जय पाटील

‘अख्खं जग बंद पडलं तरी लोकल सुरूच राहणार!’ मुंबईकरांचा हा ठाम विश्वास करोनाच्या साथीने पार धुळीलाच मिळवला. साथीचा प्रसार थांबवण्याच्या उद्देशाने मार्च अखेरीस लोकल वाहतूक बंद करण्यात आली. एखादं आठवड्यात सुरू होईल म्हणता म्हणता सहा महिने उलटले. आता १७ ऑक्टोबरपासून ठराविक वेळेत महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. महिलांची बसमुळे होणारी दगदग काहीशी कमी होणार आहे. घालवावा लागणारा अतिरिक्त वेळ आणि पैसे वाचणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकींना आपल्या लोकल प्रवासाचा साथीपूर्वीचा शेवटचा दिवस नक्कीच आठवला असणार. दरम्यान या प्रवासाला अद्याप रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळालेली नाही ही माहितीही समोर आली आहे. तरीही ही बातमी समोर आल्यानंतर ज्या गोष्टी सुचल्या त्या लेखात मांडल्या आहेत

मार्चमध्ये लोकल बंद केल्यानंतर काही दिवसांनी त्या अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या, पण सर्वसामान्यांना मात्र लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली नव्हती. आता बसची रांग, वाहतूककोंडीत जाणारे तासन्-तास, लोकलच्या तुलनेत मोजावे लागणारे दुप्पट तिप्पट पैसे यातून सुटका होणार या विचाराने अनेक महिलांचा जीव भांड्यात पडला आहे. पण त्याच वेळी पूर्वीसारखी बिनधास्त ढकला-ढकली, चेंगराचेंगरी आता परवडणार नाही, रोजची गाडी तर मिळणं कठीणंच दिसतंय, पण त्या गाडीतल्या एखाद्या सखीशी तरी भेट होईल का, नवरात्रीत दरवर्षीप्रमाणे रेल्वेस्थानकं ठरल्या रंगात रंगून जाणार का? असे अनेक प्रश्नही आहेत. एवढी वर्षं अंगवळणी पडलेला प्रवास आता पुरता बदलला असणार याचं भान आहेच.

दुसरीकडे प्रवासाची मुभा केवळ महिलांना असल्यामुळे पुरुषांमध्ये नाराजी आहेच. त्यांच्यासाठी अद्यापही लोकलचे दरवाजे बंदच आहेत. राज्य सरकार लोकल प्रवासाची परवानगी देणार असल्याची चर्चा सप्टेंबर अखेरीस सुरू झाली होती. लोकल सर्वांसाठी खुल्या करण्यात याव्यात, यासाठी सरकारवर सर्वच स्तरांतून दबावही होता. पण मुंबई लोकल आणि त्यात होणाऱ्या बेसुमार गर्दीचा विचार करता, सरकार सेवा टप्प्याटप्प्याने म्हणजे नेमकी कशी पूर्ववत करणार, सुरुवातीच्या टप्प्यात नेमकी कोणाला मुभा असणार असे प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांच्या मनात होते. त्यातील पहिला टप्प्याची अंमलबजावणी १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. लोकल सेवा सामान्यांसाठी खुली झाली की संसर्गाची मोठी लाट येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या प्रश्नांची उत्तरंही टप्प्याटप्प्याने मिळत जातीलच. सध्या गरज आहे संयमाची! लोकल म्हटली की गर्दी ही आलीच. त्यातही सुरक्षित प्रवास करण्याचं कौशल्य आता अंगी बाणवावं लागणार आहे.