अभिजीत ताम्हणे
साध्या इमारती, रोजच्या वापरातली बांधकामं, यांच्याकडे दृश्यकलावंतांचं तरी लक्ष आहे, असा दिलासा मिळण्याचे प्रसंग अनेकदा आले आहेत..

प्रभाकर बरवे यांनी कागदावरल्या एका चित्रात राजाबाई टॉवर रेखाटला-रंगवला आहे, ते चित्र एका लिलावसंस्थेच्या संकेतस्थळावर आहे. पण हे चित्र फारच अपवादात्मक. एरवी बरवे यांच्या चित्रांमध्ये अशा प्रसिद्ध इमारती नसायच्या. म्हणजे, बरवेंच्या चित्रांत कधी कधी इमारती असायच्या- त्या मुंबईतल्याही असायच्या; पण या इमारती आपल्या सर्वाच्या रोजच्या पाहण्यात असतात तशा साध्याच असायच्या. उंच इमारतींचे तपशील रंगवणं बरवे पूर्णच टाळायचे – पण एकमजली, दुमजली कौलारू इमारतींचे जिने, कठडे, दारं हे सारं अगदी तपशीलवार नोंद केल्यासारखं असायचं. बरवे यांच्या एका चित्रात अशीच एक दुमजली इमारत दिसते आणि बरवेंना ओळखणारे लोक म्हणतात, ‘त्यांनी गिरगावातल्या छोटय़ा खोलीत घेतलेला स्टुडिओ याच इमारतीत होता!’

malati joshi
व्यक्तिवेध: मालती जोशी
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: या शब्दांना भिडू नका..
santosh pathare, aamhi documentarywale, dr santosh pathare documentary making journey, documentary making process, documentary making, documentary, Sumitra Bhave Ek Samantar Prawaas, Search of Rituparno,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माणसं आणि काळाचे दस्तावेजीकरण
first story in a series of three stories written by veteran writer Shyam Manohar
ग्रेट
Marathi Serial World First AI Experiment
मराठी मालिका विश्वातील पहिलावहिला ‘एआय’ प्रयोग
9th anniversary of Manachi organization
‘मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन दिमाखात
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
loksatta kutuhal generative artificial intelligence and art
कुतूहल : जनरेटिव्ह तंत्रज्ञान आणि कला

सुधीर पटवर्धनांच्या चित्रांमध्येही इमारती आहेत. मुंबईच्या किंवा आसपासच्या उपनगरांतल्या इमारती, गेल्या दशकभरातल्या ‘अनदर डे इन ओल्ड सिटी’सारख्या चित्रांमध्ये तर पुण्याच्याही इमारती. पण त्यांच्या चित्रांमध्ये थेट इमारती येण्याच्याही आधीपासून वास्तुरचनेचे तपशील होते. हे तपशील सार्वजनिक जागांवरचे होते. उदाहरणार्थ, पटवर्धनांच्या ज्या चित्राची छापील आवृत्ती ‘राष्टीय आधुनिक कला संग्रहालया’त सहज मिळते, त्या ‘ट्रेन’ या चित्रात दादर स्टेशनवरच दिसणाऱ्या पुलाचा कठडा आहे. तो अत्यंत विशिष्ट असा तपशील आहे. पण एकेका इमारतीपेक्षा शहररचनेकडे पटवर्धनांनी पाहिलं. त्यातून एकाच चित्रचौकटीत निरनिराळय़ा प्रकारच्या इमारती आल्या. झोपडय़ा- चाळी- उंच इमारती असा भेद किंवा चकचकीत नव्या, रंगीबेरंगी, डिझायनर आकारांच्या इमारतींबरोबरच किमान ५० वर्ष जुन्या, काळाला तोंड देत टिकलेल्या इमारती यांमधला ताणही त्यांनी चित्रांमध्ये आणला. ‘लोअर परळ’सारख्या चित्रात, आता पाडून टाकण्यात आलेला तो पूलही (आता) अजरामर झाला.

