News Flash

Blog : निव्वळ देहबोलीतून पात्र उभं करणाऱ्या शबाना आझमी

ज्या काळात चित्रपट पल्लेदार संवादाने गाजत होते, तेव्हा शबानाने वेगवेगळ्या चित्रपटात निव्वळ देहबोलीतून पात्र उभं केलं.

शबाना आझमी

-अजित जोशी

प्रकाश झाचा ‘मृत्युदंड’ कदाचित पाहिला असेल, त्यातला प्रसंग आहे. उत्तर प्रदेशातल्या पुरुषी अहंकार आणि जातीय वर्चस्ववाद याने ओतप्रोत भरलेल्या एका गावातलं एक ‘बामन’ कुटुंब! कर्ता पुरुष (मोहन आगाशे) मूल होत नाही म्हणून बायकोला टाकून मठाचा अधिपती बनतो. टाकलेली बायको सहानुभूती आणि प्रेमाचा ओलावा एका तथाकथित खालच्या जातीतल्या माणसात (ओम पुरी) शोधते. त्याच्यापासून गर्भार राहते. तिची शहरात वाढलेली, शिकली सवरलेली जाऊ (माधुरी दीक्षित) हीच काय ती तिची मैत्रीण. जेव्हा जावेला ही गर्भार राहिल्याची गोष्ट कळते, तेव्हा तीही भयभीत होते. तो सगळा प्रसंगच पाहायला जबरदस्त आहे. पण कातर स्वरात जेव्हा माधुरी विचारते, ‘किस का है?’ तेव्हा ती गर्भार, टाकून दिलेली स्त्री, शबाना उत्तर देते, ‘मेरा!’. त्या एका क्षणी भावभावनांचा जो कल्लोळ, मातृत्व आणि बंडखोरी याचा जो अप्रतिम मिलाप, शबाना आझमीने चेहऱ्यावर आणलाय नं, त्याला अभिनयाच्या प्रत्येक कार्यशाळेत तीनतीनदा दाखवायला हवं. वाढदिवसाच्या निमित्ताने शबाना आझमींची आठवण झाली, की हा प्रसंग सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो.

पण १९७४ च्या ‘अंकुर’पासून सुरु करून ते कालपरवाच्या सात वर्षांपूर्वीच्या ‘मटरू कि बिजली का मंडोला’पर्यंतच्या (त्यानंतरही आलेत काही चित्रपट, पण आताशा काम कमी केलेलं दिसतंय) शबानाच्या कारकिर्दीत असे असंख्य प्रसंग आहेत, जे तिने कधी निव्वळ नजरेने, कधी देहबोलीतून तर कधी कसदार संवादफेकीतून जिवंत केलेत. डॉ लागूंच्या आत्मचरित्राचं नाव ‘लमाण’ आहे. लमाणचा अर्थ पाणी वाहून नेणारा. लागू म्हणतात की अभिनेता हा निव्वळ वाहून नेणारा आहे. पण हा आशय ‘वाहून’ नेताना लेखकाला आपलं सगळा देह पणाला लावावा लागतो. हे शबाना आझमींच्या कारकिर्दीत तंतोतंत दिसतं. ज्या काळात चित्रपट पल्लेदार संवादाने गाजत होते, तेव्हा शबानाने वेगवेगळ्या चित्रपटात निव्वळ देहबोलीतून उभं केलेलं पात्र आवर्जून पाहा. ‘मंडी’मध्ये कोठेवाल्या मालकिणीच्या झोकात चालणारी रुक्मिणीबाई, ‘अर्थ’मध्ये असुरक्षिततेतून आत्मविश्वासाकडे जाणारी पूजा आणि ‘अंकुर’मध्ये शोषित, लाचार दलित स्त्री झालेली लक्ष्मी, या सगळ्या जणींचे प्रसंग आवाज बंद करून पाहा. नुसत्या चालीतून आणि चेहऱ्यावरून त्यांची व्यक्तिमत्त्व ठळकपणे उठून दिसतील. पडद्यावर एखादी व्यक्ती दिसते, ती ‘पात्र’ तेव्हाच होते, जेव्हा तिला व्यक्तिमत्त्व येतं, त्याची वैशिष्ट्य/कंगोरे येतात. उत्तम अभिनेता आपल्या सर्वांगसुंदर अभिनयात हीच वैशिष्ट्य टोकदार करत नेतो. ‘निशांत’मधली असहाय्य, बलात्कारित सुशीला असो किंवा ‘तेहजीब’मधली कमालीची यशस्वी, महत्त्वाकांक्षी गायिका रुख्साना, या प्रत्येक भूमिकेत शबाना अक्षरशः विरघळून गेलेली आहे. अतिशय संयत आविर्भाव, कोणताही आक्रस्ताळेपणा न करता आलेली संवादफेक आणि व्यक्तिरेखेला न्याय देईल असा वावर यातून त्या व्यक्तीच्या स्वभावाचा एकेक टोकदार कंगोरा अधोरेखित झालेला दिसतो. हिंदी चित्रपटाची हिरोईन गोरीगोमटीच असावी, हा संकेत धाब्यावर बसवत दीप्ती नवल, स्मिता पाटील आणि शबाना आझमी या तिघी सत्तरीत रुपेरी पडद्यावर आल्या. त्या तिघींनी आणि एकूणच त्या परंपरेत बनलेल्या चित्रपटांनी अश्या असंख्य व्यक्तिरेखांना आणि त्यातून उलगडत गेलेल्या कथेला पुरेपूर न्याय दिला. यातही स्मिता आणि शबानाची जुगलबंदी गाजली. त्यांचं व्यक्तिगत आयुष्यात जमत नसे म्हणतात. नसेलही कदाचित. पण त्या दोघींनी एकत्रित काम केलेले अर्थ,निशांत नाहीतर मंडी पाहा. कलाकार दुसऱ्याला पूरक होऊन कथा उभी करत असतो, ‘खाऊन’ टाकायला नसतो, याचा सहीसही साक्षात्कार होईल. स्मितासारखंच शबानानेही व्यावसायिक चित्रपट केले. आधी विनोद खन्नासोबत आणि उतारवयातल्या भूमिकेत राजेश खन्नासोबत तिची जोडी गाजली. सेक्स अपील हा कधीच तिचा स्थायीभाव नसला, तरी चित्रपटाची गरज होती, तिथे शबाना मोहक, आकर्षक आणि क्वचित का होईना पण मादक अदाकारीही दाखवू शकलेली आहे, हे तिच्यासारखेच सत्तरीत पोचलेले तिचे त्यावेळेचे दर्शक नक्की सांगतील!

