News Flash

“हम आपके है कौन”… ते “रामप्रसाद की तेहरवी”… पर्यंत

“राम प्रसाद की…” मध्ये पोकळ भारतीय कुटुंब पद्धती आणि तिचा खोटेपणा एकदम उघड केला आहे.

-श्रुति गणपत्ये

 

नेटफ्लिक्सवर गेल्या आठवड्यामध्ये सीमा पहावा दिग्दर्शित “रामप्रसाद की तेहरवी” हा चित्रपट प्रदर्शित झाला. तो पाहिल्यावर समाधान वाटलं की हिंदी चित्रपटाने एका स्वप्नवत वाटणाऱ्या “हम आपके है कौन”पासून प्रवास करून २० वर्षांत तरी का होईना पण “रामप्रसाद की तेहरवी”पर्यंत वास्तववादी दुनियेमध्ये प्रेक्षकांना आणून सोडलं.

दोन्ही चित्रपट एका कुटुंबाभोवती भिरतात. पण त्यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. “हम आपके…” प्रमाणे प्रेक्षक दुसरा चित्रपट डोक्यावर घेणार नाहीत किंवा रांगा लावून ब्लॅकने तिकीट काढणार नाहीत. अर्थात टाळेबंदीने चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघण्याची व्याख्याच बदलली आहे. त्यामुळे ब्लॅकने तिकीट वगैरे जमाना गेला आता. पण “हम आपके..” प्रमाणे कपडे घालणं, त्याची गाणी सगळ्या कौटुंबिक कार्यक्रमांना वाजवणं आणि नाचणं, लग्नामध्ये बूट लपवण्याचा एक विधी अनिवार्य करणं, सतत कौटुंबिक कार्यक्रम करून ‘बडों का आदर, छोटोंसे प्यार’ वगैरे अशा पद्धतीने “कल्ट” नक्कीच “रामप्रसाद…” निर्माण करणार नाही. पण “राम प्रसाद की…” मध्ये पोकळ भारतीय कुटुंब पद्धती आणि तिचा खोटेपणा एकदम उघड केला आहे.

“हम आपके…”ची कथा सांगण्याची मूळीच गरज नाही कारण त्यात कथा अशी काही नाहीच. साखरपुडा, लग्न, बारसं, मृत्यू मग परत लग्न अशा वेगवेगळ्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हा चित्रपट फिरतो. मग त्यात गाणी, नृत्य, भरजरी कपडे, प्रचंड मोठी घरं, मोठाले बिझनेस, नोकर-चाकर, सगळे कुटुंबिय एकदम समजूतदार, त्याग, परंपरा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सगळं कसं “गुडीगुडी” ! जगात काहीही घडू देत पण भारतीय परंपरा महान आहे आणि ती टिकवण्यासाठी प्रत्येक नवीन पिढीनेही आपल्याला त्याच कौटुंबिक साच्यामध्ये घातलं पाहिजे हा अट्टहास. हा चित्रपट प्रदर्शित झाला तो काळ ९० च्या दशकातला होता. तेव्हा जागतिकीकरणाचे वारे नुकतेच वाहायला सुरुवात झाली होती. आधुनिकतेच्या नावाखाली अनेक गोष्टी घराघरांमध्ये दाखल होत होत्या आणि त्यांना रोखणं अशक्य होतं. त्याचवेळेला सामाजिक पातळीवर बाबरी मशीदही पाडली गेली आणि हिंदू परंपरावाद्यांना ऊत आला. अशावेळी हिंदू भारतीय संस्कृती आणि परंपरा कायम राखण्याच्या नावाखाली हा चित्रपट आला. तो इतका चालला की हा फॉर्म्युला घेऊन शेकडो चित्रपट आले, काही गाजले काही पडले, विस्मृतीत गेले. त्यावरूनच प्रेरणा घेऊन एकता कपूरच्या मालिका टिव्हीवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. कुटुंब ही एक संकल्पना ठेवून त्याभोवती बाकीचा मसाला टाकायचा बास. खरंतर गेल्या २० वर्षांमध्ये विशेषतः शहरी भागांमध्ये लहान कुटुंब व्यवस्था निर्माण झाली. एकत्र कुटुंब पद्धतीत होणाऱ्या अनेक गोष्टी मागे पडल्या कारण ती काळाज गरज होती. पण हिंदी सिनेमाला मात्र अजूनही त्या खिळखिळ्या एकत्र कुटुंबाची खूपच काळजी आहे.

