राज ठाकरेंच्या प्रश्नांना उत्तरं देणं त्यांची भ्रष्ट नक्कल करण्याइतकं सोपं नाही!

राज ठाकरेंच्या एकाही प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपच्या अन्य कोणत्याही नेत्याने दिलं नाही

संग्रहित छायाचित्र

– कीर्तिकुमार शिंदे

इतिहासात अशी स्थिती वारंवार निर्माण होत असते की, जेव्हा तुम्हाला योग्य बाजूची निवड करावी लागते. इंग्रजीत यासंदर्भात एक खूप चांगला वाक्प्रचार आहे :right side of the history! इथे ‘right’ side म्हणजे उजव्या विचारांची किंवा मूलतत्त्ववादी विचार करणारी बाजू नव्हे, तर योग्य, न्याय्य बाजू असा अर्थ अपेक्षित असतो.

परवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं भाषण आणि गेल्या काही वर्षांत त्यांनी सातत्याने मांडलेल्या राजकीय भूमिका पाहिल्या, तर आपण ‘इतिहासाच्या योग्य बाजूला’ right side of the history असलं पाहिजे, याचं भान त्यांना असल्याचं दिसून येतं.

आपल्या देशातल्या राजकीय विचारांच्या परिभाषेत राज हे निश्चितच ‘उजवे’ गणले जातात. याचं कारण त्यांचं शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना यांच्याशी असलेलं नातं. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरेसुद्धा आक्रमक, जहाल भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. फक्त फरक इतकाच की २००६मध्ये शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर राज यांनी एकदाही कट्टर हिंदुत्ववादी म्हणजे अर्थातच मुस्लिमविरोधी भूमिका घेतलेली नाही. एक समाज म्हणून हिंदू मुस्लिम मराठा दलित अशा सर्वांनी एकत्रच असायला हवं, असं ते नेहमी त्यांच्या भाषणात सांगतात. अर्थातच, त्यांचा उत्तरभारतीयांना आणि हिंदी वर्चस्ववादाला ठाम विरोध आहे, आणि त्यामुळेच मनसेने आजवर अनेकदा उत्तर भारतीयांविरोधात हिंसक आंदोलनंसुद्धा केलेली आहे. त्यामुळे, बाळासाहेबांप्रमाणे‘विरोधाचं राजकारण’ राजसुद्धा करत असले तरी त्यांच्या विरोधाला धार्मिक किंवा जातीय द्वेषाची किनार नाही, हे मान्य करावं लागेल. मनसेचा उत्तर भारतीयांना असलेला विरोध हा थेट मराठी भूमिपुत्रांच्या रोजगाराशी आणि व्यवसायाच्या संधींशी तसंच हिंदीभाषिकांच्या सांस्कृतिक दहशतवादाशी थेट संबंधित असल्याचंही राज यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर केला होता. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, असं मत त्यांनी जाहीरपणे मांडलं होतं. २०१६ उजाडलं तेव्हा मात्र राज ठाकरे मोदींच्या राजकीय निर्णयांना जाहीर विरोध करू लागले. गुजरात भेटीत मला विकासाचं खोटं चित्र दाखवलं गेलं, या शब्दांत त्यांनी आपण मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊन चूक केली, हेसुद्धा कबूल केलं. नोटाबंदी असो की सोशल मीडियावरून केला जाणारा विखारी प्रचार राज यांनी भाजपविरोधात आपली तोफ डागायला सुरुवात केली. नंतरची सलग तीन वर्षं राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर राजकीय टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. स्वत: एक व्यंगचित्रकार असल्यामुळे आपल्या कुंचल्याचा वापरही राज यांनी मोदी-शहा यांच्याविरोधात केला. मोदी-शहांच्या विरोधात राज यांनी काढलेली व्यंगचित्रं भाजपला इतकी टोचली की, भाजपच्या ट्रोल्सनी राज यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर असभ्य भाषेत टीका केली, तीही अनेकदा. राज यांनी कोणतंही मत, विशेषत: भाजपविरोधात एखादं मत व्यक्त केलं की त्यांच्यावर ‘बोलघेवडा पोपट’अशी टीका हे ट्रोल करू लागले. भाजपची आयटी सेल किंवा ट्रोल्स फक्त असभ्य टीका करून थांबले नाहीत, तर त्यांनी राज यांच्याच व्यंगचित्रांची भ्रष्ट नक्कल करून राज यांच्यावर पलटवारसुद्धा केला. अर्थात, हे भाजपच्या आयटी सेलचं कल्पनादारिद्र्यच म्हणावं लागेल! महत्वाची गोष्ट अशी की, राज यांनी काढलेली ही व्यंगचित्रं फक्त मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा मराठी माणसांमध्येच लोकप्रिय झाली नाहीत, तर मोदींना विरोध करणारे डावे, समाजवादी, आंबेडकरवादी अशा सर्वांनाच ती भावतात, कारण त्या व्यंगचित्रांमध्ये आपल्याच भावनांची, विचारांची अभिव्यक्ती होते, असं त्यांना वाटतं. व्यंगचित्रकार राज यांची खिल्ली उडवण्यासाठी सोशल मीडियावरच्या भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना ‘राजू पेंटर’ असं नावसुद्धा ठेवलं.

