– प्रथमेश दीक्षित

भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये तुम्हाला दोन प्रकार दिसतील. एक म्हणजे सचिन तेंडुलकरला मानणारे आणि दुसरा….दुसरा असा प्रकारचं नसतो. आजही भारतातल्या बहुतांश क्रिकेट प्रेमींसाठी सचिन तेंडुलकर हा देव आहे. आजही तुम्ही घरातल्या मोठ्या माणसांना विचारुन पाहा, सचिन निवृत्त झाल्यानंतर आम्ही क्रिकेट पाहणं सोडून दिलंय असं उत्तर देणारा एकतरी तुम्हाला सापडेलच. सचिनने आजवर अनेक विक्रम रचले, अनेक विक्रम मोडीत काढले. त्यामुळे भारतासह जगभरातील चाहत्यांच्या मनात त्याचं स्थान अढळ आहे, तो एका प्रकारे ध्रुवताराच आहे असं म्हणा ना.

मात्र विराट कोहली आल्यानंतरर त्याची साहजिकपणे सचिनशी तुलना होऊ लागली. ती होणं साहजिकचं आहे म्हणा, कारण विराटचा खेळ आहेच तसा. मध्यंतरी सचिनला एका कार्यक्रमात प्रश्न विचारला होता की तुझे विक्रम कोणी मोडेल असं वाटतंय का? त्यावेळी सचिनने विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन खेळाडूंची नावं घेतली होती. आजही सोशल मीडियावर सचिनची जागा कोणताही खेळाडू घेऊ शकणार नाही, असं म्हणणारा एक वर्ग सापडेल. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी ही लोकं विराटच्या आक्रस्ताळ्या स्वभावाचा दाखला देतात. मात्र यात काही फारसं तथ्य नाही. विंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात सचिनचा सर्वात जलद १० हजार धावांचा विक्रम विराटने मोडला. गेल्या काही दिवसांमधला विराटचा खेळ पाहता त्याची वाटचाल ही प्रतिसचिन बनण्याकडे आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

अनेकांना आताही मी विराटची सचिनशी केलेली तुलना रुचणार नाही, आणि ते साहजिकच आहे. आपल्या मनाच्या कोपऱ्यात आपण ज्या खेळाडूला स्थान दिलेलं असतं त्याची जागा कायम रहावी असं प्रत्येकाला वाटतं. सचिनने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम २०० धावा झळकावल्या. यानंतर त्याचा सहकारी विरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजवरुद्धच्या सामन्यात त्याचा विक्रम मोडला होता, मलाही त्यावेळी विरेंद्र सेहवाग आऊट व्हावा असं वाटतं होतं. मात्र कोणी कितीही वाद-विवाद केले, तरीही विराटने भारतीय क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय यात काहीच वाद नाही.

मध्यंतरी विराट कोहली – अनिल कुंबळे यांच्यातील वादामुळे विराटला टीकेचा धनी व्हायला लागलं होतं. दोघांच्या भांडणामध्ये कुंबळे यांना प्रशिक्षक पदावरुन पायउतार व्हावं लागलं, यानंतर रवी शास्त्री यांना प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आजही अनेक चाहत्यांच्या मनात याबद्दल राग आहे. मात्र विराट या सर्व गोष्टींमुळे डममगलेला तुम्हाला दिसणार नाही. तो शेवटपर्यंत आपल्या गोष्टीवर ठाम राहिला. ज्या प्रमाणे अनिल कुंबळेंची काही बाजू होती, त्याप्रमाणे विराट कोहलीचीही काही बाजू असुच शकते असं आपल्यापैकी किती जणांनी विचार केला असेल….असो तो आताचा मुद्दा नाही.

कर्णधार या नात्याने विराट कोहली अजुनही अपरिपक्व आहे असं माझं ठाम मत आहे. संघाची निवड, मैदानात गोलंदाजांचा योग्य वापर करणं, डीआरएसचे चुकीचे अंदाज अशी अनेक उदाहरणं देता येतील. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये विराट ज्या पद्धतीने फलंदाजीत भारतीय संघाची धुरा सांभाळतो आहे, त्याला तोड नाही. इंग्लंड दौऱ्यात भारतीय फलंदाजीचा बोऱ्या वाजला, मात्र विराटने एका बाजूने भारताची बाजू लावून ठेवली होती. प्रत्येक सामन्याआधी कसून सराव, फिटनेसकडे असणारं लक्ष विराटच्या या सर्व गोष्टींचं कौतुक करावं तितक कमीच आहे. बरं त्याची फलंदाजी ही रावडी प्रकारात मोडणारी नाहीये, प्रत्येक गोलंदाजाचा तो समर्थपणे मुकाबला करुन तंत्रशुद्ध फटके खेळतो.

कदाचीत विराट कधीच चांगला कर्णधार होऊ शकणार नाही, कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमत नाही. सचिनने आपल्या फलंदाजीने अनेकांची भंबेरी उडवली, मात्र कर्णधार या नात्याने सचिनची कामगिरी यथातथाच होती. भारतीय चाहत्यांना प्रत्येक क्रिडा क्षेत्रात एका दैवताची गरज असते, गेली काही वर्ष सचिनने हे काम केलं. यापुढे हे काम विराट कोहलीची बॅट करेल यात काहीच शंका नाही. पुढच्या सर्व सामन्यांसाठी विराटला शुभेच्छा !!

  • आपल्या प्रतिक्रीया prathmesh.dixit@indianexpress.com या इमेल आयडीवर जरुर पाठवा.