25 November 2020

News Flash

BLOG : चेन्नईसाठी खरं आव्हान तर पुढे आहे !

प्ले-ऑफच्या शर्यतीमधून CSK बाहेर...पण संघबांधणीचं आव्हान कायम

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात जे कधीही घडलं नाही ते १३ व्या हंगामत घडलं. महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीमधून अधिकृतरित्या बाहेर फेकला गेला आहे. यंदाचं वर्ष हे चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी खडतरच गेलं. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी ते आतापर्यंत हा संघ एकामागोमाग एक संकटांचा सामना करतच आहे. एरवी नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नईचा संघ यंदा गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर फेकला गेला. महेंद्रसिंह धोनीचा फलंदाजीतला ढासळलेला फॉर्म, फलंदाजीसाठी उशीरा येणं, चुकीची संघनिवड, खराब कामगिरी करत असणाऱ्या खेळाडूंवर अवास्तव दाखवलेला विश्वास, दुखापती, प्रमुख खेळाडूंची माघार अशा एक ना अनेक कारणांनी चेन्नईचा संघ यंदा त्रस्त होता.

स्पर्धा म्हटली की जय-पराजय या गोष्टी आल्याच. चेन्नई सुपरकिंग्ज संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला याचं दुःख नाही…परंतू यंदा या संघात जिंकण्याची भावनाच दिसली नाही आणि अंतर्गत कलहामुळे हा संघ जिंकणं विसरुन बसल्यासारखा वाटला. Daddy’s Army असं बिरुद मिरवणाऱ्या चेन्नईच्या संघाची यंदा अशी अवस्था का झाली यावर चर्चा करण्यात आता काहीच अर्थ उरत नाही. खुद्द महेंद्रसिंह धोनीने यंदाचं वर्ष हे आमचं नव्हतं हे मान्य केलंय. खराब कामगिरीची १०० कारणं देता येतील परंतू सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा आम्ही आमच्या क्षमतेला साजेसा खेळ केला नाही, हे धोनीने खुल्या मनाने मान्य केलंय.

सोशल मीडियावर चेन्नईचे चाहते आपल्या संघाची झालेली अवस्था पाहून नाराज आहेत. परंतू नीट विचार करायला गेलं तर चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी खरं आव्हान आता सुरु होणार आहे. २०२१ साली होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने मेगा ऑक्शन करण्याची तयारी केली होती. ज्यामध्ये सर्व खेळाडू हे पुन्हा एकदा ऑक्शन पुलमध्ये येऊन त्यांच्यावर बोली लावली जाणार होती. परंतू गेल्या काही महिन्यांपासून करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआय २०२१ साली होणारं ऑक्शन रद्द करण्याच्या विचारात आहे. असं झाल्यास चेन्नईला पुन्हा एकदा आता आहे त्या खेळाडूंसोबत पुन्हा मैदानावर उतरले. १० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. जानेवारी महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे आणि यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा आयपीएल खेळवलं जाईल. अशा परिस्थितीत आपल्या संघाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करवून द्यायचं असेल तर चेन्नईला आतापासून तयारी करावी लागणार आहे.

रैना-हरभजन बद्दलची भूमिका स्पष्ट व्हायला हवी

चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने कितीही नाकारलं तरीही संपूर्ण हंगाम CSK ला सुरेश रैना आणि हरभजन सिंह यांची उणीव भासली. हे दोन्ही खेळाडू प्रचंड अनुभवी आहेत. आतापर्यंत संकटकाळात दोन्ही खेळाडूंनी संघाला विजय मिळवून दिला होता. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी सुरेश रैना हॉटेलमध्ये आपल्याला मिळालेल्या रुमला बाल्कनी नसल्यामुळे नाराज होता अशा बातम्या समोर आल्या होत्या. ज्यामुळे हंगामाला सुरुवात होण्याआधीच त्याने स्पर्धेतून माघार घेतली. CSK टीम मॅनेजमेंटने हॉटेलच्या रुमवरुन रैना नाराज असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं होतं. परंतू यानंतर संघमालक एन. श्रीनीवासन यांचं वक्तव्य, त्यानंतर केलेली सारवासारव, संपूर्ण हंगामात धोनीने रैनाचा थेट उल्लेख करणं टाळणं या सर्व गोष्टी काहीतरी बिनसल्याचं सांगतात.

जी गोष्ट रैनाबद्दल तीच हरभजन सिंहबद्दल. खासगी कारण देत हरभजन सिंह तेराव्या हंगामात सहभागी झाला नाही. परंतू मध्यंतरीच्या काळात इरफान पठाणने धोनीच्या वाढत्या वयाबद्दल केलेल्या ट्विटवर हरभजनचं व्यक्त होणं ही गोष्ट देखील खूप काही सांगून गेली. CSK चं मॅनेजमेंट रैना आणि हरभजन यांचा करार रद्द करणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या त्यामुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम आणखीनच वाढला. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही महत्वाच्या खेळाडूंनी माघार घेतलेली असताना चेन्नईने या दोन्ही खेळाडूंच्या बदली कोणालाही संधी दिली नाही, ही गोष्ट अनेकांना खटकली. त्यामुळे नव्या हंगामाची सुरुवात करताना चेन्नईला जुन्या हिशोबाचा ताळमेळ बसवावा लागणार आहे.

