News Flash

BLOG: श्रीरामजन्मभूमी पुनर्निर्माण-तब्बल ४९२ वर्षांच्या अस्मितेच्या लढाईची यशस्वी सांगता

भारताच्या विश्वगुरुपदाच्या वाटचालीत महत्वाचा टप्पा

मंगलप्रभात लोढा

श्रीरामजन्मभूमीवरील ऐतिहासिक मंदिर पुनर्निर्माण कार्याचा येत्या ५ ऑगस्ट रोजी श्रावण कृष्ण द्वीतियेच्या दिवशी शुभारंभ मा.पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. ही घटना खरोखरच ऐतिहासिक आहे. भारताच्या विश्वगुरुपदाच्या वाटचालीत हा एक महत्वाचा टप्पा आहे. तब्बल ४९२ वर्षांनी प्रभू श्रीराम त्यांच्या हक्काच्या ठिकाणी परत येत असल्याने दसरा दिवाळी गुढीपाडवा वैशाखी रंगपंचमी अक्षय तृतीया असे सगळे सण जर एकत्र केले, तर जसे असेल तसेच प्रचंड महत्व या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाचे आहे.

जगभरात प्रत्येक धर्मियांची प्रमुख पवित्र स्थळे आहेत. जसे ख्रिश्चन लोकांचे व्हॅटिकन, ज्यू लोकांचे जेरुसलेम आणि मुस्लिम लोकांचे मक्का. पण हिंदूंचे काय…? हिंदूंची ओळख ज्या प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान शंकरावरून जगाला आहे, त्याच प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची जन्मभूमी मंदिरे आणि काशी येथील काशीविश्वेश्वर मंदिर ही परकी आक्रमकांनी नष्ट केली. गेली किमान पांचशे वर्षे ही पवित्र स्थळे परत मिळविण्याची आणि सन्मानाने पुन्हा उभी करण्यासाठी हिंदू समाजाचा लढा सुरु आहे. स्वातंत्र्यानंतर लगेचच सोमनाथच्या धर्तीवर हि तिन्ही मंदिरे मुक्त होणे आवश्यक होते. परंतु या देशातले काँग्रेसचे ढोंगी राजकारण सातत्याने हिंदूंची मुस्कटदाबी करण्यात मग्न राहिले. श्रीरामजन्मभूमी आंदोलनातून मात्र हिंदूंनी अस्मितेचा हुंकार भरला. हिंदूंच्या या हुंकाराचा भारतीय राजकारण आणि भारताचे जागतिक स्थान यावर प्रभावशाली सकारात्मक परिणाम झाला आहे. एका राजकीय ढोंगापासून हिंदूंनी स्वतःची सुटका करून घेतली आहे, याची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे.

सुमारे ४९२ वर्षांनंतर पुन्हा नव्याने उभे राहणारे हे श्रीरामजन्मभूमी मंदिर लवकरच जागतिक पर्यटन स्थळ बनेल. जगभरातील नेते भारतात आल्यावर प्रथम या मंदिराला भेट देतील. केवळ हिंदूच नव्हे तर अध्यात्मिक अनुभूतीच्या आणि शाश्वत सत्याच्या शोधात असलेल्या सर्वधर्मीय माणसांचे ते प्रमुख प्रेरणास्थान असेल. भारतीय संस्कृतीची आणि ताकदीची खरी ओळख जगाला या मंदिरातून होईल.

थोडक्यात इतिहास

परकी आक्रमकांनी सातत्याने हिंदू समाजाच्या अस्मितेवर घाला घातला. इथली अनेक मंदिरे उध्वस्त केली. तरी हिंदू समाज प्रमुख ठिकाणे वाचविण्यासाठी विविध मार्गांनी लढत राहिला. प्रभू श्रीरामाने स्वतःच्या आयुष्यात केवळ १४ वर्षांचा वनवास भोगला होता. मात्र त्यांचे प्रत्यक्ष जन्मस्थळ मंदिर ताब्यात घेण्याच्या परकी आक्रमकांच्या प्रयत्नामुळे तब्बल ४९२ वर्षे प्रभू रामचंद्रांना हा नवीन वनवास भोगावा लागला.

इसवी सन १५२८ मध्ये मुघल आक्रमक बाबराने अयोध्येतील सम्राट विक्रमादित्याने बांधलेले श्रीरामजन्मभूमी मंदिर तोडून तेथे सेनापती मीर बाकी याच्या हस्ते मशीद बांधण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यावेळी हिंदू राजा नसल्याने स्थानिक साधू संतांनी सातत्याने विरोध सुरू ठेवला. ही तथाकथित मशीद बाबरच्या काळात कधी पूर्ण झाली नाही. कारण दिवसा भिंत बांधून झाली की त्याच रात्री ती पडायची. हे सतत अनेक वर्षे चालले. त्यामुळे आक्रमक बाबरच्या सैनिकांच्या मनात प्रभू श्रीरामाच्या ताकदीची दहशत बसली. अखेर अयोध्येतील साधू समाजासोबत आक्रमक बाबराने समझोता केला आणि या स्थळावर कधी नमाज पढला जाणार नाही असे कबुल केले. त्यामुळे आजतागायत या स्थळावर एकदाही नमाज पढला गेलेला नाही. मात्र बाबराने या हिंदू मंदिराचा ताबा पूर्णपणे हिंदूंना परत दिला नाही.

