scorecardresearch

BLOG: आदित्य यांच्यासमोर योद्धाच नसेल तर महाविजयाला काय अर्थ?

अमेरिकेने दुबळया इराकवर किंवा सचिन तेंडुलकरने क्लब संघाविरुद्ध झळकावलेल्या शतकासारखा आदित्य यांचा विजय असेल.

BLOG: आदित्य यांच्यासमोर योद्धाच नसेल तर महाविजयाला काय अर्थ?

दीनानाथ परब

पूर्वी सैन्य जेव्हा मोहिमेवर निघायचे. तेव्हा राजा स्वत: आघाडीवर राहून सैन्याचे नेतृत्व करायचा. युद्धात आपल्या राजाला लढताना पाहून सैन्य सुद्धा त्वेषाने शत्रूवर तुटून पडायचे. पण कलियुगात राजाची भूमिका बदलली. राजा अधिक संरक्षणवादी झाला. तो आता सैन्याला पुढे पाठवतो आणि स्वत:ला सुरक्षित करतो. वरळीमधल्या आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीकडे याच दृष्टीने पाहावे लागेल. ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीची मीडियामध्ये बरीच चर्चा सुरु आहे.

आदित्य ठाकरे यांच्या प्रचार फेरीला मिळणाऱ्या प्रतिसादाला ठळक प्रसिद्धी दिली जातेय. आदित्य ठाकरे वरळीमधून जिंकणार ही काळया दगडावरची रेघ आहे. कदाचित महाराष्ट्रातून सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येणारी ही जागा असेल. पण आदित्य यांच्या महाविजयाला काही अर्थ असेल का? कारण आदित्य ठाकरे यांच्यासमोर तगडा उमेदवारच नाहीय. अमेरिकेने दुबळया इराकवर किंवा सचिन तेंडुलकरने क्लब संघाविरुद्ध झळकावलेल्या शतकासारखा हा विजय असेल. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला जनतेची मान्यता असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. मग आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी मतदारसंघच का निवडला? त्यांच्या नेतृत्वाला जनमान्यता आहे म्हणून महाराष्ट्रातल्या कोणत्याही मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवून जिंकून दाखवावं, असं मी अजिबात म्हणणार नाही.

पण त्यांनी स्वत:च्या घरच्या मैदानावर होमपीचवर निवडणूक लढवायला काय हरकत होती. आदित्य ठाकरे ज्या कलानगरमध्ये राहतात त्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली असती तर त्यांच्या विजयाची हमी देता आली असती का असा प्रश्नच आहे. मराठी मतांबरोबरच दलित, मुस्लिमांची मते सुद्धा वांद्रे पूर्व मतदारसंघात निर्णायक ठरतात. २०१४ मध्ये कुडाळमध्ये पराभूत झाल्यानंतर २०१५ साली स्वत: नारायण राणे यांनी वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी भक्कम नसतानाही नारायण राणे यांनी शिवसेना उमेदवाराला टक्कर दिली होती. त्याच धर्तीवर आदित्य वांद्रे पूर्वेतून लढले असते तर प्रतिकूल परिस्थितीत विरोधकांना अंगावर घेणारा लढवय्या सेनापती असा ठसा शिवसैनिकांच्या मनावर ठसला असता. नेत्यांनी स्वत: धोका पत्करुन, संघर्ष करुन कार्यकर्त्यांसमोर उदहारण निर्माण करायचे असते. खरंतर शिवसेनेचा जन्मच संघर्षातून झाला आहे. पण पक्षाने आदित्य यांच्यासाठी सर्वबाजूंनी सुरक्षित असलेला मतदारसंघ निवडला.

आदित्य यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेला आता सचिन अहिर आणि सुनील शिंदे या दोन नेत्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. शिवसेनेच्या युवराजांसाठी सुनील शिंदे सारख्या कार्यक्षम आमदाराला आपली जागा सोडावी लागली. आदित्य यांच्यासमोर तगडा उमेदवार नाही म्हटल्यावर अन्य पक्षांना उमेदवार देण्यापासून कोणी रोखलं होतं का? असा प्रश्न विचारला जाईल. पण मग निवडणुकीच्या काही दिवस आधी सचिन अहिर यांना शिवसेनेत का प्रवेश दिला? सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभे राहिले असते तर त्यांनी निश्चितच वरळी मतदारसंघातून आदित्य यांना कडवे आव्हान दिले असते आणि आदित्या यांच्या विधानसभेवर पोहोचण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला असता. म्हणून सचिन अहिर यांना शिवसेनेत घेऊन आदित्य यांचा मार्ग सुरक्षित करण्यात आला.

आदित्य यांचा विजय सुनिश्चित आहे. मग त्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिकांची प्रचंड फौज का? हा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. शिवसेनेच्या केंद्रीय मंत्र्यंपासून विद्यमान आमदार, विविध नेते, शाखांमधले पदाधिकारी दिवस-रात्र त्यांच्यासोबत प्रचारात फिरत आहेत. खरोखर एवढया फौजफाटयाची गरज आहे का? २४ ऑक्टोबरला वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्या विजयानंतर शिवसैनिकांच्या जल्लोषाचे चित्र रस्त्यावर दिसेल. पण समोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसताना खरोखर आदित्य यांच्या महाविजयाच्या जल्लोषाला काही अर्थ असेल का? हा प्रश्न नक्कीच घोंघावत राहील.

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या