संदीप पाटणकर
डॉक्टर तुमच्यासाठी या आंब्याच्या पेट्या आणल्या आहेत. कोरडे धन्यवाद मला देता येत नाहीत. गेले वर्षभर हजारो करोना रुग्णांवर स्वतः चा जीव पणाला लावून तुम्ही उपचार करत आहात. त्यामुळेच तुम्हा सर्वांना आंब्याच्या पेट्या भेट देण्यासाठी घेऊन आलो आहे… संदीपच्या या वाक्याने हॉस्पिटलमधील उपस्थित डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांना भरून आले… प्रसंगच तसा होता… या प्रसंगाचा साक्षीदार होण्यात तसेच मदतीत खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य मला लाभले.

करोनाच्या गेल्या वर्षभरात म्हणजे पहिली लाट व आताच्या दुसऱ्या लाटेत डॉक्टर, परिचारिका तसेच आघाडीचे आरोग्य सेवक जीवाची बाजी लावून लढत आहेत. आपल्याला करोना होईल की नाही याची पर्वा न करता अखंड रुग्णसेवा करत आहेत. ठाण्यात राहात असल्याने व मनसैनिक म्हणून काम करत असताना ठाणे जिल्हा रुग्णालय तसेच ठाणे महापालिका तसेच खासगी रुग्णालयात रुग्णांना मदत करताना अनेक प्रकारचे अनुभव येत होते. मानवी स्वभावाचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळत होते. शुक्रवारी ठाणे जिल्हा रुग्णालयात जे चित्र दिसले ते खरच सुखावणारे होते. माणुसकीच आगळंच दर्शन झाले.

तसा आमचा ठाणे नौपाडा येथील ” घंटाळी नाका ” अशा उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. आरोग्य क्षेत्रापासून वेगवेगळ्या प्रकारे अनेकांना येथून मदत मिळत असते… असेच त्या दिवशी आम्ही मित्रमंडळी गप्पा मारत होतो. लोकसत्ताचे सहयोगी संपादक संदीप आचार्य आमच्या नाक्यावरचे अनेक दशकांचे मेंबर… संस्थापक सदस्यांपैकी एक! आरोग्य क्षेत्रात या माणसाने केलेल्या मदतीची शेकडोंनी नव्हे तर हजारोंनी उदाहरणे सांगता येतील. गेले वर्षभर असा एकही दिवस गेला नसेल की संदीपकडे कोणी मदत मागितली नसेल. रोज कोणी रुग्णालयात बेडसाठी फोन करतो, कुणाला औषध हवे असते तर कुणाला हॉस्पिटलचे बिल कमी करून हवे असते. रक्त पाहिजे असले की सर्वांनाच संदीप आचार्यची आठवण होत असते. करोनातही प्लाझ्मा मागणारे अनेक होते. पुढे रेमडेसिवीर मागणारे फोन रोजच खणखणत होते. टोसिलोझुमॉब पासून ऑक्सिजनपर्यंत मदतीसाठी अखंड फोन असायचे. आमच्या नाक्यावरचा प्रत्येकजण या गोष्टीचा साक्षी आहे. नाक्यावरच्याही अनेकांना त्याने मदत केली… मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत कुठूनही त्याला मदतीसाठी फोन यायचे… हाही पठ्ठ्या लगेच फोन वर फोन करून मदत करायचा.. जरा मोकळा झाला की मग आमचा नाका वडापाव, सामोसा, चहापासून मिळेल त्यावर ताव मारायचा… खाता खाता फोन आला की खाणं बाजूला राहायचे, लगेच मदतीसाठी फोन सुरु व्हायचे. मदत मिळाली याची खात्री पटली की लगेच वडापाव वर ताव मारण्याचे काम सुरु!

त्या दिवशी ठाण्याचे सिव्हिल सर्जन डॉ कैलास पवार यांना संदीपने कोणा तरी पेशंटसाठी फोन केला होता. त्यानंतर आमच्या गप्पा सुरु होत्या अचानक संदीप बोलू लागला…अरे आपण डॉक्टरांना सारखे पेशंटला मदत करायला सांगतो. मदत केली की थँक्स म्हणतो, हे काही खरं नाही. या डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. काही कल्पनांवर विचार झाला. अचानक आंबे वाटायची कल्पना पुढे आली. मलाही ती आवडल्याने मी उचलून धरली. मी एक बघितले,,, एखादी गोष्ट संदीपच्या डोक्यात आली की क्षणाचाही विचार न करता झपाटल्यागत कामाला लागतो आणि काम झाले की मगच दम घेतो….त्या दिवशी म्हणजे परवा त्याला आंबे देण्याची कल्पना भावली. लगेच त्याने ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांना फोन करून रुग्णालयात किती डॉक्टर व कर्मचारी काम करतात असे विचारायला सुरुवात केली. करोनाच्या लढाईतील आघाडीच्या डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांसाठी मला हापूस आंब्याच्या १०० पेट्या द्यायच्या आहेत व उद्याच मी त्या देणार आहे, असे संदीपने सांगून टाकले. किती पैसे लागतील? कुठून पैसे आणायचे असले फालतू प्रश्न अशावेळी त्याला कधीच पडत नाहीत. लगेच त्याने नाक्यावरच्या प्रदीप भावेला २५ हजार रुपये द्यायला सांगितले. पाठोपाठ काही मित्रांना फोन करून पाच दहा हजार द्यायला फर्मावले. कैलास पाटीलने १० हजार पाठवून दिले. लगोलग संदीप आमच्या नाक्यावरील आंबेवाल्यांकडे गेला आणि शंभर पेट्यांची ऑर्डर देऊनही टाकली…. अर्थात यासाठीचा पेटीचा दर संदीपच ठरवणार!!!! कारण त्याचा खाक्याच असा आहे की त्याने एकदा सांगितले की ‘चर्चा नाही’!