इंग्रजांनी दोन्ही समाजात फूट पडण्याच्या इराद्याने या श्रीरामजन्मभूमी स्थळाला “बाबरी मशीद” म्हणणे सुरू केले. मात्र याठिकाणी आजवर एकदाही नमाज पढला गेलेला नाही. इंग्रजांच्या काळापासून श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी न्यायालयीन लढाईदेखील सुरू झाली.

श्रीरामलल्ला प्रकट झाले

१९४९ मध्ये अचानक एके दिवशी श्री रामजन्मभूमीवरच्या ढाच्यात श्रीरामलल्ला मूर्तिरूपाने प्रकट झाले. लगेच नेहरू सरकारने श्रीरामजन्मभूमीला टाळे ठोकले. १९८६  मध्ये जिल्हा न्यायालयाने श्रीरामजन्मभूमीची कुलूपे उघडल्यानंतरही हिंदूंना जागेचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे १९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेने श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाची घोषणा केली.

ऐतिहासिक आंदोलन

पूज्य श्री.अशोकजी सिंघल यांच्या नेतृत्वाखाली विश्व हिंदू परिषदेचे श्रीरामजन्मभूमी आंदोलन हा एक स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे. खेड्यापाड्यात झालेले श्रीराम शिलापूजन, १९९० मध्ये धर्मसंसदेने आयोजित केलेली कारसेवा, मुलायम सिंग यांच्या सरकारने पोलिसांकरवी कारसेवकांवर केलेला अंदाधुंद गोळीबार आणि हजारो हिंदूंचे गोळीबारात पडलेले बळी, बाबरीच्या घुमटावर चढून तिथे भगवा ध्वज लावणाऱ्या कोलकात्याच्या कोठारी बंधूंना अयोध्येतल्या आश्रमातून खेचून बाहेर काढून त्यांच्या डोक्यात पोलिसांनी गोळ्या घालणे, १९९० मध्ये भारतीय जनता पक्षाने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली काढलेली सोमनाथ ते अयोध्या श्रीराम रथयात्रा अशा अनेक महत्वपूर्ण घटना या आंदोलनाने पहिल्या.

दि.६ डिसेंबर १९९२रोजी अयोध्येत दुसऱ्या कारसेवेच्यावेळी पुन्हा लाखो हिंदू एकत्र झाले. कारसेवेद्वारे साधुसमाजाचे श्रीरामजन्मभूमी स्थळी पूजन सुरू असतानाच अनावर झालेल्या हिंदू समाजाने बाबरी ढाचा केवळ पाच तासात उध्वस्त केला. साहजिकच या घटनेचे राजकीय पडसाद उमटले आणि देशभरातील अनेक राज्यातील भारतीय जनता पक्षाची सरकारे केंद्रातील काँग्रेस सरकारने बरखास्त केली. रा.स्व.संघ आणि विश्व हिंदू परिषद यांच्यावर केंद्र सरकारने अन्याय्य बंदी घातली.

त्यानंतरही केंद्रातील काँग्रेस सरकारने श्रीरामजन्मभूमीचा ताबा हिंदूंकडे दिला नाही. न्यायालयीन लढाई सुरूच राहिली. 1999 मध्ये सत्तेत आलेल्या मा.श्री.अटलबिहारी वाजपेयी यांनी पुरातत्व खात्याला या जागेचे पुरातत्व सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या सर्वेक्षणातून या ठिकाणी पूर्वापार मंदिर असल्याचे आणि मंदिर पाडून तेथे बाबरी ढाचा उभारल्याचे सिद्ध झाले. सर्वोच्च न्यायालयाने श्रीरामजन्मभूमीच्या बाजूने नुकत्याच दिलेल्या निकालात या सर्वेक्षणाचे महत्व अनन्यसाधारण ठरले.

आज ४९२ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रभू श्रीराम अयोध्येतील आपल्या मूळ जागी परतत आहेत. जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली जाईल अशी ही घटना आहे. १४ वर्षांनी अयोध्येत परतणाऱ्या प्रभू श्रीरामांचे अयोध्यावासियांनी दिवाळी साजरी करून स्वागत केले होते. आता ४९२ वर्षांनी आपल्या मूळ जन्मस्थळी परतणाऱ्या प्रभू श्रीरामांचे स्वागत करताना आपण देशभरात दिवाळी साजरी केली पाहिजे.

