– सुनीता कुलकर्णी

ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘सेक्रेड गेम्स’ खेळणारा सैफ अली खान आता याच प्लॅटफॉर्मवर ‘तांडव’ करणार आहे. होय, अॅमेझॉन प्राइमवर अली अब्बास जफर निर्मित आणि दिग्दर्शित ही नवी वेबसीरिज येऊ घातली असून त्यात सैफ अली खान, डिंपल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’च्या टीझरवरून त्या वेबसीरिजच्या कथानकाला राजकीय पार्श्वभूमी आहे, असं दिसत आहे.

‘टायगर जिंदा है’, ‘भारत’, ‘सुलतान’ हे चित्रपट दिग्दर्शित करणारे अली अब्बास जफर ‘तांडव’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी तसंच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. दिल्लीमध्ये घडणाऱ्या ‘तांडव’मध्ये सत्तासंघर्ष दाखवण्यात आला असून त्यासंदर्भात दिग्दर्शक जफर म्हणतात की आम्ही या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना सत्तेची भूक ही काय चीज असते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेच्या खेळात चूक किंवा बरोबर, ब्लॅक किंवा व्हाईट या पेक्षाही ग्रे शेड्स असतात. सत्ता मिळवणं, ती टिकवणं आणि त्यासाठी शक्य असेल ते सगळं करणं हेच असतं असं यात दाखवण्यात आलं आहे. ‘कलम १५’ या सिनेमाचं लेखन करणाऱ्या गौरव सोळंकी यांनीच ‘तांडव’ या वेबसीरिजचं लेखन केलं आहे. त्याशिवाय दर्जेदार कलाकारांनी त्यात भूमिका केल्या आहेत. त्यामुळे ही वेबसीरिज प्रेक्षकांना आवडेल याचा आम्हाला विश्वास वाटतो आहे.

या वेबसीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात सैफ अली खान गर्दीला अभिवादन करताना दिसतात. त्याच्या पार्श्वभूमीवर एेकायला येतं, भारत में राजनीती ही सबसे बडी चीज है, जो सबको चलाती है, इस देश मे जो प्रधानमंत्री है, वही राजा है…दोन वर्षांपूर्वी अनुराग कश्यपच्या सेक्रेड गेम्समधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवणाऱ्या सैफ अली खानची ही दुसरी वेबसीरिज आहे, तर डिंपल कपाडिया यांची पहिलीच. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ख्रिस्तोफर नोलानच्या ‘टेनेट’मध्ये डिंपल कपाडिया यांना मोठ्या पडद्यावर पाहिलेल्या त्यांच्या चाहत्यांसाठी ही खूषखबरच आहे. हॉलिवूड सिनेमापाठोपाठ लगेचच त्या वेबसीरिजमध्येही दिसणार आहेत. त्यांच्याबरोबरच दिनो मोरिया, सुनील ग्रोव्हर, गौहर खान, मोहम्मद झीशान अयुब, संध्या मृदुल यांच्याही भूमिका आहेत.