यक्ष दर्शन होई. ‘गंगा जमुना सरस्वती’, ‘हम’, ‘खुदा गवाह’, ‘अग्निपथ’ या पडद्यावर आलेल्या आणि ‘रुद्र’, ‘शिनाख्त’, ‘आलिशान’ अशा बंद पडलेल्या त्याच्या अनेक चित्रपटांच्या मुहूर्ताचा लाईव्ह अनुभव या महनायकाची आपल्या कामावरची निष्ठा, वक्तशीरपणा, व्यावसायिकता आणि महत्वाचे म्हणजे जबरा टॅलेंट दाखवणारे होते. याच टप्प्यावर त्याने मिडियावरची बंदी उठवली आणि स्वतंत्रपणे म्हणजे एका वेळेस एकच पत्रकार अशा पध्दतीने मुलाखत देण्याचे धोरण आखले. तेव्हा खुदा गवाह , इंद्रजित अशा चित्रपटाच्या सेटवर स्वतंत्र मुलाखतीचा आलेला योग माझ्यासाठी ‘यादगार पल ‘ आहे.

बिग बीच्या ‘उंची ‘ करियरमधला उतार ‘मृत्यूदाता ‘च्या अपयशानंतर आला. तेव्हाचे कोहराम, सूर्यवंशम, लाल बादशाह इत्यादी त्याचे चित्रपट त्याच्या लौकिकाला साजेसे नव्हते. ढिसाळ पटकथा व सरधोपट हाताळणी असलेल्या चित्रपटात बीग बीला पाहणे त्रासदायक होते. त्याची एक प्रकारची ती हतबलता वाटली. अगदी ‘बडे मियाँ छोटे मियाँ ‘ही त्याच्या उंचीचा नव्हताच. पण फॉर्म टेम्पररी असतो, टॅलेंट कायम असते हे मोठेच सत्य बीग बीला लागू पडले. ज्या काळात मोठे स्टार दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावर येणे डाऊन मार्केट मानत होते तेव्हा बीग बीने ‘कौन बनेगा करोडपती’ ( जुलै २०००)पासून नवा डाव सुरु केला. आपले व्यक्तिमत्व, हिंदीवरचे प्रभुत्व आणि या माध्यमाची उत्तम जाण या गुणांनी पहिल्याच भागापासून बीग बीने उत्तम खेळी केली. आणि रसिकांच्या पिढ्या ओलांडूनही या खेळातील ताजेपणा टिकवून ठेवलाय. या शोच्या स्वरुपात बदल होत गेले आणि गरजेनुसार मध्ये गॅपही असतो. पण बीग बीचा प्रभाव, शैली व दबदबा कायम आहे. यशराज फिल्मच्या ‘मोहब्बते’ (दिवाळी २०००) पासून मोठ्या पडद्यावर आणि पडदाभर ‘सेकंड इनिंग ‘ सुरु केली. नवे दिग्दर्शक, नवीन थीम, नवीन दृष्टीकोन आणि ग्लोबल युगातील रसिक अशी ही जबरदस्त सेकंड इनिंग आहे. पहिल्यापेक्षा भारी. पहिल्यात ‘सुपर स्टार ‘ तर यावेळी ‘सुपर अॅक्टर ‘ असा हा बदलता प्रवास सुरू आहे. याच टप्प्यावर अक्स, पा, पिंक, बदला अशी व्यावसायिक चौकट सांभाळत प्रयोगशीलता आहे. बदलत्या काळानुसार आणि हिंदी चित्रपटानुसार बीग बीने बदलणे पसंत केले आणि एक वेगळा आदर्श ठेवला.

केबीसीच्या एका पर्वाची टॅगलाईनच होती, कोई काम छोटा नही होता… हेच सूत्र हाती धरून बीग बीने आपले व्यक्तिमत्व आणि गुणवत्ता यांचा जबरदस्त ठसा उमटवलाय. दादासाहेब फाळके पुरस्काराच्या निमित्ताने मनःपूर्वक अभिनंदन.
बिग बीच्या कर्तृत्वाचा हा पट ब्रॅन्ड अॅम्बेसेडर, अनेक प्रकारच्या जाहिरातीत सहभाग, सरकारी योजनेच्या माहितीपटात सहभाग असे करता करता वेबसिरिजमध्ये अभिनय असा सखोल आहे. त्यासाठीची क्षमता, सखोलता आणि बदलता दृष्टिकोन या महानायकाकडे निश्चित आहे.