घराणेशाहीच्या वादाचा जमाना आहे. शबाना घराणेशाहीचा हिस्सा होती, असं म्हणायला हरकत नाही. तिचे वडील कैफी आझमी म्हणजे एकेकाळच्या सुप्रसिद्ध ‘प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन’चे खंदे सदस्य. प्रतिभावान कवी. आई शौकत रंगमंचावरची अभिनेत्री. (जुन्या उमराव जान मधली खानुम जानची भूमिका त्यांनी केली होती आणि नव्यात शबानाने, हा एक योगायोग!) अर्थात याचा उपयोग प्रतिभा तासून घ्यायला, सामाजिक जाणिवा रुजायला किंवा एका समृद्ध भवतालाचा म्हणून झाला असेल तेवढाच! त्याचा व्यावसायिक उपयोग शून्य. पुढे लग्नही दुसऱ्या दिग्गज उर्दू शायराच्या – जानिस्सार अख्तरच्या मुलाशी – जावेद अख्तरशी झालं. जावेद साहेब स्वतःही उत्तम कवी, प्रथितयश संवादलेखक. सावत्र मुलं फरहान/झोया आजच्या काळात यशस्वी आणि कसदार दिग्दर्शक/अभिनेते. भाची तब्बू आजही प्रेक्षकाला खिळवून ठेवतेच आहे. ऑनलाईन मंचावर छायाचित्रकार भावाची फिल्म सध्या गाजतेय. दृष्ट लागावी अशी ही घराणेशाही आहे.

आईवडिलांकडून आलेला वारसा फक्त अभिनयाचा/कलेचा नाही. सामाजिक जाणिवांचा, बंडखोरीचाही आहे. मग हिंदू आणि मुस्लीम, दोन्ही मूलतत्त्ववाद्यांना ती आणि जावेद डोळ्यात खुपतात. मागे एकदा तर कोणीतरी जाहीर टीव्ही कार्यक्रमात धमकी देईपर्यंतही मजल गेली होती. अर्थात शबानाला त्याची पर्वा नाही. काश्मिरी पंडित असो किंवा लातूर भूकंपाचे बळी, तिचं मानवतावादी काम सुरूच आहे. धार्मिक सलोख्यासाठी पदयात्रा, एड्स बद्दलची जनजागृती, आपल्या वडलांच्या मिझवान गावातला विकास अश्या अनेक कामामध्ये ती कारकीर्द उत्तम सुरु असल्यापासून सक्रीय आहे. आपल्या चित्रपटांप्रमाणेच राज्यसभेची खासदार म्हणूनही ती ‘शोभेची बाहुली’ कधीच नव्हती.

आज सत्तराव्या वाढदिवस साजरा करताना शबाना आझमींनी बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट,अनेक पुरस्कार, खासदारकी, अशा अनेक गोष्टी साध्य केलेल्या आहेत.‘आम्ही इतके चांगले मित्र आहोत, की लग्नही आमची मैत्री बिघडवू शकलेलं नाही’, असं म्हणणारा जीवनसाथी आहे. सर्वार्थाने कृतार्थ म्हणता येईल, असं हे आयुष्य आहे. येत्या अनेक वर्षांच्या प्रवासात हे असंच संपन्न आयुष्य मिळो, एवढीच मनःपूर्वक शुभेच्छा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 4:21 pm

Web Title: special blog on actress shabana azmi by ajit joshi ssv 92
Next Stories
1 डोकं फिरलंया बयेचं..
2 Blog : …माती होण्याआधी सावर कंगना
3 Blog : पुरुषप्रधान संस्कृतीच्या बुरख्याला हात घालणारी चुडैल
Just Now!
X