स.न.वि.वि.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!

अंदाजे १८४३ मध्ये सांगली येथे माझा जन्म झाला. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे ” सीता स्वयंवर ” ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि माझा पाया रचला गेला. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले.नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, विदूषक इ.नी युक्त अशी ही पौराणिक नाटके सर्वसामान्यांची करमणूक करू लागली मराठी संगीत नाटकांनी तर मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले. काल माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा सगळा प्रवास पुन्हा एकदा अनुभवला. १७० वर्षांचा प्रदीर्घ प्रवास.

आज मी खूप आनंदात आहे. वेगवेगळ्या ठिकाणी माझा उत्सव साजरा होत आहे. कलाकार मंडळी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत आहेत. वेगवेगळे कलाकार येत आहेत, भेटत अहेर त्यातच दिवाळीचे निमित्त आहे, आपल्याला आवडेल ते सादरीकरण सगळे करत आहेत त्याने मनाला समाधान वाटले. सगळीकडेच हा आनंदसोहळा साजरा होतोय.

एकीकडे हा आनंद साजरा करत असताना दुःख मात्र एकाच गोष्टीचे होते की जे व्यासपीठ आपल्याला पुढे आणते आणि ज्या व्यासपीठावर कलाकार घडतो त्या व्यासपीठासाठी, त्याचा मान राखण्यासाठी आपल्याला एकच दिवस आठवतो ? एरव्ही प्रयोग असताना किंवा नेहमी घाईगडबडीने पूजा उरकायची आणि बेल दे रे म्हणून खेकसायचं हे नेहमीचंच. बरं हा एक दिवस साजरा करताना तरी किमान निरलसवृत्तीने सगळे एकत्र यावेत हीच माझी इच्छा! पण छे ते ही कुठे होतंय. इथेही लहानमोठेपणा, वैयक्तिक स्वार्थ आणि अहंभाव आलाच. स्वतःच्या स्वार्थासाठी असे दिवस साजरा करणे निव्वळ चुकीचे असं मला वाटतं आणि माझी कुठलाही स्वार्थ न बाळगता सेवा करणाऱ्या सेवाभावी कलाकाराचीसुद्धा हीच इच्छा असणार हे मला नक्की माहिती आहे.

आजकाल सण साजरे होतात ते केवळ व्यावसायिक फायद्यासाठीच आणि मीसुद्धा त्याला अपवाद राहिलेले नाही. नाट्यप्रयोगासाठी तारखा हव्या असतील आणि एखाद्या सच्चा कलाकाराला रंगभूमीवर यायचं असेल तर त्यासाठी आधी दलालांची गंगाजळी भरावी लागते आणि मगच कलाकारांना रंगमंचावर प्रवेश मिळतो.त्यामुळे हे व्यावसायिकीकरण मनाला खटकते. या सगळ्या प्रकाराने नैराश्य आलेले असतानाच दुसरीकडे तरुणांचा अभिनयाकडे बघण्याचा दृष्टीकोन मनाला समाधान देऊन जातो. आज तरूण पिढीबरोबरच बच्चेकंपनीसुद्धा लहानपणीच रंगमंचावर येण्यासाठी आतुर असतात. माझ्या अंगाखांद्यावर खेळत बागडत एक यशस्वी कलाकार म्हणून घडण्याचा प्रवास मनाला समाधान देतं. या नव्या पिढीच्या फळीमुळेच मनाला उर्जा मिळते आणि मग थेट नटेश्वराकडूनच मला आशिर्वाद मिळतो चिरायू होवो! रसिक श्रोते, कलाकार यांच्यातला महत्त्वाचा दुवा म्हणजे माझ्या पडद्यामागे असणारे कधीही प्रकाशझोतात न येणारे तंत्रज्ञ. सर्वात जास्त मेहनत करून, प्रयोग चांगला व्हावा यासाठी कष्ट करूनसुद्धा या कलाकारांकडे कोणाचे लक्ष जात नाही. त्यामुळे माझा आनंद साजरा करताना त्यांनासुद्धा समाविष्ट केलेच पाहिजे. मला समृद्ध करताना त्यांचा वाटा तर सगळ्यात जास्त आहे. यामध्ये सकारात्मक बाब म्हणजे एक दिवस का होईना प्रत्येक शहरात रंगकर्मी एकत्र येतात. प्रत्येकाच्या आवडीचे सादरीकरण करतात ही सकारात्मक बाब आहे. पण यापुढे एक गोष्ट मात्र कलाकारांनी लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही एखाद्या दिवसाचे निमित्त म्हणून भेटण्यापेक्षा नेहेमीच एकत्र रहा. असेच आनंदाने एकमेकांना सहकार्य करत रहा आणि हो शुभेच्छा देण्यापेक्षा महिन्यातून दोन दिवस मला भेटण्यासाठी येत जा. त्याचा आनंद तुम्हालाही मिळेल आणि मलाही.

साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीस सुरु झालेली मराठी नाट्यपरंपरा तेव्हापेक्षा कितीतरी पटीने अधिक जोशात जोपासली जात आहे. दररोज नवनवीन नाटके रंगभूमीवर येत आहेत, यापुढेही येत राहतील. १७० वर्षाची ही रंगभूमीची परंपरा..आजही २१ व्या शतकातल्या गतिमान युगात, जोपासली जात आहे. ह्या १७० वर्षातील सर्व ज्ञात, अज्ञात कलावंत, तंत्रज्ञ आणि सहायक ज्यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली आणि मराठी रसिकांच्या मनात रुजवली त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा

तुमचीच

मराठी रंगभूमी

– आदित्य बिवलकर

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi rangbhumi din open letter from marathi rangbhumi
First published on: 05-11-2018 at 15:33 IST