जाहीर सभा असोत की व्यंगचित्रं, राज ठाकरे गेली तीन वर्षं भाजप सरकारचे आणि त्यातही विशेष करून नरेंद्र मोदी यांचे आपल्या ठाकरी शैलीत वाभाडे काढत आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून राज यांनी जितकी भाजप सरकारवर टीका केली, तितकी टीका महाराष्ट्रातील काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने केलेली नाही. यासंदर्भात राज यांची तुलना फक्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किंवा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्याशीच होऊ शकते.

आता या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १३व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा आपण विचार करू.

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार का… लढवणार तर कांग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत सहभागी होणार का… मनसेच्या वाट्याला कोणत्या जागा येणार… का मनसे निवडणूक लढवणार नाही पण भाजपविरोधात महाआघाडीला पाठिंबा जाहीर करणार… राज ठाकरे शरद पवारांसोबत प्रचाराच्या संयुक्त जाहीर सभांत भाषणं करणार का… अशा एक-ना-अनेक प्रश्नांची उत्तरं राज ठाकरेंच्या भाषणातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना, सर्वसामान्य जनतेला आणि प्रसारमाध्यमांनाही अपेक्षित होती. आपल्या अनप्रेडिक्टेबल स्वभावाला अनुसरून राज ठाकरे यांनी वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं नाही. पक्षकार्यकर्त्यांना, लोकांना किंवा पत्रकारांना आपल्याकडून जे ऐकायचं आहे, ते त्यांना न ऐकवता; आपल्याला लोकांसमोर जे मांडायचं आहे, जे विचार- जी माहिती आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, तेच विचार- तीच माहिती राज यांनी आपल्या भाषणातून मांडली, आपल्या नेहमीच्या मिश्किल आणि रोखठोक शैलीत.

आपल्या भाषणाची सुरुवातच राज यांनी “लोकांची स्मरणशक्ती कमी असते. अगदी वर्तमानपत्राच्या संपादकांनाही पाच-सहा दिवसांपूर्वीची बातमी आठवत नाही. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत काय काय करून ठेवलंय याची मी आठवण करून देणार आहे’असं सांगत केली. राज यांचं हे भाषण काळजीपूर्वक ऐकल्यास त्यात ‘भाजप सरकारने केलेल्या चुकांची’आठवण करून देणारे किमान ३० मुद्दे आढळतात. काही मुद्दे त्यांनी सविस्तरपणे मांडले, तर काहींना फक्त स्पर्श केला. राज यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याबाबत किंवा उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत या लेखात विस्तारभयास्तव विचार करता येणे शक्य नाही.

आपल्या भाषणात राज यांनी उपस्थित केलेला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे, “या देशात कोण राष्ट्रभक्त आहे, आणि कोण राष्ट्रभक्त नाही, हे ठरवण्याचा अधिकार नरेंद्र मोदी आणि भाजपला कोणी दिला?” मला वाटतं, हा प्रश्नच राज यांच्या संपूर्ण भाषणाचा मुख्य गाभा होता.

राज ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्याला संदर्भ आहे तो, त्यांनीच ‘युद्ध नको’ यासाठी लिहिलेल्या खुल्या पत्राचा. या पत्रात राज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान ‘श्री. इम्रान खान’ ह्यांनी केलेल्या ‘चर्चेतून मार्ग’ काढण्याच्या आवाहनाचं स्वागत केलं होतं. ह्या पत्रानंतर भाजपच्या ट्रोल्सनी राज ठाकरेंच्या विरोधात खूपच असभ्य, खरंतर गलिच्छ शब्दांत टीका केली. “राज ठाकरे हा पाकड्यांचा नवा हिरो आहे” असा प्रचार केला गेला. त्यासाठी पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेल्या बातम्यांचे व्हिडिओज समाजमाध्यमांत धार्मिक विद्वेषाची ‘मीठ-मिरची’ लावून पसरवले गेले.

ज्यांचं मत आपल्या राजकारणाच्या आड येतं, त्यांना राष्ट्रद्रोही ठरवायचं, ही संघ-भाजपची जुनीच नीति आहे. “या देशात राष्ट्रभक्त कोण हे ठरवण्याचा अधिकार भाजपला कुणी दिला”, हा प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी संघ-भाजपने आजवर खोटे आरोप करत ज्या ज्या लोकांना राष्ट्रद्रोही ठरवलं होतं, त्यांचीही बाजू अप्रत्यक्षपणे मांडली. अयोध्येत राम मंदिर बांधणं म्हणजे राष्ट्रभक्ती, काश्मीरमधलं कलम ३७० रद्द करणं म्हणजे राष्ट्रभक्ती, गोमांसबंदी करणं म्हणजे राष्ट्रभक्ती, हिंदीचाच वापर करणं म्हणजे राष्ट्रभक्ती, पाकिस्तानविरोधात युद्ध करणं म्हणजेच राष्ट्रभक्ती अशी संघ-भाजपची धारणा आहे. मुस्लीमविरोध किंवा पाकिस्तानविरोध म्हणजे राष्ट्रीयत्व, म्हणजेच भारतीयत्व, ही जी प्रचाराची एक मोहीम संघ-भाजपने गेली अनेक वर्षं देशात चालवली आहे, त्या प्रचारनीतिलाच राज ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित करून सुरुंग लावला.

