scorecardresearch

मोदीजी, भाजपामध्येही आहे घराणेशाही ही घ्या यादी आणि आकडेवारी

तीन बड्या राज्यांमधील भाजपाचे मुख्यमंत्री हे घराणेशाहीच्या माध्यमातून राजकारणात

मोदीजी, भाजपामध्येही आहे घराणेशाही ही घ्या यादी आणि आकडेवारी
भाजपामध्येही घराणेशाही

प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीस पद देण्याची घोषणा काँग्रेसने नुकतीच केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रियंका गांधी यांचे नाव न घेता, ‘काही लोकांसाठी परिवारच पक्ष असतो’ अशी टिका केली. ‘काही लोकांसाठी परिवारच पक्ष आहे. आमच्यासाठी पक्ष हा परिवार आहे,’ असं सांगताना मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसमधील घराणेशाहीवर अप्रत्यक्षरित्या टिका केली. मुळात भाजपाचे अनेक नेते अनेकदा काँग्रेसमध्ये घराणेशाही असून तो केवळ एका कुटुंबाचा पक्ष आहे अशा आशयाची टिका करत असतात. प्रियंका गांधींची नियुक्ती झाल्यानंतर मोदींनीही सहाजिकपणे पुन्हा तिच री गिरवली. पण यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांकडे एक बोटं दाखवताना चार आपल्याकडे असतात हे विसरता कामा नये. सरळ सांगायचं तर काँग्रेसवर घराणेशाहीची टिका करताना मोदींनी आपल्या स्वत:च्या पक्षातील घराणेशाहीकडे एकदा नजर टाकायलाच हवी. आता मोदींनेच पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला आहे तर भाजपामधील घराणेशाहीवर टाकलेली ही नजर…

जरी भाजपाकडून कायमच काँग्रेसमध्ये घऱाणेशाही असल्याची टिका होत असली तरी भाजपामध्येही घराणेशाही आहे हे विसरता कामा नये. काँग्रेस फक्त ही घराणेशाही उघडपणे दाखवते कारण त्यांच्याकडे एकाच कुटुंबाचे चालते तर दुसरीकडे भाजपामध्ये घराणेशाहीत तरी काँग्रेसप्रमाणे केंद्रीकरण झालेले दिसत नाही. म्हणूनच भाजपामध्ये अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात घराणेशाही दिसून येते.

>सुरुवात आपल्या राज्यापासूनच केल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गंगाधरपंत फडणवीस यांचे पुत्र. गंगाधरपंत हे विधानपरिषदेचे सदस्य होते. तर फडणवीस यांची काकी शोभा फडणवीस या राज्यामध्ये मंत्री होत्या.

>एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे या १६ व्या लोकसभेमध्ये रावेर मतदारसंघातून खासदार आहेत.

>भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे या राज्यामध्ये मंत्री आहेत. तर वडीलांच्या निधनानंतर बीड मतदारसंघातून मुंडेंची कनिष्ठ कन्या प्रितम यांना लोकसभेवर पाठवण्यात आले आहे.

>भाजपाचेच आणखीन एक दिवगंत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडूण आल्या आहेत.

>भाजपाचे नेते विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित या २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नंदूरबार मतदारसंघातून निवडूण आल्या आहेत. तर विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्र गावित हे मागील वर्षी मे महिन्यामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पालघर मतदारसंघामधून १६ व्या लोकसभेत खासदार झाले आहेत.

>भाजपाच्या नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंग हे धौरपूरमधून खासदार आहेत. आधी राजेंचा मतदारसंघ असलेल्या धौरपूरमधून आता त्यांचा मुलगा खासदार झाला आहे.

>वसुंधरा राजेंची बहीण यशोधरा राजे सिंधिया या मध्य प्रदेशमधील शिवराजसिंग चौहान यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या.

>वसुंधरा राजेंच्या घराण्यामधील राजकाराणातील घराणेशाही मुळात त्यांच्या आई विजया राजे यांच्यापासून सुरु होते. विजया राजे या मध्यप्रदेशमधून खासदार होत्या. त्याआधी जनसंघासोबत होत्या नंतर भाजपाच्या स्थापनेपासून पक्ष बांधणीमध्ये त्यांचा वाटा होता.

>वसुंधऱा राजे यांचे बंधू माधवराव सिंधिया हे काँग्रेसचे बडे नेते होते. त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य सिंधिया सध्या मध्य प्रदेशमधील गुना मतदारसंघाचे खासदार आहेत.

>छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांचे पुत्र अभिषेक हे लोकसभेमध्ये खासदार आहेत.

>हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते प्रेम कुमार धुमाळ यांचे पुत्र अनुराग ठाकूर हे सध्या १६ व्या लोकसभेमध्ये हिमाचलमधील हमीरपूरचे खासदार असून ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षही आहेत.

>केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा हे माजी अर्थमंत्री यशवंद सिन्हा यांचे पुत्र आहेत.

>भाजपा नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचा मुलगा पर्वेश वर्मा हा दिल्ली (पश्चिम) मतदारसंघातून १६ व्या लोकसभेत निवडूण आले आहेत.

>उत्तर प्रदेशमध्ये आमदार असणारे आणि उत्तर प्रदेश भाजपाचे सचिव असणारे पंकज सिंग हे गृहमंत्री राजानाथ सिंग याचे पुत्र आहेत.

>राजस्थानचे राज्यपाल असणाऱ्या कल्याण सिंग याचे पुत्र राजीव सिंग हे भाजपाचे खासदार आहेत.

>महंत अविद्यनाथ यांनी आपला वासर म्हणून योगी अदित्यनाथ यांना पुढे आणले.

आकडेवारी

>’द प्रिंट’ने दिलेल्या आकडेवारीनुसार १६ व्या लोकसभेमध्ये घराणेशाहीच्या माध्यमातून निवडूण आलेल्या भाजपा खासदारांच्या यादीमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर, बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

>उत्तर प्रदेशमध्ये निवडूण आलेल्या ७१ पैकी १२ खासदारांचा आधीपासूनच भाजापामध्ये सक्रिय असणाऱ्या नेत्यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध आहे. बिहारमधील २२ भाजपा खासदारांपैकी ५ खासदार हे या ना त्याप्रकारे आधीपासूनच नेते असणाऱ्यांचे नातेवाईक आहेत. तर महाराष्ट्रातील २३ खासदारांपैकी चार खासदारांनी घराणेशाहीमुळे मिळालेली संधी साधत १६ व्या लोकसभेत प्रवेश केला.

>या तीन राज्यांबरोबरच गुजरात आणि राजस्थान प्रत्येकी तीन, छत्तीसगडमधील दोन आणि मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, झारखंड, दिल्ली, उत्तराखंड आणि हरियाणामधील प्रत्येकी एक खासदार हा घराणेशाहीमुळे निवडूण आला आहे.

>मोदींच्या मंत्रीमंडळामधील ७५ पैकी १५ नेते हे स्वत: सक्रीय राजकारणात येण्याआधीपासूनच राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत.

>भाजपाच्या देशातील १० मुख्यमंत्र्यांपैकी ३ मुख्यमंत्री हे आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून राजकारणात येऊन मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले आहेत यामध्ये देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ ( अध्यात्मिक गुरु महंत अविद्यनाथ यांचे वारस), प्रेमा खंडू यांचा समावेश होतो. तर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेही काही महिन्यांपूर्वीपर्यंत या घराणेशाहीतून पुढे आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये होत्या.

>सध्या लोकसभेतील २२ टक्के सदस्य हे घराणेशाहीमुळे निवडूण आले आहेत. हाच आकडा १५ व्या लोकसभेत ३० टक्के इतका होता.

>सध्याच्या लोकसभेमध्ये घराणेशाहीमधून निवडूण आलेल्याची आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक टक्केवारी ही भाजपाची आहे.

>भाजपामधील ४४.४ टक्के खासदार हे या ना त्या माध्यमातून घराणेशाहीमुळे लोकसभेत निवडूण आल्याचे हाँगकाँग विद्यापिठातील अभ्यासक असणारे रोमन कार्लेव्हॅन सांगतात.

ही यादी आणि आकडेवारी वगळल्यास स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही चालते. अगदी सरपंचापासून ते जिल्हापरिषद सदस्यापर्यंत सगळीकडे स्थानिक संस्थाने निर्माण झाली आहेत. शहरी भागांमध्ये महिलांसाठी वॉर्ड आरक्षित झाल्यास पत्नीला तिकीट मिळवून निवडूण देणारे अनेक नगरसेवक आहेत. तर काही शहरांमध्ये एकाच घरात दोनहून अधिक नगरसेवक असल्याचीही उदाहरणे आहेत. आपल्याच नातेवाईकांना राजकारणात उतरवण्याचे प्रमाण देशात वाढताना दिसत आहे. थोड्यात सांगायचे तर काय घराणेशाही ही भारतासाठी नवीन नाही. मात्र केवळ एकाच पक्षात ती आहे असं सध्याच्या लोकसभेमध्ये घराणेशाहीमुळे वर्णी लागलेल्या (आकडेवारी पहावी) पक्षाने सांगणे चुकीचे आहे. कारण मराठीत ती म्हण आहे त्याप्रमाणे, ‘ज्यांची घरं काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत.’

– स्वप्निल घंगाळे
swapnil.ghangale@loksatta.com

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Not just congress but there is dynasty politics in bjp also