– प्रसाद रावकर

मुंबईमध्ये सध्या करोनाविरोधात निकराची लढाई सुरू आहे. मुंबई महापालिकेने करोनाबाधित, करोना संशयितांसाठी मोठी यंत्रणा उभी केली आहे. पण करोनाच्या निमित्ताने आरोग्य सेवेतील त्रुटी दृष्टिक्षेपात आल्यात आहेत. परिणामी, करोनाविरुद्धच्या लढाईतून बोध घेण्याची गरज आहे. भविष्यात या त्रुटी दूर करून आरोग्य सेवा भक्कम करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांना पेलावेच लागेल.

चीन, अमेरिका, इटली, अमेरिका, थायलंड यासह आखाती देशांमध्ये झटपट वाढू लागलेल्या करोनाच्या संसर्गापासून वेळीच बोध घेऊन भारतातील किमान प्रमुख शहरांमध्ये ठोस पावले उचलण्याची गरज होती. पण सुरुवातीपासूनच झालेला निष्काळजीपणा आता भारताच्याही अंगलट येवू लागला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत चीन, जपान, इटली, थायलंड आदी देशांतून येणाऱ्या नागरिकांची १८ जानेवारीपासून तापमान तपासणी सुरू करण्यात आली. तर २३ जानेवारीपासून संशयीतांना विलगीकरणात ठेवण्यास सुरुवात झाली. मात्र आखाती देशातून येणाऱ्या नागरिकांकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष झाले आणि तीच चूक मुंबई-पुण्याला महागात पडली. पुण्यातील एक रहिवाशी दुबई सफरीवरुन करोनाबाधित होऊन मुंबईत दाखल झाला. पुण्यात पोहोचल्यानंतर त्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यानंतर मुंबई-पुण्यात करोनाच्या संसर्गाची साखळीच सुरू झाली, ती आजतागायत तोडता आलेली नाही.

देशाची आर्थिक राजधारी हमखास हाताला काम मिळणार हे हेरुन परप्रांतातील बेरोजगारांनी मुंबईची वाट धरली आणि गेल्या दशकात या बाका नगरीतील लोकसंख्येने दीड कोटीचा आकडा ओलांडला. घर परवडणारे नसल्याने मुंबईची ६० टक्के जनतेला झोपडपट्ट्यांचा आश्रय घ्यावा लागला आहे. या झोपडपट्ट्यांमधील करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणणे मोठे आव्हान बनले आहे. टाळेबंदी, संचारबंदीमुळे रोजगार बंद झाल्यामुळे झोपडपट्ट्यांमधील अनेक बेरोजगार कामगार कुटुंबकबिल्यासह जमेल तशी गावची वाट धरली. कुणी चालत, तर कुणी ट्रक, बस, रिक्षाने निघाला. झोपडपट्ट्यांमधून जत्थेच्या जत्थे बाहेर पडत असल्याने करोनाच्या प्रसाराला आयतेच निमंत्रण मिळात गेले. वेळीच रेल्वे गाड्या सुरू करून कामगारांना घरपोच केले असते तर हा धोका टळला असता. परंतु राजकारणाने मुंबईचा घात केला.

जगभरात करोनाचा धुमाकूळ सुरू असताना भारताच्या प्रमुख शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवणे क्रमप्राप्त होते. मुंबईत पहिला रुग्ण सापडल्यानंतर सरकारी यंत्रणांची धावपळ उडाली. मुंबईत सुरुवातीचे काही दिवस केवळ कस्तुरबा रुग्णालयात करोना रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळत होत्या. मात्र रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती असलेल्या प्रवीण परदेशी यांनी तातडीने अन्य रुग्णालयांमध्येही करोनाची चाचणी आणि रुग्ण सेवेची सुविधा उपलब्ध केली. करोना चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांचे दरवाजे उघडून दिले. करोना रुग्णांसाठी अलगीकरण, संशयीतांसाठी विलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. करोना काळजी केंद्र, करोना आरोग्य केंद्रांची उभारणी केली. प्राणवायू, व्हेंटिलेटर आदी सुविधांमध्येही वाढही केली. मात्र असे असले तरी आजघडीला सरकारी आणि पालिकेची रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने करोनाबाधित दाखल होत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. रुग्णांना उपचारासाठी वणवण करावी लागत आहे. तर दुसरीकडे अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांना उपचार मिळेनासे झाले आहेत. अशा आणिबाणीच्या प्रसंगी खासगी रुग्णालयांकडून सरकारला साथ मिळू शकली नाही हे दुर्दैव. अखेर सरकारला खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचे आदेश पालिकेला द्यावे लागले. दामदुप्पट पैसे उकळणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या दरपत्रकावर सरकारने अंकूश आणला. पण त्याची अंमलबजावणी कितपत होईल हा प्रश्नच आहे.

करोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत वैद्यकीय सुविधा उभारण्यात मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त प्रवीण परदेशी यांचा मोलाचा वाटा मानावाच लागेल. मोठ्या प्रमाणावर करोना चाचण्या करून बाधित रुग्ण आणि संशयीत रुग्णांचा शोध घेण्याची मोहीम त्यांनीच राबविली. मात्र करोनाबाबतचे निकष मुंबईत पाळण्यात येत नसल्याचा ठपका केंद्रीय पथकाने ठेवला आणि त्याचे पडसाद प्रवीण परदेशी यांच्या बदलीच्या रुपातने उमटले. करोनाच्या निर्मूलनासाठी संपूर्ण यंत्रणा उभी करण्याचे खरे यश प्रवीण परदेशी यांचेच. पण काही गोष्टी त्यांच्या अंगलट आल्या आणि त्यांना आयुक्तपदावरुन पायउतार व्हावे लागले. सरकारने आयुक्त पदाची सूत्रे इक्बाल सिंह चहल यांच्या हाती दिली. इक्बाल चहल यांनी दुसऱ्याच दिवशी नायर रुग्णालयातील करोना रुग्णांच्या भेटीगाठी घेतल्या. रुग्ण, डॉक्टर, परिचारिकांशी संवाद साधला. धारावीमधील झोपडपट्टीतही ते फिरले. इतकेच नव्हे तर गोवंडी, मानखुर्द सारख्या भागात साडेतीन किलोमीटर पायी चालत रहिवाशांशीही संवाद साधला. एकीकडे करोनाच्या लढाईत सहभागी कर्मचारी बाधित होत होते. काही कर्मचाऱ्यांना करोनामुळे प्राण गमवावे लागले. एकूणच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. पण इक्बाल सिंह चहल यांच्या भेटीगाठींमुळे कर्मचाऱ्यांना काम करण्यास हुरुप आला आणि पुन्हा एकदा करोनाची लढाई तीव्र झाली.

मेअखेरीस मुंबईतील रुग्ण संख्या ७५ हजारांवर जाईल असे भाकीत करण्यात आले होते. पालिकेने केलेल्या ठोस उपाययोजनांमुळे मुंबईतील रुग्णसंख्या तेवढी वाढलेली नाही हेही तितकेच खरे. असे असले तरीही एकूण परिस्थिती लक्षात घेत करोनामुळे मुंबईतील आरोग्य सेवेचे पितळ उघडे पडले आहे. रुग्णालयात खाटांची कमतरता, अपुरे मनुष्यबळ, अस्वच्छता, औषधांचा साठा असे अनेक प्रश्न करोनाविरुद्धच्या लढाईत समोर आले आहेत. त्यामुळे आगामी काळात या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.ब्