धोनीच्या नेतृत्वाबद्दलही विचार व्हायला हवा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीने पुढचे काही हंगाम आपण आयपीएल खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. परंतू तेराव्या हंगामात धोनीचा खेळ आणि त्याचे काही निर्णय पाहता आता चेन्नई सुपरकिंग्जला नवीन नेतृत्वाबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे असं वाटायला लागतंय. फलंदाजीत ढासळलेली कामगिरी, संथ खेळ, चुकीची संघनिवड आणि धावा काढताना मैदानात होणारी दमछाक…अशा अनेक गोष्टींमुळे धोनी यंदा लक्षात राहिला. खराब कामगिरी होत असतानाही केदार जाधव, मुरली विजयला मिळणारी संधी…तरुणांमध्ये स्पार्क दिसला नाही या सर्व गोष्टी करुन धोनीने संघात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण केलं. नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड यांना संधी देताना सातत्य दिसलं नाही. मात्र खराब कामगिरी होऊन केदारला वारंवार संधी मिळत गेली.

ज्या क्षणी संघाला धोनीची गरज असते तिकडे धोनीने फलंदाजीसाठी येणं टाळून इतरांना संधी दिली. एका-दुसऱ्या सामन्यात तरुणांना संधी द्यायची या नावाखाली धोनीचा हा प्रयोग खपून गेलाही…पण वारंवार पराभव पदरात पडायला लागल्यानंतर धोनीच्या चाहत्यांमध्येही आता त्याच्या फलंदाजीबद्दलची चर्चा सुरु झाली. त्यामुळे पुढील हंगामासाठी नव्याने संघ बांधताना धोनीच्या नेतृत्वाबद्दल विचार करणं CSK ला क्रमप्राप्त आहे.

Daddy’s Army ला करा गुडबाय, तरुणांना द्या संधी

अखेरपर्यंत हार न मानणारा संघ अशी चेन्नईची ओळख होती. पण असं म्हणतात की घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. दोन महत्वाच्या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार काय घेतली CSK च्या त्रुटी संपूर्ण स्पर्धेत उघड्या पडल्या. शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, इम्रान ताहीर हे जगप्रसिद्ध खेळाडू आहेत यात काही वाद नाही. परंतू त्यांचं वाढणारं वय आणि दुखापती हा मुद्दा आता चेन्नईला लक्षात घ्यावाच लागेल. फलंदाजीदरम्यान शेन वॉटसनचं फुटवर्क, फिल्डींगदरम्यान केलेला गलथानपणा, दोन-चार सामन्यांनंतर ब्राव्होला हंगाम सोडून घरी परतावं लागणं, धोनीला धावा घेताना झालेला त्रास या सर्व गोष्टी पाहिल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते की या खेळाडूंवर आता संघाला अवलंबून राहता येणार नाही. तरुण खेळाडूंना आता संधी मिळणं गरजेचं आहे.

इम्रान ताहीर या अनुभवी फिरकीपटूला यंदा संधी न मिळाल्यामुळेही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतू इम्रान ताहीरचं वाढतं वय आणि फिल्डींक करताना येणाऱ्या अडचणी, संघाचा बॅलन्स या सर्व गोष्टी अनेकांच्या लक्षातच आल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर फेकला गेलेल्या पियुष चावलाला संधी देऊन त्यावर कोटय्वधींची बोली लावणं अशा अनेक अतर्क्य गोष्टी चेन्नई सुपरकिंग्ज यंदा करत राहिलं. ज्याचा फटका त्यांना स्पर्धेदरम्यान बसलेला पहायला मिळाला.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ यंदा सर्वोत्कृष्ट संघबांधणीचं उदाहरण ठरलं आहे. फॉर्मात असलेल्या खेळाडूंना संधी देणं आणि एखादा खेळाडू दुखापतग्रस्त किंवा फॉर्म हरवून बसला तर त्याची रिप्लेसमेंट तयार असणं असं सगळं काही या दोन संघांच्या बाबतीत जुळून आलंय. याच कारणामुळे हे दोन संघ यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्मात आहेत. दुर्दैवाने चेन्नई सुपरकिंग्जला ही गोष्ट यंदा जमली नाही. पराभवानंतर सोशल मीडियावर धोनीवर टीका होत आहे. चाहते नाराज झाले आहेत. ज्याच्याकडून अपेक्षा असतात त्याने खराब कामगिरी केली तर नाराज होणं स्वभाविक आहे. परंतू चेन्नईचे खेळाडू हे लढवय्ये आहेत, यंदाच्या झालेल्या चुकांमधून धडा घेऊन काही कठोर निर्णय घेणं संघाला गरजेचं आहे. त्यामुळे या आव्हानांना CSK चं मॅनेजमेंट कसं सामोरं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • prathmesh.dixit@indianexpress.com या इ-मेल आयडीवर आपल्या प्रतिक्रिया अवश्य पाठवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 4:12 pm

Web Title: ipl 2020 csk officially out from play off race what challenges lies ahead of team quick overview psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: ‘या’ महान खेळाडूने पंजाबला लढाऊवृत्ती शिकवली- गावसकर
2 IPL 2020 : CSK स्पर्धेतून बाहेर; राजस्थानच्या रॉयल विजयामुळे उरल्या सुरल्या अपेक्षाही संपल्या
3 IPL 2020 : ‘आयपीएल’मधील महिलाराज
Just Now!
X