scorecardresearch

BLOG: मुनमुनच्या मिसळीइतक्याच ठसकेबाज मावशींचं पर्व संपलं

मुनमुनची मिसळ यापुढेही असेल, जिभेला तिच चव मिळेलही, पण काही तरी चुकल्यासारखं नक्की वाटेल!

छायाचित्र सौजन्य – ट्विटर @AmhiDombivlikar

– योगेश मेहेंदळे

तुझं माझं जमेना, तुझ्याविना करमेना अशी एक मराठीत म्हण आहे. आज ही म्हण आठवायचं कारण म्हणजे डोंबिवली पश्चिमेतील मुनमुन मिसळच्या मुर्डेश्वर मावशींचं झालेलं निधन! डोंबिवलीतल्या हजारो मिसळप्रेमींची मावशींबद्दल असलेली भावना या म्हणीत व्यक्त होते.

या मावशी हे एक अजब रसायन होतं. मराठी माणसाच्या स्वभावात धंदा नाही हे हजार शब्दांमध्ये सांगण्यापेक्षा फक्त मावशींना भेटवलं असतं तरी जसं काम झालं असतं, त्याचप्रमाणे धंदा कसा करावा याचा वस्तुपाठ दाखवायचा असेल तरीही मावशींकडेच बोट दाखवायला लागलं असतं. पार्सल मिळेल का विचारल्यावर, नाही असं एका शब्दात न सांगता… वाचता येत नाही का?, कुठून मरायला येतात देव जाणे? असा भडीमार करत जर ग्राहकही वाद घालत बसला, तर ताबडतोब चालता हो इथून, परत यायचं नाही इथं.. असं बजावणाऱ्या मावशी, बाळा बरेच दिवस आला नाहीस असं विचारायच्या तेव्हा ऐकणाराही आपण भलत्याच दुकानात आलो नाही ना? असे भाव चेहऱ्यावर मिरवायचा. मालात कधी पाप नाही, नी शब्दांना आखडतं माप नाही, या एकमेव धोरणावरच मावशींनी व्यवसाय केला असं म्हणायला हरकत नाही… आज गल्लोगल्ली मिसळीच्या हॉटेलांनी ठाण मांडलंय, परंतु १०० चौरस फूटाच्या आतबाहेर असलेल्या टपरीवजा मुनमुनला कधी स्पर्धा जाणवलीच नाही… कायम बाहेर लागलेली रांग, उच्चारवात, तुम्ही दोघांनी या… ओ.. कळत नाही का तुम्हाला, मागे व्हा.. फडका तर मारू दे.. मधे घुसता लाज नाही वाटत… असा तोरा वागवणाऱ्या मावशींचं हॉटेल कायम फुल्लंच राहिलं.

व्यावसायिक असतो तो जास्तीत जास्त धंदा कसा होईल, जास्त पैसे कसे कमवू हा विचार करतो. परंतु मावशींचं गणितच वेगळं.. संध्याकाळी पाचच्या सुमारास दुकान उघडणार, नी मिसळ संपेपर्यंत उघडं राहणार हा रीतीरिवाज वर्षानुवर्षे सुरू राहिला. रविवारी जास्त गर्दी होईल या भीतीनं असेल कदाचित, रविवारी दुकान बंद म्हणजे बंद! त्यामुळे मिसळ खाल्लेल्यांपेक्षा मिसळ न मिळाल्यांमुळे परत गेलेल्यांची संख्याच अधिक असावी!

मावशींच्या शिव्या खाऊनही लोकं का येत असावीत या दुकानात? असा प्रश्न पडायचा अनेकांना. पाव मिळणार नाही, लिंबू मिळणार नाही, रस्सा पण दोनदाच (एक्स्ट्रा पैसे मोजुनही), डोळे फुटले काय, जास्त बोलाल तर थोबाड रंगवीन असा एखाद्या तुरुंगातील मुदपाकखान्यामध्ये शोभेलसा अनुभव घ्यायला का बरं लोक येत असावीत? त्याला मामलेदारची चविष्ट मिसळ हे तर कारण आहेच, पण त्याबरोबरच मावशी तोंडानं तिच्या मिसळसारखीच तिखट आहे, पण अंत:करणानं चांगली आहे, हा कुठेतरी विश्वास लोकांच्या मनात असावा. पुलंनी रावसाहेबांचं वर्णन करताना म्हटलंय, की त्यांच्या शिव्यांचं काही वाटत नसे, जसं लहान मूल नागव्यानं फिरताना त्यात अश्लील असं काही वाटत नाही, त्याप्रमाणेच रावसाहेबांच्या शिव्यांचं आहे त्या अश्लील वाटत नाहीत. मावशींच्या शिव्यांनाही मला वाटतं ग्राहक अंगाला लावून घेत नव्हते. मुनमुनच्या मिसळीची एकूण किंमत म्हणजे जे काही मिसळ पावचे होतील ते पैसे नी वर दोन शिव्या असं समीकरणच ग्राहकांनी ठरवून टाकलेलं असावं.
एकदा एक प्रेस फोटोग्राफर मावशींच्या दुकानात गेला. मावशी तुम्हाला प्रसिद्ध करतो, पेपरात फोटो छापून आणतो वगैरे त्यानं जरा तोरा दाखवला. त्याला वाटलं आता आपली खिदमत होणार, आपला भाव वधारणार वगैरे… पण झालं उलटंच.. जर माझा फोटो काढलास नी पेपरात छापलंस तर चपलेनं मारीन असं सांगून मावशीनं त्याला चक्क हाकलून लावलं.