या दोघा महाराष्ट्रीय ज्येष्ठ चित्रकारांनी आपापल्या कलाविषयक भूमिकांमधून आपल्या आसपासच्या ‘साध्या’ इमारती चितारल्या, हे इथं आपल्यासाठी महत्त्वाचं. बरवेंच्या चित्रांमधल्या इमारती या बरवे यांची दृश्यनिर्मिती असतात. नितीन कुलकर्णीसारखे बरवे यांना जवळून पाहिलेले अभ्यासक कदाचित सांगतील- फळाचा फळपणा, कबुतराचा पक्षीपणा जसा बरवे यांना चित्रामध्ये आणायचा होता तसाच इमारतीचा इमारतपणा त्यांनी चित्रात आणला. पटवर्धनांच्या चित्रांमध्ये शहर, माणसं, इमारती यांचं नातं दिसतं. इथं बरवे आणि पटवर्धनांची तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही, तसा हेतूही नाही. उलट, या दोघांच्या चित्रांमधल्या इमारतींना एकंदर चित्रविचाराचे संदर्भ होते, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे.

हे वैविध्य टिपणं महत्त्वाचं!

याउलट, चित्रविचाराचे असे संदर्भ अजिबात नसूनही साध्या वास्तुरचनांचं दृश्यांकन आधुनिक/ समकालीन कलेत झालेलं आहे. हे काम ‘डॉक्युमेण्टरी मोड’ किंवा ‘दस्तावेजीकरण शैली’चा भाग मानलं जातं. अशा कामाचं उत्तुंग उदाहरण म्हणजे ब्रेन्ड आणि हिला बेचर या दाम्पत्यानं टिपलेली छायाचित्रं. औद्योगिक प्रकल्पांमधल्या पाण्याच्या टाक्या, मोठय़ा औद्योगिक प्रकल्पांतल्या गोल आकाराच्या इंधनटाक्या, शीतकरण संयंत्र किंवा तत्सम हेतूसाठी औद्योगिक प्रकल्पांमध्ये आढळणारी बांधकामं, किंवा- ‘जर्मनीतल्या सीगेन प्रांतामधील खाण-कामगारांची घरे’ यांसारख्या बांधीव रचनांचे फोटो त्यांनी टिपले. एखाद्या प्रकारच्या बांधकामातल्या विविध तऱ्हा दाखवणारे सहा, नऊ किंवा १५ फोटो एकाच फ्रेममध्ये मांडून प्रदर्शित करायचे, अशी पद्धतही त्यांनी पाळली. ‘टायपॉलॉजी’ किंवा विधाविचार करणारं हे काम आहे, असा निर्वाळा समीक्षकांनी दिला. अमुक एखाद्या प्रदेशातच दिसणारे औद्योगिक उभारण्यांचे किंवा काही वेळा वास्तु-रचनांचे प्रकार त्यांनी टिपले. अनोळखी लोकांचे एकाच ठरावीक पद्धतीनं पासपोर्ट फोटो पाहिल्यासारखं वाटू शकतं प्रेक्षकांना, हे बेचर दाम्पत्याचं काम पाहताना. पण त्यातून जे साध्य झालं, ते आणखी निराळं होतं.