भाजपसमर्थक म्हणजे राष्ट्रप्रेमी आणि भाजपविरोधक म्हणजे राष्ट्रद्रोही, ही मांडणी लोकांमध्ये भ्रम निर्माण करणारी आहे, हे अधिक स्पष्ट करण्यासाठी राज ठाकरेंनी मोदी-भाजप सरकारला उद्देशून आणखीही काही अत्यंत मूलभूत प्रश्न विचारले. हे सर्व प्रश्न भाजपच्या आणि अर्थातच, नरेंद्र मोदींच्या तसंच अजित डोवाल यांच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत, हे विशेष. राज यांनी उपस्थित केलेले काही प्रमुख प्रश्न-

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मुलगा शौर्य डोवाल याच्या कंपनीतला एक भागीदार अरब आहे, तर दुसरा पाकिस्तानी आहे. ही भागीदारी भाजपला चालते? हा देशद्रोह नाही? जर दुस-या एखाद्या राजकीय पक्षातील कुणाची अशी पाकिस्तानी व्यक्तीसोबतची भागीदारी असती तर भाजपने कसा थयथयाट केला असता?

२७ डिसेंबर २०१७ अजित डोवाल आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे थायलंडमध्ये भेटले. ह्या बैठकीत नेमकं काय झालं?

विमान निर्मितीचा कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीलाच ‘राफेल’चं कंत्राट का दिलं?

काँग्रेसच्या काळात राफेलची किंमत पाच-सहाशे कोटी होती, ती आता पंधराशे कोटी कशी झाली?

बरोबर निवडणुकांच्याच आधी कसे काय उरी, गुरुदासपूर, पुलवामा यांसारखे हल्ले कसे काय होतात?

या प्रश्नांनंतर, निवडणुका जिंकण्यासाठी पुन्हा एकदा पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल, अशी शंकाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

ही सर्व मांडणी करत असताना राज ठाकरे यांनी दृक-श्राव्य सादरीकरणाचाही अत्यंत प्रभावी वापर केला. राज ठाकरे एकेक मुद्दा मांडत होते, आणि त्या मुद्द्याशी संबंधित फोटो, व्हिडिओ क्लिप्स एका मोठ्या स्क्रीनवर दाखवल्या जात होत्या. पुलवामा हल्ल्यानंतर मोदींचे हसतानाचे फोटो (द टेलिग्राफचं पेज वन) दाखवून मोदी हे किती बेजबाबदार राजकीय नेते आहेत, हे राज यांनी साधार व प्रभावीपणे दाखवून दिलं. “मोदी हे फकीर नसून बेफिकीर आहेत”, असंही राज ठाकरे म्हणाले. भाषणाचा समारोप करताना, बेरोजगारी-शेती-महागाई अशा सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार संपूर्ण अपयशी ठरले असून सैनिकांच्या शौर्याआड स्वतःचं अपयश लपविण्यासाठी आणि भारतीयांच्या देशभक्तीचा फायदा उचलण्यासाठी भाजपचे नेते ‘काहीही’ करू शकतात, असं मत व्यक्त करून राज यांनी सर्वांनाच सावध राहाण्याचं आवाहन केलं.

भाजपचे राजकीय व वैचारिक विरोधक असलेले कडव्या डाव्या पक्षांचे नेते तसंच कांग्रेसचे नेते यांनीही आजवर नरेंद्र मोदी यांच्यावर जशी टीका केली नाही, तशी टीका राज ठाकरे या तथाकथित उजव्या विचारसरणीच्या (rightist) राजकीय नेत्याने केली. हे भाषण सत्ताधारी भाजपला इतकं झोंबलं की, दुस-याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “राज ठाकरे म्हणजे ‘बारामतीचा पोपट’ असून, त्यांच्या भाषणांच्या स्क्रिप्ट या बारामतीहूनच येतात” अशा शब्दांत टीका केली. (राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राज यांचे बोलवते धनी आहेत, हे मुख्यमंत्र्यांना सुचवायचं होतं.) पण राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून जे प्रश्न मोदी-भाजप सरकारला विचारले, त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपच्या अन्य कोणत्याही नेत्याने दिलं नाही!

कारण त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे- भाजपकडे नाहीच आहेत.

राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे त्यांच्या व्यंगचित्रांची भ्रष्ट नक्कल करण्याइतकं कधीच सोपं नसतं!

नाही का?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Criticizing raj thackeray not so easy

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या