प्रसिद्धीचं वावडं, ‘अतिथी देवो भवं’ वगैरेचा दूर दूर संबंध नाही, पुणेकरांची मान लाजेनं खाली जाईल इतकं कमी वेळ काम करायचं नी एवढं करूनही दशकानुदशकं हाऊस कायम फूल्ल ठेवायचं ही किमया साधणाऱ्या माझ्या माहितीप्रमाणे दोनच मावश्या डोंबिवलीत होऊन गेल्या. पुलंच्या भाषेत किमान शब्दांत गिऱ्हाईकांचा कमाल अपमान करायची कला या दोघींना साध्य होती. एक पाटकर शाळेच्या इथली साईबाबा वडा सेंटरची मावशी नी दुसरी मुनमुन मिसळची मावशी… साईबाबा वडावाली मावशी तर ग्राहकांना नुसता हग्या दमच नाही भरायची, तर पाव का मिळणार नाही यावर कुणी वाद घातलाच तर अंगावर तळणी फेकून मारीन असा दम भरायची (ही मी स्वत: बघितलेली गोष्ट आहे, ऐकीव नाही). वडेवाल्या मावशीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं नी त्या दुकानात पाव मिळायला लागले नी आता चक्क सुट्टे पैसे पण देतात. आधी पाव मागायची किंवा दोन वडे घेऊन शंभरची नोट द्यायची कुणाची हिंमत नव्हती. समजा सुट्टे पैसे नसतीलच, तर आधीच विचारायचं, मावशी शंभरची नोट आहे, वडे मिळतील का सांगा… नंतर लफडं नको.. पण या वडेवाली मावशीनं पण जो व्यवसाय केला, त्याला तोड नाही… एकट्या बाईनं अत्यंत चविष्ट वडा नी झणझणीत लसणाचं तिखट फिकं पडेल असं जहाल तोंड यांच्या जीवावर अक्षरश: हजारो खवय्यांवर मनोराज्य केलं.

मला प्रश्न पडायचा, की या दोन्ही मावश्या मुळात व्यवसायात पडल्याच का? नी बरं पडल्या तर पडल्या अशा व्यवसायात का पडल्या की ज्यामध्ये त्यांचा रोज शेकडो लोकांशी संबंध येतो.. येणारा ग्राहक हा देव वगैरे बाजुला राहो, पाठी लागलेला शनी आहे अशाच आविर्भावात त्या ग्राहकांना का झिडकारायच्या? आणि त्यापेक्षा मोठं कोडं म्हणजे ग्राहकही आपले पैसे मोजून मावश्यांनी दिलेल्या शिव्या ओव्या समजून का झेलायचे?

या प्रश्नाची संगती लावणं कठीण आहे. लावता आली तर ती एकाच प्रकारे लावता येणं शक्य आहे. गेल्या जन्मी माझ्यासारख्या हजारो जीवांनी या दोन मावश्यांना काहीतरी त्रास दिला असणार. नको नको ते बोललं असणार.. देवानं त्याची परतफेड अशी केली असावी.. की आम्हाला या दोन मावश्यांच्या वडा नी मिसळचा मोह तोपर्यंत सोडवणार नाही जोपर्यंत आमचं गेल्या जन्मीचं पाप धुतलं जात नाही… नी या मावश्याही तोपर्यंत गल्लावर बसतील जोपर्यंत आमचं गेल्या जन्मीचं ऋण फिटत नाही!

एखाद्या गोष्टीचा आनंद जसा त्या गोष्टीत असतो तसाच वातावरणातही असतो. मसाला दुधाचा पेला जसा मधुचंद्राच्या किंवा कोजागिरीच्या चांदण्या रात्रीत रंगतो, मद्याचा पेला जसा मंद दिव्यांसोबत गुलाम अली किंवा जगजीत सिंहांच्या संगतीत रंगतो तसाच मुनमुनच्या मिसळच्या चवीलाही मावशीच्या निव्वळ अस्तित्वानं बहर यायचा.

मुनमुनची मिसळ यापुढेही असेल, जिभेला तिच चव मिळेलही, पण कदाचित बहर मात्र तेवढा नसेल, काही तरी चुकल्यासारखं नक्की वाटेल!

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Death murudeshwar mavashi munmun misal dombivali