 भोवतालातलं ‘साधं वास्तव’ आपण टिपायचं आहे- या वास्तवदर्शनात प्रत्यक्ष मानवाकृती नसल्या तरी, ते मानवनिर्मित आणि माणसांसाठी उभारलं गेलेलं काहीतरी आहे. त्या उभारणीत ज्या काही तऱ्हा दिसतात त्यासुद्धा प्रयोगशीलता/ रूढीप्रियता, सौंदर्यनिर्मितीची आस/ कामचलाऊपणा अशा दोन टोकांच्या मोजपट्टय़ांवरल्या विविध बिंदूंवर असतील. हे वैविध्य टिपणं महत्त्वाचं आहे, असा दृश्यकलावंतांचा विश्वास या बेचर दाम्पत्यानं पुढे नेला. त्यातून फोटोग्राफीत तरी बेचर यांच्यानंतर एका शैलीची वाट रुंद होत गेली.  ब्रेन्ड बेचर यांचा जन्म १९३१ सालचा आणि ते वारले २००७ साली. त्यांच्या पत्नी हिला जन्मल्या १९३४ मध्ये आणि निवर्तल्या २०१५ च्या ऑक्टोबरात. तिशी-चाळिशीत या दाम्पत्यानं ज्या उभारण्यांचे फोटो काढले होते, त्यापैकी बऱ्याच टाक्या, बरेच वीजखांब, बरीचं संयंत्रं ही २००५ च्या आधीच नामशेष झाली होती. बेचर दाम्पत्याच्या हातून, औद्योगिकीकरणाचा वास्तुवारसा टिपण्याचं कामही नकळत झालं होतं.. हा वास्तुवारसा काही प्रसिद्ध नव्हता, त्याला कुणी ‘हेरिटेज’ वगैरे मानलं नाही, पण या वास्तू इथं होत्या, आता त्या नाहीत, जेव्हा त्या होत्या तेव्हा आपापल्या वैशिष्टय़पूर्णतेनं त्या मानवी प्रयत्नांचं सातत्य आणि वैविध्य यांचा मेळ दाखवून देत होत्या! 

