scorecardresearch

BLOG : ब्रँड ‘मोदी जैसा कोई नही’

नरेंद्र मोदींचे यश दिसत असले तरी त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे. आदर्श आचारसंहिता लागू होण्याआधी जानेवारी ते मार्च दरम्यान मोदींनी देशभरात १०० सभा घेतल्या.

BLOG : ब्रँड ‘मोदी जैसा कोई नही’

कुठल्याही क्षेत्रात कन्व्हिन्सिंग पॉवर खूप महत्वाची असते. कन्व्हिन्सिंग पॉवर म्हणजे समोरच्याला एखाद्या गोष्टीसाठी राजी करणे. कन्व्हिन्सिंग पॉवर असलेल्या व्यक्ती शिखरावर पोहोचतात. कन्व्हिन्स करताना वर्तमानात काही मिळणार नसते पण भविष्यात तुम्हाला फायदा मिळेल हे समोरच्या माणसाच्या गळी उतरवावे लागते. अगदी राजकीय क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. राजकारणात आश्वासनांवर विश्वास ठेवण्यासाठी मतदारांना राजी करावे लागते. मतदारांची तशी मानसिकता बनवावी लागते. ज्याला ही कला जमते तो सत्ता शिखरावर पोहोचतो.

सध्याच्या घडीला भारतीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींइतकी कन्व्हिन्सिंग पॉवर असलेली दुसरी व्यक्ती नाही. मागच्या पाच वर्षातील मोदी सरकारचा कारभार उत्तम म्हणावा असा नव्हता. उत्पादन, निर्यात, नोकऱ्या निर्मिती आणि शेती उत्पादनाला हमी भाव या महत्वाच्या विषयांवर मोदी सरकारने भरीव अशी कामगिरी केली नव्हती. सर्वसामान्यांची अपेक्षापूर्ती झालेली नाही. तरीही सलग दुसऱ्यांदा मोदी सरकारने पूर्ण बहुमत मिळवले. २०१४ च्या तुलनेत भाजपाने पहिल्यांदा स्वबळावर तीनशे जागांचा टप्पा ओलांडला.

पाच वर्षांपूर्वी मोदी लाट असतानाही भाजपाला इतक्या जागा मिळाल्या नव्हत्या. खरंतर पाचवर्ष सत्ता उपभोगल्यानंतर कुठल्याही सरकारसाठी अनुकूल वातावरण नसते. विरोधक अनेक मुद्द्यांवर कोंडी करतात. प्रस्थापित सरकारविरोधात जनमत असते. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा सत्ता मिळवून दाखवली. उलट भाजपा आणि एनडीएला पहिल्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या. हे शक्य झाले ते केवळ ब्रँड मोदीमुळे.

मोदींच्या आजच्या यशामध्ये त्यांचे व्यक्तीमत्व, पेहराव आणि वकृत्व कला याचे महत्वपूर्ण योगदान आहे. मोदींकडे भाषण करताना स्वत:ला सर्वसामान्यांशी जोडून घेण्याची कला आहे. मी तुमच्यापैकीच एक आहे हा विश्वास ते भाषण ऐकणाऱ्याच्या मनात निर्माण करतात त्यामुळे जनतेला ते आपल्या जवळचे वाटतात. याउलट राहुल गांधींनी फक्त आरोप करण्यात वेळ वाया घालवला. सत्ता मिळाल्यास आपल्याकडे सुद्धा देशाच्या विकासाचे व्हिजन आहे हे ते मतदारांना पटवून देऊ शकले नाहीत.

विरोधकांनी टीका करताना उच्चारलेल्या शब्दांनाच प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवून विरोधकांवर डाव उलटवण्यात मोदींची हातोटी आहे. ‘अच्छे दिन’, ‘चायवाला’ आणि आता ‘चौकीदार चोर हैं’ ही त्याची उत्तम उदहारणे आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या आधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ‘अच्छे दिन’ आनेवाले हैं असे म्हणाले होते. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर त्यांना चायवाला म्हणाले. मोदींनी त्यावर होय मी चहा सुद्धा विकला आहे असे सांगताना चाय पे चर्चा सारखे संवाद कार्यक्रम आयोजित करुन स्वत:बद्दल जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण केली. अलीकडचे उदहारण म्हणजे ‘चौकीदार चोर हैं’ हा राहुल गांधींचा आरोप. नरेंद्र मोदींनी चौकीदार या शब्दाला प्रामाणिक, पारदर्शकतेशी जोडून राहुल गांधींवरच डाव उलटवला.

आज सर्वांना नरेंद्र मोदींचे यश दिसत असले तरी त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे. आदर्श आचारसंहिता लागू होण्याआधी जानेवारी ते मार्च दरम्यान मोदींनी देशभरात १०० सभा घेतल्या. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचार सुरु झाल्यानंतर देशभरात १४६ सभा आणि रोड शो केले. अन्य नेत्यांच्या तुलनेत मोदींनी सोशल मीडियाचे महत्व बरेच आधी ओळखले होते. २०१४ साली मोदींचे वय वर्ष ६३ होते. त्यावेळी तरुण मतदाराचा कल लक्षात घेऊन मोदी सोशल मीडियावर सक्रिय झाले. २००९ सालीच मोदी फेसबुक आणि टि्वटरवर आले. २०१० साली त्यांनी स्वत:ची वेबसाईट काढली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींनी स्वत:ला तरुण मतदारांशी जोडले. आज भारतात टि्वटर आणि फेसबुक दोन्हींवर मोदींचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. कुठलाही नेता मोदींच्या आसपासही नाही. २०१४ मध्ये भाजपाच्या प्रचंड मोठया विजयानंतर भारतातील अन्य राजकीय पक्षांना सोशल मीडियाचे महत्व लक्षात आले. तो पर्यंत मोदी बरेच पुढे निघून गेले होते.

११ एप्रिलला पहिल्या टप्प्याच्या मतदानाआधी दिल्लीतील लोकनिती संशोधन संस्थेचा सर्वेक्षण अहवाल समोर आला होता. त्यातून तीन निर्णयांमुळे नरेंद्र मोदींची लोकप्रियता शिखरावर पोहोचल्याचे दिसले होते. पुलवामा हल्ल्यानंतर जैशच्या तळावर एअर स्ट्राइकचा निर्णय, आर्थिक दुर्बल घटकाला १० टक्के आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याच्या निर्णय निवडणुकीची दिशा बदलू शकतो असे या संस्थेच्या अहवालात म्हटले होते.

विरोधकांनी मोदींना २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ? शेती, रोजगार अशा अनेक प्रश्नांवरुन रान उठवले. पण मतदारांनी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांकडे पाठ फिरवत पुन्हा एकदा मोदींच्या गळयात सत्तेची माळ टाकली. विरोधी पक्षांकडे मोदींच्या तोडीचा नेता नव्हता तसेच त्यांच्यामध्ये मतदारांना कन्व्हिन्स करण्याची क्षमताही नव्हती.

मोदींइतके आपण सक्षम, मजबूत सरकार देऊ हा विश्वास ते मतदारांच्या मनात निर्माण करु शकले नाहीत. मोदींनी केलेल्या कामातील त्रुटी शोधण्यापेक्षा त्यांनी राफेल सारखे मुद्दे काढून फक्त आरोप केले. जे जनतेला नाही पटले परिणामी पुन्हा एकदा मोदीच सत्तेवर आले. समोर तगडे, अभ्यासू विरोधक नसल्यामुळे सध्याच्या घडीला भारतीय राजकारणात ‘मोदी जैसा कोई नही’ अशीच स्थिती आहे’.

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या