आंबेवाल्यानेही प्रेमाने ( आता संदीप ने सांगितल्यावर ‘प्रेमाने’च सारे काही करावे लागते) आंबे देण्याचे मान्य केले. त्यानंतर सकाळीच आंबे भरताना लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्याने माझ्यावर व प्रदीप भावेवर सोपवली. दुपारपर्यंत १०० पेट्या भरून झाल्या. तोपर्यंत अन्य कामे संपवून संदीप नाक्यावर आला. पाठोपाठ नाक्यावर उपस्थित असलेल्या सर्वांना उदय पाटलाच्या गाडीत बसायला सांगितले. बंडुकाका, अभय कुलकर्णी आदी गाडीत बसले. संदीपने स्वत: बाईक काढली. आम्ही सर्वजण आंबे भरलेल्या टेम्पोसह ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. नाक्यावरून निघताना सिव्हिल सर्जन डॉ कैलास पवार यांना फोन करून येत असल्याचे न विसरता सांगितले. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आम्ही आंब्याच्या पेट्या सिव्हिल सर्जन डॉ पवारांच्या दालनात नेऊन ठेवल्या. तशा स्पष्ट सूचना संदीपने दिल्याच होत्या.

डॉ कैलास पवार यांच्या दालनात आंब्याच्या पेट्या ठेवण्यातही संदीपचा विशिष्ट दृष्टिकोन होता. या पेट्या पाहून तरी येथे मदत घेणारी व्हीआयपी मंडळी लाजेकाजेस्तव डॉक्टरांना व रुग्णालयाला काही मदत करतील किंवा अन्य लोकांना आगामी काळात तरी डॉक्टर व आरोग्य सेवकांना मदत करण्याची बुद्धी होईल. संदीपचा हा दृष्टीकोन आम्हालाही भावला. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसात अनेक तथाकथित व्हीआयपी व राजकीय नेते आणि त्यांच्या नातलगांनी आपले लसीकरण ‘व्हीआयपी’ असल्याच्या थाटात करून घेतले आहे. अनेक नेत्यांनी आपल्या पेशंटसाठी रात्रीअपरात्री डॉक्टरांना त्रास दिला आहे…देत आहेत.. यातील बहुतेकांनी कधी कोरडे धन्यवादही डॉक्टरांना दिले नाहीत, मदत तर खूप दुरची गोष्ट आहे. या सर्वांचा दृष्टिकोन बदलावा व त्यांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना तेथील अन्य कर्मचाऱ्यांना काही मदत करावी ही संदीपची यामागची भूमिका आहे.

आजपर्यंत अनेकांनी रुग्णालयात मास्क, पीपीई किट आवश्यक वैद्यकीय उपकरणे वगैरे दिले आहेत. परंतु डॉक्टर व आरोग्य कर्मचार्यांसाठी त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करून एखादी गोष्ट दिली असे क्वचितच घडले असेल. डॉक्टर व संदीप यांचे एक घट्ट नाते आहे. एक चांगला व मोठा पत्रकार असूनही तो कोणाशीही सहज संवाद साधतो व आपलासा करतो. तसं तो वेळोवेळी डॉक्टरांना काही ना काही देत असतो. त्याची डॉक्टरांबरोबरची केमिस्ट्री समजण्यापलीकडची आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात आम्हाला या केमिस्ट्रीचे दर्शन घडले. रुग्णालयात केलेले बदल… ऑक्सिजनचे उभारलेले प्लांट संदीपने बघावे म्हणून डॉक्टर त्याला थेट खाली सोडायला आले आणि रुग्णालय दर्शन घडवले. संदीपही यातच रमणारा पत्रकार आहे. नाक्यावरच्या गप्पातही आरोग्याचा विषय निघाला नाही असा एकही दिवस गेला नसेल. तसं पाहिले तर राजकारणावर बोलण्यासारखे त्याच्याकडे भरपूर काही आहे. कारण बहुतेक सर्वच पक्षाच्या वरिष्ठ राजकीय नेत्यांशी त्याचे घनिष्ठ संबंध आहेत. तरीही संदीप रमतो तो रुग्णालय व डॉक्टरांबरोबरच! ठाणे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व वॉर्डबॉय यांच्यासाठी म्हणूनच सहजपणे १०० आंब्याच्या पेट्या देणारा आणि त्यामागचा दृष्टिकोन उलगडून सांगणार संदीप हे एक अनोखे रसायन म्हणावे लागेल… अॅक्टिव्हिस्ट जर्नालिस्ट म्हणजे काय हे जर कुणाला समजून घ्यायचे असेल तर त्याने संदीपला भेटलेच पाहिजे.