दिल्लीचा वास्तू-इतिहास

  याच वाटेवरला पुढला टप्पा ‘दिल्ली मेट्रो’ची उभारणी होऊ लागली तेव्हा अक्षरश: गचकन, अचानक दिल्लीत आला. दिल्ली हे खरं तर समृद्ध वास्तुवारशाचं शहर. लोधी, मुघल, ब्रिटिश वास्तूंखेरीज पांडवकालीन पुराना किलासुद्धा इथेच. पण या शहरातले दृश्यकलावंत आता इथल्या तुलनेनं कमी प्रसिद्ध असलेल्या वास्तूंकडेही आस्थेनं पाहू लागले. दिल्ली मेट्रोच्या कारशेडमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या गरीबवस्तीची (झुग्गी-झोपडय़ांची) कहाणी ‘राक्स मीडिया कलेक्टिव्ह’च्या प्रयत्नांमुळे तेव्हाच्या ‘सराइ’ या संस्थेच्या संकेतस्थळावर दृश्य-शब्द स्वरूपात येऊ लागली होती. त्याच सुमारास जिजी स्कारिआ या दिल्लीवासी शिल्पकार- फोटोआधारित चित्रकारानं गुडगाँवच्या उंच इमारती, एकमेकांवर कुरघोडी केल्यासारखे उड्डाणपूल यांतून बदलणारं शहर आपल्या कलाकृतींत आणलं होतं. (आपल्या मुंबईत, ‘कॅम्प’नं वरळी- हाजीअली भागात ड्रोन कॅमेरे लावून केलेली व्हिडीओ-कलाकृती ही जिजीच्या त्या कामापेक्षा अधिक चटकन आठवणारी ठरते, असो). दिल्लीच्या प्रगती मैदानातली ‘हॉल ऑफ नेशन्स’ ही तुलनेनं प्रसिद्ध इमारत पाडली जाणार, हे जाहीर झाल्यावर सारेच हळहळले.. त्या इमारतीचं लाकडी प्रतिरूप (मॉडेल) खुद्द आर्किटेक्ट राज रेवाल यांच्याकडून दिल्लीच्या ‘किरण नाडर म्यूझियम ऑफ आर्ट’नं मिळवलं आणि संग्रहित केलं. ही नाहीतरी प्रख्यात इमारत, पण अलीकडे दिल्लीचं ‘सरोजिनी नगर’ (दिल्लीकर उच्चार ‘सरोजनी नगर’) ही सरकारी कर्मचाऱ्यांची वसाहत उद्ध्वस्त करून तिथं टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, तेव्हा जुन्या वसाहतीतल्या इमारती टिपणारं, त्या वसाहतीचा मूळ आराखडा, तिथे जेव्हाकेव्हा मानवी वावर होता तेव्हाचे फोटो अशा अनेक दृश्य-दस्तऐवजांचं प्रदर्शन रोहित राज मेहंदिरत्ता यांनी मांडलं. ते प्रदर्शन थेटच वास्तुरचना-इतिहास प्रकारातलं होतं. अशा प्रकारचा (किमान स्वत:चा तरी) वास्तुरचना- इतिहास जपण्यासाठी कुकरेजा असोशिएट्स या वास्तुरचना कंपनीनं ‘कुकरेजा फाउंडेशन’ची स्थापना केली, त्यामार्फत दिल्लीचे दृश्यकलावंत विशाल के. दार यांनी ‘जेएनयू’ची वास्तुरचना- प्रतिरूपं यंदाच्या (फेब्रुवारीत पार पडलेल्या) दिल्लीतल्या ‘इंडिया आर्ट फेअर’मध्ये मांडली होती.. पण हे एवढंच नव्हतं. विशाल दार यांच्या या छोटेखानी प्रदर्शनाचं नाव ‘द मास्टरप्लान’ असं होतं.. ‘जेएनयू’तल्या बऱ्याच इमारतींची रचना करणाऱ्या कुकरेजांनी त्याआधी या संपूर्ण परिसराचा जो बृहद् आराखडा सरकारला प्रस्ताव म्हणून सादर केला होता, तो पुढे पुस्तिकारूपानं छापला गेला. ती पुस्तिकाही इथं होती. विद्यापीठ हे ज्ञानकेंद्र आहेच पण हा विद्यार्थी आणि विद्वज्जन यांच्या मुक्त वावराचा परिसर आहे, याची जाणीव त्या आराखडय़ात होती. केवळ एक वास्तुरचना आधी होती आता नसणार, अशा प्रकारची शोकजाणीव (लॅमेन्ट) विशाल के. दार यांची नव्हती.. जेएनयूतल्या इमारती तर पाडल्या नाहीत अजून. पण त्या आराखडय़ामागची जाणीव कुठे आहे, असा प्रश्न विशाल के. दार यांनी मूकपणे, सूचकपणे उपस्थित केला.

गतवास्तवाची जाणीव

  चित्रकाराच्या जाणिवांतून, त्याच्या स्व आणि समाजविषयक भूमिकेतून सिद्ध झालेली चित्रं असोत की ‘आर्किटेक्चरल हिस्ट्री’ असो.. त्यातून दृश्यबद्ध झालेल्या साध्यासुध्या इमारती – ज्यांना ‘वारसा-वास्तूचा दर्जा’ मिळणं अशक्यच असतं अशा पण जगण्याचा भाग असलेल्या इमारती-  प्रत्यक्षात नामशेष होतात, त्याबरोबर जगण्याचा पोतही बदलत असतो. वास्तव पालटत असतं. ‘कालौघात हे व्हायचंच’ असं त्यावर कुणीही म्हणू शकेल पण त्या कालौघात आपण किती गमावतो याचा हिशेब दृश्यकलेच्या विविध प्रकारांतूनही ठेवला गेला आहे, जात असतो. वास्तुरचनांसह भूतकाळात जमा झालेल्या वास्तवाचा वारसा आपल्याला या दृश्यकलाकृतींतून मिळणार असतो.

हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, मुंबईतली अख्खी ‘एअर इंडिया कॉलनी’ हल्लीच पाडली गेली. एक जीवनशैली संपली. त्यावर वरीलपैकी कुठल्याही प्रकारानं काम झाल्याचं ऐकिवात नाही.