– डॉ अनुपम दुर्गादास टाकळकर

करोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ दिवस सर्वत्र संचारबंदी सदृश्य वातावरण बघायला मिळत आहे. अतिशय महत्त्वाचे काम असल्याशिवाय कुणीही बाहेर पडू नका, असे सरकारतर्फे वारंवार आवाहन केले जात आहे. आता ही अतिमहत्त्वाची कामं म्हणजे घरात कुणी आजारी असेल, कुणाचा हात फॅक्चर झाला, कुणी गरोदर स्त्री आहे, कुणाच्या डायबिटीज किंवा बीपीच्या रुग्णांच्या काही तक्रारी किंवा तत्सम व्यक्तींनी डॉक्टरांकडे जाऊन आपला इलाज करून घेणे गरजेचे असते. या किंवा अशाच गोष्टी कुणाच्या जीवनात अत्यावश्यक असाव्यात.

मानवाच्या मूलभूत गरजा जसे की अन्न, वस्त्र आणि निवारा यांची सोय ज्याने-त्याने लॉक डाउन होण्याच्या आधीच करणे संयुक्तिक ठरले असते. यापैकी ‘वस्त्र’ आणि ‘निवारा’ याविषयी तर नियम आपण व्यवस्थित पाळले. परंतु सर्वात महत्वाच्या प्राथमिक गरजांमध्ये ‘अन्न’ याविषयी आपण थोडे बेफिकीर झालो. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर लगेच जर आपण एक महिन्याच्या राशनची ज्यांना शक्य असेल त्यांनी आधीच व्यवस्था करून ठेवली असती तर आपल्याला किराणा दुकानांमध्ये अथवा मॉलसारख्या बंदिस्त आणि गर्दी असणाऱ्या ठिकाणी गर्दी करण्याची गरज पडली नसती.

करोना व्हायरस प्रभाव आणि त्यांनी घातलेले थैमान इटली, फ्रान्स आणि अमेरिका या वैद्यकीय दृष्ट्या बलाढ्य असणाऱ्या देशांमध्ये आपण नुकताच पाहिलेला आहे. ‘पुढच्यास ठेच,मागचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे आपण वेळीच सावध होणे आणि सजग होणे क्रमप्राप्त आहे. असे असताना देखील आपण पण थोडी बेफिक्री दाखवत आहोत असे मला वाटते. येथे जिवंत उदाहरण म्हणजे काहीही विशेष आवश्यकता नसताना देखील बाहेर फिरणारे उनाड तरुण आणि ‘घरी भाज्या नसतील तर आपण जिवंतच राहू शकणार नाही’ अशा अविर्भावात सकाळी भाजी मंडई मध्ये गर्दी करणारे लोकं!

अरे कशाला पाहिजे तुम्हाला रोज रोज ताज्या भाज्या? भाज्या वाचून तुमचा जीव जाणार आहे का? दोडका, भेंडी, गोबी एकदा घेतले की सात दिवस सहज टिकतात. बटाटे कांदे तर पंधरा दिवस ते एक महिना पहायची गरज नाही. बरं भाज्या संपल्याच तर मटकी आहे, मूग आहे, वटाण्याची भाजी, अहो कितीतरी सांगता येतील! वरणा सोबत खा पोळी. चटणी आहे, लोणचं आहे. ताज्या भाज्यांचा आग्रह धरणे आता कृपा करून सोडून द्या!

शहरांमध्ये डॉक्टर, नर्सेस, दवाखान्यातील स्टाफ, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, महानगरपालिकेत काम करणारे अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग, वृत्तांकन करण्यासाठी बाहेर पडलेले वृत्तपत्र प्रतिनिधी, वृत्तपत्र वितरण करणारे व्यक्ती हे आणि इतर अनेक अत्यावश्यक सेवांमध्ये अविरत सेवा देणाऱ्या व्यक्तींवर अनावश्यक भार टाकू नका.

रोज रोज भाजी मार्केटमध्ये एवढी गर्दी करून तुम्ही स्वतःचा तर जीव धोक्यात टाकताच आहेत, त्यासोबतच तुमच्या घरच्या वृद्ध व्यक्तिंचा, लहान बाळांचा व समाजातील इतर बांधवांचा जीव देखील तुम्ही धोक्यात टाकत आहात हे विसरू नका. ‘ आपल्याला काय होणार आहे’ किंवा ‘ जे होईल ते बघून घेऊ’ अशी बेफिकीर वर्तणूक करू नका. पंतप्रधानांनी येवढी विनंती केली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले, आरोग्यमंत्री वारंवार सांगत आहेत आता तरी शहाणे व्हा. विचार करा असा आजार यामुळे देशातील रेल्वे बंद करावी लागली, बसेस व इतर सार्वजनिक वाहतूक बंद करावी लागली, छोटीमोठी हॉटेल्स, दुकानं बंद ठेवावी लागली. असं कधी झालंय का किंवा ऐकिवात तरी आहे का? आता तरी शहाणे व्हा. आणि कृपा करून भाजी मंडई अथवा इतर कुठल्याही ठिकाणी गर्दी करू नका. “भाजी खाणे” हे तुमच्या जिवापेक्षा महत्त्वाचे नाही हे लक्षात घ्या!!!