– मयूरेश गद्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले जवळपास अकरा महिने बंद असलेल्या शाळा पुन्हा उघडायच्या बेतात आहेत.

शाळेचा पहिला दिवस ही खरंतर जून महिन्याची मक्तेदारी. सहा-सात जूनला उघडणाऱ्या शाळा आणि त्याच दरम्यान मृगाचं बोट धरून येणारा पहिला पाऊस हे वर्षानुवर्ष चालत आलेलं घट्ट समीकरण.. ! गम्मत अशी की अलीकडे काही वर्षांपासून शासनानं शाळा चौदा पंधरा जूनला उघडायचे आदेश काढले तसा पाऊसही समजूतदार मित्रासारखा चौदा पंधरा जूनला यायला लागला.
यंदा मात्र हे गणित चुकलंच . वाट बघून बघून पाऊस निघूनसुद्धा गेला. आतातरी शाळा उघडतील अशा आशेनं तो डिसेंबर आणि जानेवारीत पहिल्या आठवड्यात पुन्हा पुन्हा चक्कर टाकून गेला . त्यावर बरेच जोक्स सुद्धा व्हायरल झाले. पण शाळेची कुलपं उघडलीच नाहीत.

आता या आठवड्यात ती कुलपं -बहुधा कुरकूर करत – उघडतील.

शाळेचा पहिला दिवस म्हणजे काही विचारू नका! आजच्या भाषेत सांगायचं तर एकदम स्पेशल इव्हेंट! लहानपणी आम्ही न चुकता कोकणात आजोळी जायचो. महिनाभर तिकडे मामे-मावस भावंडं मिळून फुल धमाsssल! पण एकदा का जून उजाडला की कधी एकदा कल्याणला घरी पोचतोय असं व्हायचं . परतीची एसटीची रिझर्वेशन नाही मिळाली तर काय होईल या कल्पनेनेच जीव कासावीस व्हायचा.

कधी एकदा शाळा सुरू होत्येय आणि मित्रांना भेटतोय याची उत्सुकता असायची. पहिल्या दिवशी सॉलिड दंगा. त्यातून कोणी नवीन मुलगा आला असेल तर तो गिऱ्हाईक नाहीतर , “ब” तुकडीतून कुणी “अ” तुकडीत आला असेल तर त्याला टोच्या मारायला सुरुवात !

मी नक्की सांगतो, आताही यातलं काहीच बदललेलं नसणार. नवीन क्लास, शिक्षक, नवे विषय, सुट्टीत एन्जॉय केलेले लेटेस्ट गेम्स हे सगळं मुलांना एकमेकांशी शेअर करायचं असणारच ! पण यंदा हे भाग्य मुलांच्या वाट्याला आलंच नाही.

गेला महिनाभर मुंबई ठाण्यात यावर काथ्याकूट चाललाय. पुस्तकं स्टेशनरीचे दुकानदार म्हणून आम्हांला सगळ्यांना असं वाटतंय की आतातरी शाळा उघडाव्यात. त्यानिमित्तानं व्यवसायात जान येईल. मनावरची मरगळ दूर होईल. पण दुसऱ्या बाजूनेही सांगतो. ज्या शाळेत मी शिकलो (आणि माझा मुलगाही शिकला ) त्या संस्थेत आता मी संचालक आहे. तिथले रिपोर्ट्स रोज वाचतोय. ऑनलाईन शिक्षणाला सगळेच आता कंटाळले आहेत. सुरुवातीला जुलै ऑगस्टपर्यंत मुलांना उत्साह होता. दिवाळीपर्यंत तो कसाबसा टिकला. आता मात्र मुलं जेमतेम “वर्गात” उपस्थिती दाखवतात. यंदा शारदोत्सव झाला नाही, क्रीडास्पर्धा नाहीत, उत्साहात साजरे होणारे गॅदरिंग मधले डान्स नाहीत. हे सगळं मुलांसाठी जेवढं आवश्यक असतं तेवढंच शिक्षकांना सुध्दा एनर्जी देणारं असतं. पण म्हणून लगेच शाळा उघडाव्यात अशीही परिस्थिती नाही.

उद्या दुर्दैवाने एखादा अनुचित प्रकार घडला किंवा अगदी कुणी शाळेत जायला लागल्यावर नुसता पॉझिटिव्ह झाला तर ती संपूर्ण शाळेसाठी – शिक्षकांसाठी , संस्था चालकांसाठीआणि पालकांसाठी – चिंतेची बाब असेल. आज प्रत्येक शिक्षण संस्थेत शिक्षकांना आणि संस्थाचालकांना या गोष्टीचं दडपण जाणवतं आहेच. ज्या शाळा सुरू झाल्या तिथेही सुरुवातीला पालकांचा प्रतिसाद खूपच सावध पवित्रा घेतल्यासारखाच आहे.

एवढंच कशाला, माझा मुलगा मुंबईला कॉलेजला आहे. सध्या तोही ऑनलाईन शिक्षण अनुभवतोय. पण उद्या लोकल ट्रेन सुरू झाल्या तरी त्याला लोकलने प्रवासाची परवानगी देताना मला आणि बायकोलाही मनाचा हिय्या करावा लागणार आहेच. प्रत्येक संवेदनशील माणसाला निर्णयप्रक्रियेच्या वाटेवर वाकुल्या दाखवत करोना उभा असणार आहे.

केवळ २०-२१ नव्हे तर २१-२२ या शैक्षणिक वर्षावरही या सगळ्याचा परिणाम होणारच आहे. दहावी, बारावी च्या परीक्षा एप्रिल- मे महिन्यात होणार आहेत. म्हणजे मग इतर इयत्तांच्या यंदाच्या वार्षिक परीक्षा कधी होणार याचा अंदाज नाही.

पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे गेली काही वर्षे एप्रिलमध्ये अत्यंत तीव्र उन्हाळ्याचा सामना आपण करत असतो. यंदा इतक्या प्रदीर्घ सुट्टीनंतर कदाचित उन्हाळी सुट्टी घेता येणार नाही. म्हणजे बच्चेकंपनीला कडक उन्हाळ्यात शाळेत जावं लागेल. थोडक्यात काय, तर एक नक्की, की हा लढा दीर्घकाळ चालू ठेवावा लागणार आहे.

एवढं सगळं खरं असलं तरीही आता मनापासून असं वाटतंय की हळूहळू शाळा सुरू व्हायला हव्यात. त्या तशा सुरू झाल्या तरच बडबडगीतांमधले ते चिरपरिचित शब्द गुणगुणत मुलं घरी येतील……..

शाळा सुटली
पाटी फुटली
आई मजला
भूक लागली

 

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools reopening after coronavirus pandemic scsg
First published on: 29-01-2021 at 10:30 IST