25 November 2020

News Flash

Surgical Strike 2: बालाकोटचा प्रवास, शीखविरोधी जिहादी चळवळ ते दहशतवाद्यांचे तळ

Surgical Strike 2: २००१ नंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधात अमेरिकेने मोहीम सुरु केली आणि शेवटी 'जैश'ने दहशतवादी प्रशिक्षण तळ अफगाणिस्तान बाहेर नेण्याचा निर्णय घेतला.

संग्रहित छायाचित्र

Surgical Strike 2: पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारताच्या हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे बालाकोट हा सीमेलगतचा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वी या भागात सर्वप्रथम महाराजा रणजीत सिंगांच्या नेतृत्वाखालील शीखांच्या साम्राज्याविरोधात जिहादी चळवळ सुरु झाली. बालाकोटची ती जिहादी चळवळ ते सध्याच्या दहशतवादी कारवायांपर्यंतच्या प्रवासाचा घेतलेला आढावा…

महाराजा रणजित सिंग यांच्याविरोधात जिहादी चळवळ
खैबर पख्तुनवा प्रांतात येणाऱ्या बालाकोट या भागात १७९९ पासून रणजित सिंग यांच्या नेतृत्वाखाली शीखांची सत्ता होती. त्यावेळी या भागातील मुस्लिमांचे प्रमाण ८० टक्के, शीखांचे आणि हिंदुंचे प्रमाण प्रत्येकी १० टक्के इतके होते. मुस्लिमांची संख्या जास्त असूनही हा भाग शीख साम्राज्याचा भाग होता. शीखांचे साम्राज्य संपवण्यासाठी सय्यद अहमद बरेलवी आणि शाह इस्माइल यांनी याच भागातून जिहादी चळवळीला सुरुवात केली.  शीखांच्या साम्राज्याला आव्हान देण्यासाठी सय्यद अहमद यांनी जिहादींची फौज उभी केली यामध्ये पश्तुनींचाही समावेश होता. १८३१ मध्ये या जिहादींमध्ये व शीखांच्या सैन्यामध्ये बालाकोटमध्ये लढाई झाली. या लढाईत सय्यद बरेलवींसह सगळे जिहादी मारले गेले. नंतर पंधरा सोळा वर्षात शीख साम्राज्य लयाला गेले व ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली हा भाग आला. फाळणीनंतर झिया ऊल हक यांच्या कार्यकाळातही या भागातून दहशतवादी कारवाया सुरु असायच्या.

जैश- ए- मोहम्मदचे तळ

२००१ पूर्वी जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ अफगाणिस्तानमध्ये होते. तालिबानशी मसूद अझहरची जवळीक असल्याने प्रशिक्षण केंद्रही अफगाणिस्तानमध्ये होते. मात्र, २००१ नंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधात अमेरिकेने मोहीम सुरु केली आणि शेवटी ‘जैश’ने दहशतवादी प्रशिक्षण तळ अफगाणिस्तान बाहेर नेण्याचा निर्णय घेतला. ‘जैश’साठी नवीन तळ शोधण्याची जबाबदारी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडे होती. पाकिस्तानमध्ये लष्कर- ए- तोयबा सक्रीय होती. ‘लष्कर’ची पाकमध्ये मजबूत पकड होती. ‘लष्कर’ला आव्हान निर्माण करण्याची आयएसआयची इच्छा नव्हती. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरपासून जवळ असलेल्या मानसेहरा जिल्ह्याची निवड करण्यात आली. बालाकोट हा भाग मानसेहरा जिल्ह्यातच येतो.

भौगोलिक महत्त्व

मानसेहरा या भागात १९९० पासूनच दहशतवादी संघटनांचे तळ होते. इस्लामाबादपासून हा भाग जवळ असून इस्लामाबादवरुन या भागात अवघ्या चार तासांमध्ये पोहोचता येते. या भागात दहशतवादी संघटनांना आश्रय देण्यात पाकिस्तानमधील सरकारी यंत्रणांचा देखील हात असल्याचे सांगितले जाते. पाकव्याप्त काश्मीरपासून जवळ पण खैबर पख्तुनवा प्रांतात येत असल्याने या भागाला भौगोलिक महत्त्व देखील आहे.

२००५ मधील भूकंप
२००५ मध्ये पाकव्याप्त काश्मीर भूकंपाने हादरले होते. मुझफ्फराबाद येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि भूकंपामुळे बालाकोट हा परिसर अक्षरश: उद्ध्वस्त झाला होता. मात्र, यानंतर हाफिज सईदच्या जमात – उद- दावा या संघटनेने परिसरात मदतकार्य राबवत स्थानिकांमध्ये संघटनेचे जाळे विणले. या भागात मदत कार्य राबवण्यासाठी हाफिज सईदला सौदी अरेबियातून पैसे आले होते, असे सांगितले जाते. यामुळे जैश- ए- मोहम्मद ही संघटना काही काळ पिछाडीवर गेली. मात्र, यानंतर हाफिजने या भागातून माघार घेतली आणि पुन्हा एकदा जैशने या भागात वर्चस्व निर्माण केले.

१० हजार दहशतवाद्यांना एकाच वेळी प्रशिक्षण
या भागातील दहशतवादी तळांची संख्या पाहता या भागात एकाच वेळी एकूण १० हजार दहशतवाद्यांना एकाच वेळी प्रशिक्षण दिले जाऊ शकते, असे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे. मसूद अझहरच्या देखरेखीखाली या तळांवर प्रशिक्षण दिले जाते. मसूदचा मेहुणा युसूफ अझहरकडे या तळांवरील प्रशिक्षणाची जबाबदारी होती, असे समजते. या भागात दहशतवादी संघटनांचे प्रशिक्षण तळ, कंट्रोल रुम आहेत. याच बालाकोटमधील तळांवर बसून अनेक हल्ल्यांचे कट रचले गेले, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मंगळवारी झालेल्या भारताच्या दुसऱ्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये याच युसूफ अझहरचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 5:09 pm

Web Title: surgical strike 2 history journey of pakistan balakot jihadi movement to terrorist base
Next Stories
1 Surgical Strike 2: सगळ्या बातम्यांवर एक नजर
2 देशाच्या आत्मसन्मानासाठी जे करायला हवं ते आपण केलं : कमल हसन
3 Surgical Strike 2: जणू काही ज्वालामुखीच फुटला असं वाटलं, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अनुभव
Just Now!
X