जागतिक महत्व

जगभरात विविध देशात आक्रमकांच्या खुणा पुसण्याचा त्या या देशातील जनतेचा आणि सरकारांचा प्रयत्न असतो. इस्रायलमध्ये, युरोपमध्ये, पूर्व आशियात, दक्षिण अमेरिकेत आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या मूळ वास्तू परत उभारून त्यांचे जतन करणे आणि पळवून नेलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळवणे याला महत्व दिले गेले आहे. जगभरात प्रत्येक समाज स्वतःची सांस्कृतिक अस्मिता जतन करण्यावर भर देतो. भारतातही रस्त्यांना दिलेली इंग्रजांची नावे आणि त्यांचे पुतळे स्वातंत्र्यानंतर तातडीने हटविले गेले. सरदार पटेलांच्या आग्रहाखातर भगवान श्री सोमनाथाच्या मंदिराचीही पुन्हा उभारणी केली गेली. त्यानंतर मात्र काँग्रेस सरकारने सातत्याने हिंदूंना धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगाआड दाबून ठेवले.

स्वतःची अस्मिता जपणाऱ्या आणि संस्कृती जतन करणाऱ्या समाजाला जागतिक राजकारणात आपोआप वजन प्राप्त होत असते. हिंदूंनी स्वतःची अस्मिता धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगाआड लपविल्याने जगात भारताची किंमत शून्य होती. मात्र गेल्या काही वर्षात भारतीय समाज स्वतःची अस्मिता उघडपणे मिरवू लागला आणि त्याचा परिणाम म्हणून भारताचे जागतिक राजकीय महत्व वाढत असलेले आपण अनुभवत आहोत. भारतीयांच्या या अस्मिता जागरणात श्रीरामजन्मभूमी मंदिर चळवळीचे फार मोठे योगदान आहे.

भारताच्या भविष्यात श्रीरामजन्मभूमीचे महत्व

श्रीराममंदिर उभारणीनंतर भविष्यात भारताकडे एक ताकदवान, सुसंस्कृत आणि सदैव प्रवाही समाज म्हणून पहिले जाईल. जगभरातील हिंदू आणि इतर गैर अब्राहमीक संस्कृतीच्या सर्वच समाजांचे अयोध्येतील प्रभू श्रीरामजन्मभूमी मंदिर म्हणजे सांस्कृतिक प्रेरणा ठरणार आहे. इतरांच्या संस्कृतींवर आक्रमण करून त्यांच्या इच्छेविरुद्ध बळाने स्वतःच्या सांस्कृति थोपविणाऱ्या जगभराच्या आक्रमक राजकीय विचारसरणींना श्रीरामजन्मभूमी मंदिर पुनर्निर्माण हे एक तडाखेबंद उत्तर असेल. प्रभू श्रीरामांनी जगजेत्या महाबलशाली रावणाशी लढण्यासाठी सामान्य तरुणांना संघटित करून त्यांची वानरसेना उभी केली. आणि रावणाचा निप्पात केल्यानंतर त्याच्या भावाला बिभीषणाला राज्य देऊन ते अयोध्येला परतले. त्यामुळेच या मंदिरामुळे केवळ हिंदूच नव्हे तर परकी राजकीय आक्रमणाखाली दबल्या गेलेल्या सर्वच संस्कृतींना, समाजांना आणि व्यक्तींना बळ आणि प्रेरणा मिळणार आहे. या कलियुगात भोगवादाची सीमा गाठली गेली असल्याने त्याला उत्तर म्हणूनही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचाच आदर्श कलियुगात समोर ठेवला पाहिजे हे पुराणांमध्ये ऋषी मुनींनी सांगुन ठेवलेले सत्य आहे. अति भोगवादाने अडचणीत आलेला जगभरातील मानव मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या चरणाकडे मार्गदर्शनासाठी वळतो आहे.

आणि म्हणूनच या ५ ऑगस्ट रोजी दुपारच्या अभिजित सुमुहुर्तावर होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या भूमीपूजनाचे महत्व आपणही समजून घेतले पाहिजे. भारताचे आणि भारतीयांचे जागतिक भविष्य उज्वल आहे हे सांगणारी ही ऐतिहासिक घटना आहे. या इतिहासाचे साक्षीदार बनण्याचे भाग्य आपण सर्वांना लाभले आहे. ते यादिवशी घराघरात दिवाळी करून साजरे करूया.

(लेखक विधानसभा सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आहेत.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 1:27 pm

Web Title: special blog on ram temple and its history scj 81
Next Stories
1 BLOG : ‘स्व’-रूपवर्धिनीचे तपस्वी सेवाव्रती ज्ञानेश पुरंदरे
2 BLOG : पुण्यात लॉकडाउन शिथिल पण संसर्गाचा धोका !
3 Jaanu Movie Review : १७ वर्षांच्या विरहानंतरच्या एका रात्रीची कथा
Just Now!
X