त्या पार्श्वभूमीवर या खिळखिळ्या झालेल्या कुटुंबपद्धतीला दाखवणारा “रामप्रसाद की…” चित्रपट हा उत्तम आहे. रामप्रसादला चार मुलगे आणि दोन मुली असतात. तो मरतो तेव्हा अंत्यसंस्कारासाठी सगळे कुटुंब आणि नातेवाईक एकत्र येतात. अशावेळी खूप वर्षांनी एकत्र आलेल्या या कुटुंबियांमधील हेवे दावे, प्रेम, मत्सर, निर्लज्जपणा आणि थोडा दिखावूपणा याभोवती ही कथा फिरते. कुठेही कुटुंब एकत्र आलं की जेवण-खाण करण्याची जबाबदारी अर्थातच घरच्या सूनांवर येते त्यामुळे त्यांची धुसफूस सुरू होते. चारही मुलगे दोन दिवसांतच बापाचा मृत्यू विसरून पिकनिकला आल्याप्रमाणे दारू पिऊन रात्री साजऱ्या करतात आणि आपल्या आयुष्यातली विफलता एकमेकांना सांगतात. त्यात काही जुन्या गंमतीशीर आठवणीही निघतात. या मुलांचा मामा एकदम परंपरावादी असल्याने सारखा त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी टोकत राहतो. पण खरा प्रश्न असतो तो हा की आता आईला एवढ्या मोठ्या घरात एकटं कसं सोडणार आणि तिची जबाबदारी कोण घेणार. मग घर विकायचं का वगैरे चर्चा होतात. पण त्यांना अचानक कळतं की आपल्या बापानेच चक्क रुपये १० लाखांचं कर्ज काढलं होतं. आता त्याची जबाबदारी कोण घेणार?

यामध्ये प्रत्येक मुलाचा स्वार्थ, आपण आधी कशी घराला आर्थिक मदत केली होती म्हणून दुसऱ्याला कमी लेखणं, मोठ्या मुलीने आपल्याला आयुष्यात कधीच काही मिळालं नाही म्हणून आई-बापाला दूषणं देणं, आपल्यापेक्षा इतर भावंडांना खूप जास्त मिळालं अशी असूया असं प्रत्येकाचं कुटुंबाबद्दलचं मत, अगदी आई-वडिलांनी सहा पोरं जन्माला घातली म्हणजे ते किती रोमेंटिक असतील असं गॉसिप, स्वार्थीपणा, केवळ लोक लज्जेखातर सोपस्कार करायचे म्हणून एकत्र येणं हे हळूहळू उलगडत जातं आणि भारतीय सुखी कुटंबाचे एक एक पापुद्रे निघतात. बापाचं तेरावं ३१ डिसेंबरला येत असल्याने ते पुढे किंवा मागे करण्याचाही मुलं आग्रह धरतात. पण जुन्या पिढीच्या दबावामुळे ते नमतात.

एकत्र कुटुंब या आवरणामागे कसा केवळ स्वार्थ दडलाय हे उघड व्हायला लागतं आणि तोच स्वार्थ ते आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे मुलांनाही देतात. कारण एका प्रसंगात राप्रसादचा नातू एका शेजारच्या मुलीबरोबर ३१ डिसेंबरची पार्टी करतो आणि तिला किस करतो. ती मुलगी हे सगळं खूप गांभीर्याने घेते आणि आपलं प्रेम त्याच्याकडे व्यक्त करायला जाते. त्यावेळी तो तिला झिडकारतो आणि रात गयी बात गयी… असं काहीसं सांगतो.

केवळ १३ दिवसांच्या काळात प्रत्येकाचे बुरखे फाटून जातात आणि मेलेल्या बापाला तर पोरं आणि नातेवाईक कधीच विसरतात. आईची जबाबदारी अर्थातच कोणाला नको असते. कदाचित ही कल्पना असल्यानेच आई-वडील यांनी आधीच आपल्या भविष्याची तरतूद केलेली असते. हे भारतीय कुटुंब व्यवस्थेचं वास्तवादी चित्रण आहे आणि २० वर्षांपूर्वीच्या त्या “फील गुड” कुटुंबातून बाहेर पडण्याची गरज आहे. कारण पाश्चिमात्यांच्या न्यूक्लिअर कुटुंबपद्धतीला आपणं नावं ठेवतो आणि त्यात अनेक अवगुण दाखवतो. मग आपल्या कौटुंबिक व्यवस्थेवर टीका कोण करणार?

shruti.sg@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 2:09 pm

Web Title: ram prasad ki teravi movie review by shruti ganpatye kpw 89
Next Stories
1 संथ लयीतील साधी प्रेमकविता. . . Is Love Enough? SIR
2 Blog: टाळेबंदीमध्ये बिंज वॉचिंग
3 जागतिक वारसा दिन २०२१ः भूतकाळाचं ‘भविष्य’ काय?
Just Now!
X