News Flash

BLOG : डिजिटल व्हायरस पासून सावध राहा

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात सायबर फसवणुकीचे संकट

– पुशान महापात्रा

मानवतेसाठी सध्याचा काळ अभूतपूर्व संकटाचा आहे. कोरोना विषाणू (कोविड-19)च्या संक्रमणामुळे जगभरातील लोकांना बंदिवान बनवले. त्यामुळे लोक दिवसातील सर्वात जास्त वेळ डिजीटल/ऑनलाइन दुनियेत व्यतीत करत आहेत. सध्या प्रत्येक जण केवळ मनोरंजन, खरेदी, सामाजिक संवादासाठी डिजीटल/ऑनलाइन माध्यमांवर अवलंबून नाही, तर वर्क फ्रॉम होम筑 देखील सुरू आहे. तसेच महत्त्वाचे व्यवहार, जसे की वित्तीय देव-घेव देखील याच माध्यमाद्वारे सुरू आहे. विविध प्रकारची ऑनलाइन साधने आणि अॅपच्या वापरात कमालीची वाढ झालेली दिसून येते. याच स्थितीत सायबर फसवणुकीचे गुन्हे वाढलेले दिसतात.

महामारी आणि सामाजिक विलगीकरणाबाबत अफवांचे पेव परिस्थिती अधिकच गंभीर बनवते आहे. या संधीचा पुरेपूर फायदा हॅकर्स आणि सायबर गुन्हेगारांनी घेतलेला पाहायला मिळतो. अशा भीतीदायक वातावरणात ते सहज आपले सावज हेरतात. कोरोना विषाणूसंबंधी माहिती/सेवा बँका, विमा पुरवठादार, रुग्णालये किंवा तत्सम माध्यमातून इमेल अथवा लिंकद्वारे पाठविल्या जातात. कोणालाही संशय येणार नाही अशा स्वरुपात इमेल अथवा लिंक प्राप्त झाल्याने पीडित व्यक्ती सहज बळी पडते आणि मेलमधील फसव्या लिंक/युआरएलवर क्लिक करते.

एका 48 वर्षीय इसमाला वर्क फ्रॉम होम करताना फाईल जतन करण्याविषयीचा ईमेल आला आणि त्याने लिंकवर क्लिक करताच सायबर विषाणूने त्याच्या संगणक प्रणालीवर हल्ला केला. त्याचा सर्व डेटा आणि फाईल्सचे नुकसान झाले. हे केवळ एकमेव उदाहरण किंवा एकट्यावर गुदरलेला प्रसंग नाही. सध्या लोक अशाप्रकारच्या हल्ल्यांबाबत फार शंकेखोर झाल्याने सायबर गुन्हेगार त्यांना जाळ्यात ओढण्याच्या नवीन युक्त्या शोधत असतात. गरजूंकरिता मदतनिधी किंवा गंभीर स्थितीत विमा दावा करणे यासारखे एखाद्याला पटतील असे डाव सायबर गुन्हेगार टाकत आहेत.

सध्या प्रत्येकजण चिंतातूर आहे. सायबर गुन्हेगार आणि हॅकर्स आपल्या याच मानसिक स्थितीचा फायदा घेऊन आपल्या संगणकावर ताबा मिळविण्यासाठी फिशिंग मेल पाठवतात. सायबर गुन्हेगारी विश्वात फिशिंगला सर्वप्रथम पसंती दिली जाते. त्यामुळे सध्या वैश्विक संकट ओढावले असताना तुम्ही अनाहूत मेल्सबाबत अधिक सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक ठरते. कोणत्याही प्रकारच्या भीती अथवा गोंधळापायी स्वत:चे सावज होऊ देऊ नका. आजच्या घडीला हॅकर्स देखील प्रतिभावंत झाले आहेत. कोविड-19 संबंधी माहिती पुरविण्याचे सोंग पांघरून संशय येणार नाही अशाप्रकारची फसवी लिंक पाठवून ते तुमचे उपकरण हॅक करून डेटा चोरी करू शकतात.

(लेखक एमडी आणि सीईओ, एसबीआय जनरल इन्श्युरन्स आहेत )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2020 3:54 pm

Web Title: beware of digitalvirus nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कोरोनाच्या काळात बदलेल्या भावना; बस प्रवास एक पर्वणी!!!
2 BLOG: पिणा-या देशाचं ‘आंबट’ सत्य!
3 …म्हणून आनंद तेलतुंबडे माओवादी विचाराचे नाहीत
Just Now!
X